डिचोली: मराठी साहित्य हे सर्वश्रेष्ठ असून या साहित्यामागे प्रचंड शक्ती आहे. साहित्यातून माणसाची वेगळी ओळख निर्माण होते. साहित्यातून केवळ जीवनच घडत नाही, तर जीवनातील दुःख विसरायला लावण्याची क्षमता साहित्यात आहे. साहित्यामुळे जीवन सदैव आनंदी आणि प्रफुल्लित राहते, असे मत साहित्यिक तथा प्रसिद्ध कादंबरीकार चंद्रकांत महादेव गावस यांनी व्यक्त केले.
सतत वाचनातून साहित्य निर्मिती होत असते. तेव्हा प्रत्येकाने वाचन करावे, असे आवाहनही श्री. गावस यांनी केले. गोमंतक मराठी अकादमी संचलित डिचोली प्रभागातर्फे आयोजित कविवर्य कुसुमाग्रज जन्मदिवस अर्थातच मराठी भाषा दिवस कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख वक्ते या नात्याने ते बोलत होते.
येथील दीनदयाळ सभागृहात आयोजित या कार्यक्रमास गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, कार्यकारिणी सदस्य तथा डिचोली प्रभागाच्या समन्वयक प्रा. पौर्णिमा केरकर, डिचोली प्रभागाचे उपाध्यक्ष सूर्यकांत देसाई, शिक्षण तज्ज्ञ रामचंद्र गर्दे आणि डिचोली प्रभागाचे निमंत्रक प्रा. सोमनाथ पिळगावकर उपस्थित होते.
सामंत यांनी यावेळी वि. वा. कुसुमाग्रजांच्या साहित्यावर प्रकाश टाकला. कुसुमाग्रजांचे चरित्र आणि चारित्र्य समाजासाठी दीपस्तंभासारखे आहे. प्रत्येकाने मराठी भाषा आपल्या जीवनाचा भाग असल्याची भावना मनी बाळगावी. मराठी भाषा निश्चितच मानाच्या पदावर विराजमान होईल. असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
सूर्यकांत देसाई यांनी यावेळी विचार मांडले. सुरवातीस मुळगावच्या ज्ञानविकास उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले.
प्रा. पौर्णिमा केरकर यांनी प्रास्ताविक केले. डिचोली प्रभागाचे उपाध्यक्ष सूर्यकांत देसाई यांनी स्वागत केले. प्रा. सोमनाथ पिळगावकर यांनी मान्यवरांचा परिचय केला. सूत्रसंचालन सिद्धी कोटकर यांनी केले. सौ. शुभलता कळंगुटकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास साहित्यिक गजानन देसाई, राजेंद्र सावईकर, देवू पळ, डॉ. कौस्तुभ पाटणेकर, स्वाती नवाथे आदी मराठीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘कविता कुसुमाग्रजांची’ कार्यक्रम रंगला
उद्घाटन कार्यक्रमानंतर ‘कविता कुसुमाग्रजांची’ हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात मृणाली पिळगावकर, सई भाटे, वैदही नाईक, प्रज्ञा चिपळूणकर आणि प्राची मणेरीकर यांनी कुसुमाग्रजांच्या कविता सादर केल्या. सायली गर्दे हिने कार्यक्रमाचे सूत्रबद्ध निवेदन करून कार्यकमात जान आणली. या कार्यक्रमानंतर ‘युवानाद’ हा मराठी भावभक्ती गायनाचा कार्यक्रम रंगला. नारायण गावस आणि अंसिका नाईक यांनी सुरेल आवाजात गीते सादर करून कार्यक्रमाचा शेवट गोड केला. त्यांना आतिष कारापूरकर आणि शुभम सावंत यांनी साथसंगत केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.