गोव्याची सांस्कृतिक परंपरा: भजन परंपरेतील वैशिष्ट्यपूर्ण टाळवादन

गोव्याची सांस्कृतिक परंपरा: भजन परंपरेतील वैशिष्ट्यपूर्ण टाळवादन
गोव्याची सांस्कृतिक परंपरा: भजन परंपरेतील वैशिष्ट्यपूर्ण टाळवादन
Published on
Updated on

गोमंतकीय भजनात टाळवादनाबाबत काही संकेत प्रचलित आहेत. भजनावेळी अखंडपणे टाळवादन करावे व टाळ कदापि जमिनीवर ठेवून नये, असा प्रघात आहे. ‘जय जय रामकृष्ण हरी’ या गजरावेळी भजन कलाकाराने एकदा टाळ हातांत घेतल्यानंतर अखंडपणे टाळवादन करीतच राहावे व भजन संपेपर्यंत शक्यतो जमिनीवर टाळ ठेवूच नये. एखादा गजर अथवा अभंग संपल्यानंतर टाळ मांडीवर ठेवण्यास हरकत नाही. अपवादप्रसंगी टाळ जमिनीवर ठेवता येईल. उदाहरणार्थ, भजनाच्या मध्यांतरावेळी चहापान करताना अथवा पखवाज, तबला, संवादिनी इत्यादी संगीतवाद्यांची स्वरजुळवणी करताना.

टाळ हे घनवाद्य साधारणत: द्रोणाच्या आकाराचे असून, लय दाखवण्यासाठी या वाद्याचा उपयोग होत असतो. टाळ हे प्रामुख्याने पितळ किंवा स्टीलचे बनवले जातात. चांगल्या प्रतीच्या टाळांत पंचधातूंचा समावेश असतो. वादनासाठी टाळांची जोडी वापरली जाते. आरत्यांसाठी वापरले जाणारे टाळ, छोट्या आकाराचे गुजराती टाळ, मुख्यत: नृत्यासाठी वापरले जाणारे ‘मंजिरी’ नामक टाळ, कथ्थक, कुचिपुडी, भरतनाट्यम, मणिपुरी इत्यादी नृत्य प्रकारांत ठेका सांभाळण्यासाठी वापरले जाणारे दाक्षिणात्य टाळ, नारदीय कीर्तनात वापरले जाणारे झांज या प्रकारचे टाळ व भजनासाठी वापरले जाणारे भजनी टाळ अथवा वारकऱ्यांचे टाळ असे टाळांचे काही प्रमुख प्रकार आहेत.

वारकरी संप्रदायात टाळांचे पावित्र्य जपणे आवश्यक आहे आणि त्यामुळे टाळ शक्यतो जमिनीवर ठेवूच नये असा संकेत आहे. टाळ जमिनीवर ठेवायचा प्रसंग आलाच तर शक्यतो ते टाळ थोड्या वेळापुरती सहकारी कलाकाराच्या हातांत द्यावे अथवा बसायच्या पाटावर अथवा एखाद्या पात्रात ठेवायला हरकत नाही.

गोमंतकीय भजन बव्हंशी बसूनच सादर केले जाते. भजन पथकातील सर्व टाळवादकांनी दोन्ही हात मांडीवर ठेवून टाळवादन करणे टाळून दोन्ही हात थोडेसे उंचावर धरून स्वत:चे पोट व छाती यांच्या मध्यभागाच्या समपातळीवर धरून टाळवादन करावे. कलाकारांचा कणा ताठ असावा. अभंग सुरू असताना शक्यतो टाळवादन थांबवू नये. अखंडपणे टाळ वाजवत राहावे. याबाबत काही प्रासंगिक कारणांनुसार अपवाद जरूर आहेत. अभंग सुरू असताना टाळ जमिनीवर ठेवू नये. फक्त आवर्तन, आलाप, ताना घेताना टाळवादन थांबवण्यास थोडीफार मुभा आहे. पण, अशा प्रसंगी टाळ जमिनीवर न ठेवता टाळ हातांतच धरून गायन करावे अथवा टाळ स्वत:च्या मांडीवर ठेवून गायन करावे. काही कलाकार अखंडपणे टाळवादन करून आलाप व तानांसह कुशलतेने आवर्तने घेऊ शकतात. तथापि, सर्वांनाच ते कौशल्य साधता येतेच असे नाही. अशा वेळी आवर्तन घेताना त्या कलाकाराने मध्ये मध्ये टाळवादन थांबवले तरी चालेल; तथापि, त्याने जमिनीवर टाळ ठेवून गायन करू नये. टाळ मांडीवर ठेवून आवर्तन घेता येईल अथवा तानबाजी करता येईल.

