
Chamarkond River, Maulinge
डिचोली: म्हावळिंगेतून वाहणारी ‘चामरकोंड’ नदी दिवसेंदिवस प्रदूषणाच्या विळख्यात अडकत असून, या नदीचे अस्तित्व संकटात आले आहे. या नदीत मानवनिर्मित प्रदूषण वाढले असून, सध्या नदीचे पाणीही प्रदूषित झाल्याचे दिसून येत आहे.
डिचोली आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या पोर्तुगीजकालीन पुलाच्या खाली चामरकोंड येथे तर नदीचे बहुतांश पात्र कोरडे पडले असून, पाणी दुर्गंधीयुक्त बनले आहे. नदीला ओंगळवाणे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान, या नदीत दुर्गंधीयुक्त सॅनेटरी पॅड टाकण्याचे प्रकारही घडत आहेत.
म्हावळिंगे गावातून वाहणाऱ्या या नदीचा उगम महाराष्ट्रातील तळेखोल गावातून झालेला आहे. कुडचिरेहून ही नदी चामरकोंड, वन येथून पुढे डिचोली नदीला जाऊन मिळते. पोर्तुगीज राजवट काळात ही नदी जलमार्गाचे प्रभावी साधन होते. मात्र, आता या नदीत मानवनिर्मित प्रदूषण वाढले आहे. नदीच्या अस्तित्वासाठी नदीत होणारे मानव निर्मित प्रदूषण रोखणे काळाची गरज आहे, असे मत पर्यावरणप्रेमी व्यक्त करतात.
चामरकोंड येथे नदीत निर्माल्यासह प्लास्टिक आदी कचरा टाकणे, नियमित कपडे धुण्याचे प्रकारही सुरूच आहेत. या नदीत सदैव गुरेही बसलेली आढळून येतात. चिखलाची दलदल निर्माण झाली आहे. पावसाळ्यात तर नदीत बाहेरील घाण मिसळते. येथे मासळीवाहू वाहने आणि अन्य साहित्य धुण्याचेही प्रकार वाढले आहेत.
एकंदरीत हे प्रकार पाहता, चामरकोंड नदी मानवनिर्मित प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्याचे स्पष्ट होत आहे. चिंतेची बाब म्हणजे या नदीत वापरलेली दुर्गंधीयुक्त सॅनेटरी पॅड टाकण्याचे प्रकारही घडत आहेत. सध्या या नदीच्या काठावर सॅनेटरी पॅडचा खच पडल्याचे दिसून येत आहे.
महेश येंडे, नागरिक, वन-म्हावळिंगे
चामरकोंड नदीला मोठा इतिहास आहे. ही नदी पोर्तुगीज राजवटीची साक्ष देत आहे. गोवा मुक्तीलढ्यावेळी स्वातंत्र्यसैनिक याच नदीचा वापर करीत असत, असे स्वातंत्र्यसैनिक असलेल्या वडिलांकडून ऐकले आहे. आता वडील लक्ष्मण येंडे हयात नाहीत. चामरकोंड नदीच्या अस्तित्वावर सध्या संकट आले आहे. या नदीचे संवर्धन करण्यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्न व्हायला हवेत. अन्यथा भविष्यात या नदीच्या खाणाखुणा नामशेष होण्याची भीती आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.