पणजी: कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम पूर्णतः कायद्याच्या चौकटीत आणि मूळ रचनेला धरूनच सुरू आहे. त्यामुळे चार्ल्स कुरैया फाऊंडेशनच्यावतीने केलेले आरोप पूर्णतः निराधार आणि गोमंतकीयांची दिशाभूल करणारे आहेत, अशी माहिती कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी आज दिली.
कला अकादमीचे नूतनीकरणाचे काम पारदर्शी पद्धतीने सुरू असून, अनेकांना अंधारात ठेवून मूळ रचनेला बगल देऊन करण्यात येत असल्याचा आरोप दोन दिवसांपूर्वी चार्ल्स कुरिया फाऊंडेशनने केला होता. या आरोपाचे खंडन करताना मंत्री गावडे यांनी सांगितले की, अकादमीचे पूर्वीचे बांधकाम सदोष झालेले आहे. मुख्य सभागृह समुद्र किनारपट्टीवर असून, भरतीरेषेच्या खाली आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दरम्यान सभागृहात पाणी साचते. याशिवाय प्रदर्शन सभागृह, खुले मंच, प्रिव्ह्यू थिएटरमध्ये गळती लागली आहे. पावसाळ्यादरम्यान संपूर्ण कला अकादमी वापरायोग्य राहत नाही, यासाठीच राज्य सरकारने डागडुजी आणि नूतनीकरणाचा प्रस्ताव मान्य केला आहे. या प्रस्तावाप्रमाणेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली काम करण्यात येत आहे. याशिवाय मूळ ढाच्यात कोणत्याही स्वरुपात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे अकादमीच्या नूतनीकरणासंदर्भात केले जाणारे आरोप दिशाहीन आहेत, असे ते म्हणाले.
कोण हे फाऊंडेशनवाले
कला अकादमी ही सरकारी वास्तू आहे. या वास्तूचे नूतनीकरण करणे हा सरकारचा निर्णय आहे. जनतेला व कलाकारांना आदर्श वास्तू मिळावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. कला अकादमीचे मूळ स्वरूप सुरक्षित ठेवूनच काम केले जात आहे. तरीही चार्ल्स कुरैया फाऊंडेशनने चालवलेले आरोप हे केवळ माझ्यावर नसून, सरकारवर आहेत. त्यामुळे अशा चार्ल्स कुरैया फाऊंडेशनला आम्ही ओळखत नाही, अशा स्वरुपात तिखट प्रतिक्रिया मंत्री गोविंद गावडे यांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.