कीर्तनात विपुलेने प्रचलित असलेल्या हरदासी पद्धतीच्या टाळवादनाचाही काही वेळा गोमंतकीय भजनात यथोचित वापर केला जातो. ‘हरदासी ठेका/ ताल’ भजनी तालापेक्षा थोडा अधिक गतीने वाजवला जातो. भजनी ठेक्यावेळी पखवाजवर आठ मात्रांचे बोल येतात; परंतु, हरदासी ठेक्यावेळी पखवाजवर वेगळे बोल येतात. सर्वसाधारणपणे गोमंतकीय भजनात हरदासी पद्धतीचे टाळवादन केवळ ‘जय जय रामकृष्ण हरी’ या एकमेव गजरावेळी केले जाते. गोमंतकीय पारंपरिक भजनात अभंगगायनासाठी सहसा हरदासी टाळवादन केले जात नाही. गोव्याचे भजन संथ लयीत असल्याची ख्याती सर्वदूर आहे. तथापि, हल्लीच्या काही वर्षांत गोव्यातील कित्येक कलाकार हरदासी टाळवादनातील अभंग मोठ्या प्रमाणात सादर करू लागले आहेत. कदाचित, गोव्यात होणाऱ्या भजन स्पर्धांतील सादरीकरणासाठी कमी वेळ उपलब्ध असल्याने तेज गतीने होणारी हरदासी पद्धतीची ‘उडती भजने’ गोमंतकीय कलाकार सादर करू लागले असावेत. तात्पर्य, तो भजन स्पर्धांचा परिणाम म्हणावा लागेल; कारण, शेकडो वर्षे महाराष्ट्रातील ‘धावती/उडती भजने’ ऐकूनही त्याचा परिणाम गोमंतकीय कलाकारांवर फारसा झाला नव्हता; पण, आता गेल्या सुमारे तीस-चाळीस वर्षांत गोव्यात मोठ्या प्रमाणात भजनस्पर्धा होत असल्याने तो त्याचाच परिणाम म्हणावे लागेल, असे निदान मला तरी वाटते.

भजनी टाळवादन वेगळ्याच धाटणीचे आहे. भजनी टाळवादन तेजगतीने केल्यास ते हरदासी टाळवादन होते. गोमंतकीय भजन कलाकार भजनात हरदासी टाळवादन फक्त ‘जय जय रामकृष्ण हरी’ या गजनरावेळीच वापरतो व अभंगांवेळी फक्त भजनी टाळवादन करतो. तीच आमच्या गोमंतकीय भजनाची वैशिष्ट्यपूर्ण प्रथा-परंपरा आहे. पण, भजनी टाळ वाजवताना मध्येच रंजनासाठी अथवा नावीन्यासाठी म्हणून हरदासी पद्धतीच्या टाळवादनाचा किंचितसा वापर करायला हरकत नाही. पण, गोमंतकीय भजनात त्या पद्धतीचा अतिवापर करणे प्रकर्षाने टाळावे. हरदासी पद्धतीचे टाळवादन महाराष्ट्रातील तसेच गोव्यातील कीर्तनांत विपुलतेने केले जाते; पण, गोमंतकीय भजनात नव्हे. असे असले तरी हरदासी टाळवादन महाराष्ट्रातील भजन कलाकार विपुलतेने करतात, हेही तेवढेच खरे आहे. अर्थांत त्यांचे संपूर्ण अभंग त्याच टाळवादनात बंदिस्त असतात. महाराष्ट्रातील भजनाचा बाज गोव्यापेक्षा खूपच वेगळा आहे, हे आपण यासंदर्भात लक्षात घेतले पाहिजे.

