

सर्वेश बोरकर
सुमारे ३०० वर्षे महाराष्ट्र पारतंत्र्यात, गुलामगिरीत खितपत पडला होता. दिल्लीचे मुघल, आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह यांच्या अत्याचाराने इथली गरीब जनता भरडली जात होती.
साम्राज्यवादाने झपाटलेल्या सुलतानी आक्रमणांमुळे इथली घरे-दारे, पीक-पाणी, बायका-पोरी सुरक्षित नव्हत्या. याच काळात शहाजीराजे भोसले व जिजामाता यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी, १६३० रोजी, पुणे जिल्ह्यातील, जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला.
शिवाजी महाराजांचे नाव शिवनेरी किल्ल्यावर असणाऱ्या शिवाई देवीच्या नावावरून ठेवण्यात आले. वडिलांचा म्हणजे शहाजीराजे भोसले यांचा जाहगिरीचा प्रदेश बंगळूरचा (कर्नाटक) असल्यामुळे शिवबांची जडणघडण त्यांच्या आई जिजाबाईंच्या सहवासात व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झाली.
रामायण, महाभारत या गोष्टींचे शिवबांवर लहानपणापासून संस्कार झाले. राज्यशास्त्र, धर्मशास्त्र यांचा अभ्यास त्यांनी लहानपणापासून मोठ्या कुशलतेने केला. त्याचबरोबर तलवारबाजी, दांडपट्टा, घोडेस्वारी याबाबतीतही शिवबा पारंगत झाले.
५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्याचमुळे जगाच्या इतिहासातील पराक्रमी, बुद्धिवंत आणि अद्वितीय राजा म्हणून आपल्या डोळ्यासमोर नाव उभे राहते ते छत्रपती शिवाजी महाराजांचे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपलब्ध असलेल्या अस्सल पत्रांमधून, त्यांच्याविषयी असलेल्या संदर्भ साहित्यातून, महाराजांचे भव्यदिव्य व्यक्तिमत्त्व साकारते. छत्रपती शिवाजी महाराजांकडे सुरुवातीला अवघ्या काही मावळ्यांची साथ होती.
कमी मनुष्यबळातही बलाढ्य शत्रूला नामोहरम करण्यासाठी त्यांनी गनिमी कावा या युद्धनीतीचा वापर केला. हळूहळू आपले आरमार वाढवले. सुमारे ४०० गड आपल्या आधिपत्याखाली आणले गेले. काही गड त्यांनी स्वतः बांधले, तर काही किल्ले लढाया करून जिंकले.
महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर ६ जून १६७४ रोजी अगदी थाटामाटात पार पडला. ह्या सोहळ्यासाठी तब्बल १ कोटी खर्च आला होता. इतका अवास्तव खर्च होऊ नये अशी राजांची इच्छा होती, पण स्वराज्याचे छत्रपती म्हणून त्यांना हे करावे लागले.
महाराजांचे शिक्के असलेले चलन वापरात आणले जाऊ लागले. स्वराज्याला एक निश्चित आकार मिळाला. अर्थातच महाराजांचा हा उदय सहजासहजी मुघलांना रुचणारा नव्हताच. त्यामुळे मुघलांचे स्वराज्यावर हल्ले वाढले. मुघल सत्ता अधिक आक्रमक होत गेली. त्यांनी अनेक आघाड्यांवर युद्ध पुकारून चहूबाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
महाराजांना दक्षिणेकडील स्थिती माहीत होतीच आणि बहलोलखान वजीर झाल्याबरोबर महाराजांनी त्याच्याबरोबर तह केला. कुतुबशाहीची सर्व सूत्रे असलेल्या हिंदू भावंडांचाही हिंदवी स्वराज्य, ह्या संकल्पनेला पाठिंबा होता. म्हणजे आता दक्षिणेत महाराज, आदिलशाही व कुतुबशाही हे प्रमुख घटक होते आणि त्यांचा लढा हा उत्तरेतून आलेल्या मुघलांशी होता. त्यामुळे दक्षिणेकडील सर्व शाह्या एकत्रितपणे मुघलांविरुद्ध सामील व्हाव्या अशी महाराजांची इच्छा होती.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली रणनीती जाहीर केली, ज्यात त्यांनी सांगितले, दक्षिणची पातशाही आम्हा दक्षिणीयांच्या हाती असावी. ह्यास कुतुबशाही अनुकूल होती, पण आदिलशाही त्यास इतकी अनुकूल नव्हती.
