Goa Theft News: मोठ्या बंगल्यांची आधी रेकी करून नंतर साथीदाराच्या मदतीने चोरी करण्यात हातखंडा असलेला अट्टल घरफोड्या चिमा पॉल याच्या फातोर्डा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मागच्या आठवड्यात फातोर्डा येथे बंद फ्लॅट फोडून चिमा आणि त्याचा साथीदार अर्जुन देसाई या दोघांनी 50 लाखांचे दागिने पळवून नेले होते.
चिमाचा साथीदार अर्जुनचे मडगावात अपोलो इस्पितळाजवळ मोबाईल विक्रीचे दुकान असून पोलिसांनी या दोन्ही चोरांनी घरात लपवून ठेवलेले चोरीचे दागिने हस्तगत केले आहेत.
फातोर्डा येथील शारदा क्लासिक हॉटेलजवळ असलेला डेबोरा फर्नांडिस यांचा हा फ्लॅट 4 डिसेंबर रोजी रात्री या जोडीने फोडला होता. त्यानंतर चिमा नागपूरला पळून गेला होता. याप्रकरणी चिमाला नागपूर येथे, तर अर्जुन देसाई याला मडगावातून अटक केल्याची माहिती फातोर्डा पोलिस स्थानकाचे निरीक्षक दितेंद्र नाईक यांनी दिली. यापूर्वी चिमा पॉल याने अशाचप्रकारे
कुडचडे येथील एक घर फोडून लाखोंचे दागिने पळविले होते. फातोर्डा आणि कुडचडेतील चोरीच्या कार्यपद्धतीत साम्य दिसून आल्याने पोलिसांनी चिमाचा शोध घेण्यास सुरवात केली असता, तो नागपूरला गेल्याची माहिती मिळाली. फातोर्डा पोलिसांनी नागपूर येथे जाऊन चिमाला अटक केल्यानंतर त्याने या चोरीत आपल्यासोबत अर्जुनही सामील असल्याचे सांगितले. गुरुवारी पोलिसांनी अर्जुनलाही ताब्यात घेतले. आज त्यांना रिमांडसाठी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
या प्रकरणात चोरीला गेलेले बहुतेक दागिने पोलिसांना सापडले असून दोन्ही चोरांनी ते दागिने आपल्या घरात ठेवले होते. मात्र, काही दागिने अद्याप हस्तगत करायचे आहेत, अशी माहिती नाईक यांनी दिली. डेबोरा फर्नांडिस यांचे माहेर केपे येथे असून ३ डिसेंबर रोजी त्या फ्लॅट बंद करून केपेला गेल्या होत्या. 5 डिसेंबर रोजी त्या परतणार होत्या.
मोडस् ऑपरेंडी असायची एकच
कुडचडे येथे एका घरात लग्नकार्य होते. घरातील लोक समारंभासाठी घर बंद करून बाहेर पडले असता, चिमाने ते घर फोडून लाखो रुपयांचे दागिने पळवून नेले. या प्रकरणात त्याला नंतर अटक केली होती. फातोर्डा आणि कुडचडेतील चोरीची मोडस् ऑपरेंडी एकच होती. त्यामुळे पोलिसांनी चिमावर लक्ष केंद्रीत केले होते. चिमा नागपूरला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर अमीन नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथक नागपूरला पाठविण्यात आले.
...तर चोरी टळली असती
4 डिसेंबरला फर्नांडिस यांच्या फ्लॅटमध्ये चोरी झाली. दुसऱ्या दिवशी या प्रकाराची माहिती शेजाऱ्यांनी दिल्यानंतर त्या तातडीने मडगावात आल्या. डेबोराच्या आईचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले असून आईचे आणि विवाहित बहिणीचे दागिने मडगावातील बँकेत लॉकरमध्ये ठेवण्यासाठी त्यांनी घरी आणले होते. बँकेकडून लॉकर मिळण्यास विलंब झाल्याने ते घरीच ठेवले होते. याच दागिन्यांवर त्या दोघांनी डल्ला मारला. वेळीच लॉकर मिळून तेथे दागिने ठेवले असते, तर ते चोरांच्या हाती लागले नसते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.