गोमंतकीय भजनात अस्थाई या भजनप्रकाराचाही समावेश आहे. भजनसम्राट मनोहरबुवा शिरगावकर यांनी प्रचलित केलेल्या मनोहारी भजन परंपरेत अस्थाई या भजनप्रकाराचा समावेश आहे. अस्थाई प्रकारात अभंग सादर करण्यासाठी तशी कलाकाराची क्षमता असली पाहिजे. अन्यथा तो प्रकार सादर करण्याचा उपद्‍व्याप करूच नये. अस्थाई भजन म्हणजे नेहमीपेक्षा अतिशय धिम्या गतीने चालणारे भजन. उदाहरणार्थ, नेहमीच्या भजनात अभंगाची एखादी ओळ गाण्यासाठी आठ मात्रा लागत असतील तर त्याच ओळीसाठी अस्थाई या प्रकारात सोळा मात्रा लागू शकतात. मनोहरबुवा शिरगावकर यांनी ‘आनंदाचा कंद हरी...’ हा अभंग अस्थाई या प्रकारात गायिलेला होता, असे ज्येष्ठ भजन कलाकारांचे म्हणणे आहे. भजनातील एखादा पूर्ण अभंग अस्थाई प्रकारामध्ये गाणे शक्य नसल्यास निदान अभंगाचे एखादे तरी कडवे त्या प्रकारात सादर करण्याचा प्रयत्न करावा. तेव्हाच त्या भजन कार्यक्रमाला गोमंतकीय भजनाचा गंध येईल. अस्थाईचा प्रकार महाराष्ट्रात विशेषत्वाने प्रचलित नाही. परंतु, गोव्यातील काही मातब्बर-ज्येष्ठ कलाकार कित्येकदा अस्थाई प्रकारात आजही अभंगांचे गायन करतात. पण, असे प्रसंग क्वचितच होत असतात. महाराष्ट्रात द्रुत लयीत चालणारे ‘धावते भजन’ किंवा ‘उडते भजन’ अधिक प्रचलित आहे. अस्थाई भजनप्रकारासाठी अभंगाच्या मुख्य गायकाबरोबरच सहकारी कलाकारांचीही चांगल्यापैकी तयारी असणे गरजेचे आहशे. त्यासाठी मात्रांवर हुकमत असावी लागते.

‘अस्थाई’ शब्दाचा व्यावहारिक अर्थ वेगळा आहे. ‘स्थाई’ म्हणजे कायम. ‘अस्थाई’ म्हणजे तात्पुरता. उदाहरणार्थ, एखाद्या नगरपालिका मंडळाचा कार्यकाळ संपेपर्यंतच्या काळासाठी निवडलेली स्थाई समिती; एखाद्या संस्थेची निवडलेली एका महिन्याच्या काळासाठीची अस्थाई/तात्पुरती समिती. पण, भजन क्षेत्रात अस्थाई ही संकल्पना वेगळ्या अर्थाने वापरली जाते. मूळ अभंगाचे सर्व चरण गाऊन पूर्ण झाल्यानंतर दुगन करता येते अथवा मूळ लयीची अस्थाई करता येते. दुगन म्हणजे अभंगाच्या मूळ गतीपेक्षा दुप्पट गती. अस्थाई म्हणजे अभंगाच्या मूळ गतीपेक्षा कमी/अर्धी गती. एखादा संपूर्ण अभंग अस्थाई या प्रकारात गाता येतो. गोव्यात पूर्वी भजनसम्राट मनोहरबुवा शिरगावकर यांच्या काळात अस्थाई हा प्रकार विशेषत्वाने रूढ होता. आजही त्या प्रकाराचा वापर काही कलाकार अपवादप्रसंगी करतात.

गोमंतकीय भजनात अभंगाच्या शेवटचा चरण सादर केल्यानंतर काही कसबी कलाकार नेहमीच्या लयीऐवजी विलंबित लयीने/ संथ गतीने) अभंगाचे धृपद सादर करतात. अशा प्रकारचे वैविध्य दाखवल्यास रसिकांच्या कानांना ते गोड वाटते. काही जण अभंगाचे शेवटचे कडवे व अखेरीस येणारे धृपद सलगपणे विलंबित लयीत घेतात. काही जण संपूर्ण अभंगच विलंबित लयीने गातात. या प्रकाराला अस्थाई भजन असेही संबोधले जाते. हे सर्व टाळवादनावरच अवलंबून असते.

