Goa Politics: खरी कुजबुज; पर्रीकर असते तर?

Khari Kujbuj Political Satire: गोवा कोकणी अकादमीचे कार्यालय पूर्वी बसस्थानक परिसरातील देखण्या इमारतीत सुरू होते. पुरातन वारसा असलेली ती इमारत सध्या विनावापर आहे.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

पर्रीकर असते तर?

राज्‍यात गतवर्षी उघडकीस असलेले ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरण मुख्‍य आरोपी पूजा नाईक हिने पुन्‍हा तोंड उघडल्‍याने चर्चेत आले आहे. आपण मंत्री, आयएएस अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम खात्‍याच्‍या (पीडब्‍ल्‍यूडी) अभियंत्‍याला १७.६८ कोटी रुपये दिल्‍याचा दावाही तिने केला. त्‍यामुळे अधिकारी, अभियंत्‍यापेक्षा ‘तो’ मंत्री कोण? असा प्रश्‍‍न जो तो विचारू लागला आहे. अशा स्‍थितीत विरोधी पक्ष मात्र पत्रकार परिषदा घेऊन आणि सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून सरकारवर टीका करीत आहेत. परंतु, यावरून रस्‍त्‍यावर उतरण्‍याचे धाडस मात्र ते करीत नाहीत. त्‍यामुळे सद्यस्‍थितीत काँग्रेस सत्तेत असती, त्‍यांच्‍या सरकारात असा घोटाळा उघडकीस आला असता आणि विरोधी पक्षनेतेपदी स्‍व. मनोहर पर्रीकर असते, तर काय काय घडले असते? याचा अंदाज अनेकजण बांधत आहेत. ∙∙∙

‘त्या’ इमारतीवर कॅसिनोचा डोळा!

गोवा कोकणी अकादमीचे कार्यालय पूर्वी बसस्थानक परिसरातील देखण्या इमारतीत सुरू होते. पुरातन वारसा असलेली ती इमारत सध्या विनावापर आहे. नियमानुसार अकादमीने नवे कार्यालय मिळाल्यावर ती इमारत सरकारच्या सर्वसाधारण प्रशासन खात्‍याच्या हवाली केली आहे. कॅसिनो चालकांचा त्या इमारतीवर डोळा असल्याची चर्चा आता प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे. या इमारतीचे जतन, संवर्धन करण्यासाठी आराखडा तयार करून सरकारचा आशीर्वाद मिळवत त्या इमारतीचा दीर्घ भाडेपट्टीवर ताबा घेण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचा मुद्दा या चर्चेत आला आहे. ∙∙∙

मोलेतील कामगार झाले खट्टू!

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हे सध्या पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे राज्यात फिरत असून त्यामुळे पक्षामध्ये बरेच चैतन्य आलेले दिसत आहे. परवा ते धारबांदोडा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना मोले येथे गेले व तेथे हल्लीच सीमा नाक्यावर बसविलेल्या वाहन स्कॅनर यंत्रणेची पहाणी केली. ते कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष असल्याचे कळताच तेथील कामावर असलेल्या कामगारांनी गेले तीन महिने पगारच मिळाला नसल्याचे त्यांच्या निदर्शनाच आणून दिले. तेव्हा त्यांनी त्या कामाच्या कंत्राटदाराला त्या बाबत जाब विचारताच त्याने येत्या आठवडाभरांत सर्व पगार व नियुक्ती पत्रे दिली जातील असे सांगितले. या आश्वासनाने कामगारांना दिलासा मिळाला खरा. पण या साहेबांकडे तक्रार करताच खर्चाला काही तरी चिरीमिरी मिळेल, ही त्यांची अपेक्षा मात्र फळाला आली नाही व ते खट्टू झाले बिचारे.∙∙∙