महाराजांना त्याची काळजी नव्हती. कारण दोन्ही शाह्यांची झालेली वाताहत बघता, अंतिम लढाई ही आपण आणि मुघल ह्यात होणार हे त्यांनी आधीच ताडले होते. त्यासाठी त्यांनी दक्षिण मोहीम हाती घेण्याचे पक्के केले. छत्रपती शिवरायांच्या आयुष्यामध्ये शिवराय किंवा त्यांचे मावळे शत्रूने पाठलाग केल्यानंतर कधीही त्यांना सापडले नाहीत. याचे संपूर्ण श्रेय जर कोणाला जात असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडदळात असणाऱ्या सर्व नामांकित घोड्यांना.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने जर शत्रू सैन्याचा पाठलाग केला तर ते शत्रू सैन्याला ताणून पकडत असत. याचे एक कारण म्हणजे स्वराज्याच्या घोडदळात असणारी घोडी होती.
स्वराज्यावर जेव्हा जेव्हा संकटे आली अथवा आणीबाणीची वेळ आली छत्रपती शिवाजी महाराज या घोडदळाचा वापर आवर्जून करत असत. स्वराज्याच्या प्रत्येक मोहिमेत आपल्याला घोड्यांचा वापर केलेला बघायला मिळतो.
महाराजांनी वापरलेल्या घोड्यांचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि एकंदरीत स्वराज्याच्या निर्मितीत, रक्षणात आणि विस्तारात खूप मोठा वाटा आहे. मग प्रश्न उभा राहतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या ५० वर्षांच्या आयुष्यामध्ये आणि ३४ वर्षांच्या धावपळीमध्ये फक्त एकच घोडा वापरला होता का?
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात एकूण सात घोडे वापरल्याचे उल्लेख आढळतात. यामध्ये मोती, विश्वास, धुरंगी, इंद्रायणी, गजरा, रनभीर आणि कृष्णा असे ७ घोडे महाराजांनी त्यांच्या एकंदरीत आयुष्यात वापरले होते असे इतिहासकार सांगतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो शेवटचा घोडा वापरला होता त्याचे नाव होते कृष्णा.
त्याचे इतिहासातील महत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केल्यानंतर जसे ते हत्तीवर बसले होते, तसेच नंतर ते एका पांढऱ्याशुभ्र घोड्यावरदेखील बसले होते. त्या घोड्याचे नाव होते कृष्णा.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, आपल्या आयुष्याचे स्वप्न आणि रयतेच्या मनातील ध्येय पूर्ण झाले याचा आनंद राजमाता जिजाऊंना झाला. त्यासाठी मॉंसाहेबांनी महाराजांना ज्या घोड्यावर आग्रहाने बसवले होते तो म्हणजे कृष्णा .
शिवकालात घोडदळाचा छत्रपती शिवाजी महाराज आवर्जून वापर करत. स्वराज्याच्या प्रत्येक मोहिमेत आपल्याला घोड्यांचा वापर केलेला दिसतो. घोडदळ आणि पायदळ या दोन्ही सैन्याप्रकारावर शिवकालात स्वतंत्र प्रमुखांची नियुक्ती होत असे.
सरनौबत ही शिवकालातील अत्यंत मोठी आसामी. दोन्ही विभागांचा कारभार हा स्वतंत्रपणे अमलात येत आणि मग हे दोन्ही सरनौबत एकत्रितपणे येऊन मोहिमेची आखणी, खर्च, मांडणी आणि इतर मनसुबे रचत. हिशेब ताळेबंद आणि खर्च पत्रे यांच्या आधारे पागा व्यवस्था थोडक्यात अशी होती.
सरकारातून घोडा मिळणारा बारगीर , २५ बारगिरास ,१ पखालजी, १ नालबंद व १ हवालदार,५ हवालदारांचा मिळून १ जुमलेदार (पगार ५०० होन सालाना व पालखीचा मान),१० जुमलेदारांच्यावर १ हजारी (सालाना पगार १००० होन), ५ हजारींच्यावर १ पंचहजारी आणि या पंचहजारींच्या वर असणारा सरनौबत अंदाजे या सैन्य सरनौबतास सालाना ४००० ते ५००० होन इतका पगार होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.