टाळवादनावेळी मात्रा मोजण्याची पद्धत नेमकी अशी असावी याबाबत सध्या दोन मतप्रवाह आहेत. काहींच्या मतानुसार, या मात्रा ‘एक... दोन... तीन...’ अशा न मोजता त्या पारंपरिक पद्धतीने ‘लाभ... दोन... तीन...’ असा उच्चार करून मोजाव्यात, तर काहींच्या मते, त्या मात्रा ‘एक... दोन... तीन...’ या नवीन/आधुनिक पद्धतीनेच मोजाव्यात. मीसुद्धा म्हणेन, की ‘लाभ... दोन... तीन...’ ही पद्धत पारंपरिक असली तरी विद्यमान स्थितीत शिक्षणप्रक्रियेतील क्लिष्टता टाळून त्यात सुलभता आणण्याच्या दृष्टिकोनातून त्या मात्रा ‘एक... दोन... तीन...’ या पद्धतीनेच मोजाव्यात. कारण ‘लाभ’ ने सुरुवात करण्याची पद्धत आता समाजात कुठल्याही क्षेत्रात नाही. परपंरा ही सर्वश्रेष्ठच आहे; पण, भजनाचे शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेत एखादी बाब अडचणीची ठरत असल्यास व त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ वाढत असल्यात ती अडचण नाहीशी करून ते शिक्षण सुलभतेने देणे हे भजन क्षेत्राच्या हिताचेच आहे. आजची मुले सुरुवातीपासून ‘एक... दोन... तीन...’ याच पद्धतीने शिक्षण घेत असतात. अशा परिस्थितीत आम्ही त्यांना ‘लाभ... दोन... तीन...’ या पद्धतीने टाळवादनाच्या मात्रा शिकवायला लागलो तर मुले गोंधळून जातील. ‘एक’ की ‘लाभ’ म्हणायचे, याकडेच त्या मुलांचे लक्ष जाईल व त्यांचे टाळवादन शिकण्याचे राहूनच जाईल. त्यामुळे सांस्कृतिक क्षेत्रातील एखादी मोठी गोष्ट साध्य करताना आपण त्याच्यापेक्षा कमी महत्त्वाची गोष्ट गमावून बसलो तर काहीच हरकत नाही. जुन्या काळात कोणत्याही शिक्षणाचा प्रारंभ आम्ही ‘लाभ’नेच करायचो, हे खरेच आहे. उदाहरणार्थ अंक मोजताना आपणांस ‘एक... दोन... तीन...’ ऐवजी ‘लाभ... दोन... तीन...’ असेच शिकवले जायचे व तेच आम्ही शिकत आलो होतो. आम्ही मूळाक्षरे गिरववायचो त्या पाटीवर ‘शुभ-लाभ’ असे आवर्जून लिहिले जायचे. पाटीवर अथवा वहीवर ‘स्वास्तिक’चे चिन्ह काढणे हे त्या शुभ-लाभाचे प्रतीक होते. कोणत्याही शिक्षणाच्या प्रारंभी ‘लाभ’ वापरण्याची ती परंपरा संगीत व भजन क्षेत्रात सर्वमान्य होऊन प्रचलित झाली होती व दीर्घ काळ ती स्थिरस्थावर झाली होती. ‘लाभ दोन तीन चार...’ अशा शब्दांचा समावेश असलेला एक अभंग मराठी संतवाङ्‍मयात आहे. पण, आता बदलत्या काळाशी आपल्याला थोडेफार जुळवून घ्यावेच लागते. उदाहरणार्थ, धोतर अथवा लेंगा नेसणे ही आमची पूर्वीपासूनची परंपरा असली तरी आता आम्हाला काळानुसार तसे करणे शक्य नाही. एखाद्या भजन पथकातील सर्वच कलाकारांच्या हातांमध्ये टाळ असतातच असे मात्र नाही. अशा वेळी त्या इतर कलाकारांनी टाळ्या वाजवून टाळवादनात साथ करावी. टाळ्यांचा आवाज खूप मोठाही येऊ देता कामा नये. अर्थांत त्या टाळीवादनाचा टाळवादकांना तसेच ऐकणाऱ्यांनाही त्रास होऊ नये.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com