न झालेल्‍या पार्टीची वार्ता

एल्‍टन डिकॉस्‍ता यांचा मंगळवारी वाढदिवस समारंभ झाला. या समारंभाला लोकांची गर्दीही मोठ्या प्रमाणावर होती. त्‍यामुळे हा वाढदिवस साेहळा राजकीय चर्चेचा विषय बनला नसता तरच नवल. मात्र त्‍याच दिवशी बाबू कवळेकर यांनीही आपल्‍या घरी पार्टी ठेवली होती, अशीही काहीजणांनी आवई उठवली. वास्‍तविक कवळेकर यांच्‍या घरी दाेन दिवसांपूर्वी म्‍हणजे रविवारी बैठक झाली होती आणि तीही ‘एसआयआर’ मोहीम राबविण्‍यासाठी. ज्‍या दिवशी एल्‍टनचा वाढदिवस होता, त्‍या दिवशी बाबू कवळेकर गोव्‍यात नसून दिल्‍लीला होते. पण तरीही एल्‍टनच्‍या वाढदिवसाला लोकांनी गर्दी करू नये, म्‍हणून कवळेकर यांनी आपल्‍या घरी पार्टी ठेवली होती, अशी आवई कुणीतरी उठवलीच आणि न झालेली ही पार्टी राजकीय चर्चेचा विषय बनली. ∙∙∙

हुकलेली दिल्लीवारी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिल्ली दौऱ्याची पूर्ण तयारी केली होती. तेथे द्यावयाचा अहवाल दोन वेळा नजरेखालून घातला होता. फोंडा येथील पोट निवडणुकीसंदर्भात पक्ष श्रेष्ठींना आकलन सादर करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती. जिल्हा पंचायत निवडणुकीसह संघटनात्मक कार्यक्रमांविषयीही चर्चा होणार होती. दामू दिल्लीला निघण्याची तयारी करत असतानाच दिल्लीत कार स्फोट झाला आणि सारी समीकरणे बदलली. त्यामुळे त्यांच्या बैठका रद्द झाल्या आणि दौराही रद्द झाला. त्यामुळे फोंड्याचा विषय तूर्त पक्षीय पातळीवर भाजपने बाजूला ठेवल्यातच जमा झाला आहे. ∙∙∙

पोलिसांची संशयास्पद घाई!

पूजा नाईक या कॅश फॉर प्रकरणातील संशयितांने आरोप केल्यानंतर माध्यमांशी बोलण्यास फारसे उत्सुक नसणारे पोलिस अधीक्षक राहूल गुप्ता रोज बोलू लागलेत. तेच तेच पालुपद ते आळवत असले तरी त्या अधिकाऱ्यांची नावे पूजाने याआधी घेतली नव्हती. तिने मंत्र्यावर कोणतेही आरोप केलेले नाहीत, यावर त्यांचा भर आहे. हे प्रकरण वर्षभर जुने आहे. अशा प्रकरणात अन्य ३३ जणांनाही अटक झाली होती. मग या प्रकरणातील पैसे कुणामार्फत कुठे जात होते, याची माहिती पोलिस तपासात पुढे आली होती का हे सांगणे खुबीने टाळले जात आहे. साध्या साध्या प्रकरणात एफआयआर झाला की, पत्रके काढणारे पोलिस खाते याच प्रकरणात अमूक यांच्याविरोधात तक्रार आली आहे किंवा पूजाने अमूक यांची नावे घेतली आहेत. आम्ही चौकशी करत आहोत, असे सांगणे का टाळत आहे, हा चर्चेचा विषय ठरला आहे. ∙∙∙

‘उत्पल' नावाची ॲलर्जी!

बाबूश मोन्सेरात यांच्यासमोर उत्पल पर्रीकर हे नाव उच्चारले तरी त्यांचा पारा चढतो, हे बुधवारी राज्यातील जनतेला पुन्हा एकदा दिसून आले. काही झाले तरी बाबूश यांना उत्पल यांचे आव्हान विधानसभा निवडणुकीत राहिले आहे आणि आता यापुढेही राहणार आहे, हे स्पष्ट आहे. उत्पल यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीत ३० प्रभागात उमेदवार देणार असल्याचे जाहीर केल्याने बाबूश यांना नक्कीच धक्का बसला असणार आहे. काही झाले तरी कमी खर्चात (गंगाजळी दान करून) यापूर्वी महानगरपालिका निवडणुका जिंकता येत होत्या. परंतु आता प्रत्यक्षात पॅनलच्या माध्यमातून महानगरपालिकेला विरोध होणार असेल तर मोन्सेरात यांना निवडणुकीच्या खर्चाची अधिक तयारी करावी लागणार, हे दिसते. कारण शहरातील मतदारही सूज्ञ झाला आहे, त्यांनाही ‘गांधी’ पाहिल्याशिवाय चैन पडत नाही म्हणे. त्यामुळेच २०२२ मध्ये जेवढे अर्थकारण सहज होते, तेवढे २०२६ मध्ये वाढलेले असेल, हे स्पष्ट आहे. ‘स्पा’ वरून उत्पल यांनी यापूर्वी टाकलेल्या फटाक्याचा आवाज आता जोरात येऊ लागला आहे, त्यामुळेच बाबूश यांना उत्पल यांचे नाव घेऊन प्रश्न केला तर ते पटत नाही, हे जगजाहीर झालेच. त्यामुळेच की काय, काहीही झाले तरी सध्या उत्पल यांचे नाव बाबूश यांच्यापुढे काढण्यासही त्यांचेच समर्थक बिचकतात, ते उगाच नाही. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेसची सारी मदार महिलांवरच!

युरी एल्टनचा रेकॉर्ड तोडणार?

रेकॉर्ड हे तोडण्यासाठीच असतात. मात्र, त्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागतात. परवा केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी आमदार झाल्यावर प्रथमच आपला वाढदिन आपल्या मतदारांसोबत जाहीरपणे साजरा केला. एल्टन यांचे प्रतिस्पर्धी माजी आमदार बाबू वाढदिवसाला पूजेचा शाकाहारी महाप्रसाद मतदारांना वाढायचे. एल्टनने शाही भोजनाची व्यवस्था केली होती. एल्टनच्या वाढदिवसाला म्हणे सुमार पाच हजार लोकांनी उपस्थिती लावली होती. आता रविवारी कुंकळ्ळीचे आमदार व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव एल्टनप्रमाणे प्रथमच आपला वाढदिन जनतेच्या उपस्थितीत जाहीरपणे साजरा करणार आहेत. एल्टन यांच्या वाढदिवसाला झालेल्या गर्दीचा रेकॉर्ड तोडण्यासाठी युरीचे कार्यकर्ते वावरतात, आता पाहूया युरीचे जास्त की एल्टनचे ! ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; मोरजीच्या खुनाचे पुढे काय?

‘आदिवासीं’तील दुफळी भाजपला डोकेदुखी?

गोव्यातील आदिवासी समाज भारतीय जनता पक्षाबरोबर राहिला आहे. मात्र पक्षातीलच आदिवासी समाजातील नेत्यांमधील मतभेद भविष्यात तारक की मारक ठरतील यांचा अंदाज आताच बांधणे कठीण आहे. रमेश तवडकर व गोविंद गावडे यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने भाजपवर किती परिणाम झाला आहे हे आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीत स्पष्ट होईल, असे बोलले जाते. ज्या अर्थी बिरसा मुंडा जयंती ‘उटा’, ‘गाकुवे’ संघटना स्वतंत्ररित्या साजरी करीत आहेत, त्या‌ अर्थी त्यांच्यात मतभेद आहेत हे कोणी सुज्ञाने सांगण्याची गरज नाही. जर आदिवासी राजकीय पक्ष काढण्याची भाषा भाजपवर दबाव आणण्याचे तंत्र तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com