
वास्को: कासावली रेल्वेमार्ग क्रॉसिंगसाठी आम्हाला उड्डाणपूल नकोच, आम्हाला रेलमार्गाखालून रस्ता (भुयारीमार्ग) करावा अशी मागणी कासावली - आरोसीवासीयांनी केली आहे. उड्डाणपुलामुळे कासावली - आरोसी गावातील वारसास्थळे असलेली घरे नष्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी त्यांनी मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमली यांच्यासमोर उड्डाण पूल रद्द करण्याची मागणी केली आहे.
कासावली रेल्वेमार्ग क्रॉसिंगमुळे कासावलीवासीयांना व इतरांना गेल्या काही दशकांपासून त्रास सहन करावा लागतो. रेल्वे क्रॉसिंग करताना काहीजणांना प्राणही गमवावे लागले आहेत. तेथे रेलगाडी येत असल्यास गेट बंद केली जाते. त्यामुळे वाहनचालकांचा बराच वेळ वाया जातो. तेथे उपाययोजना करण्यासाठी गेल्या तीन दशकांपासून तेथील रहिवाशी मागणी करीत आहेत. यापूर्वी माजी मंत्री माथानी साल्ढाणा यांनीही हा प्रश्न हाती घेतला होता. त्यानंतही लोकांनी आपली मागणी पुढे रेटली होती.
आता सुमारे १०० कोटी रुपये खर्च करून रेल्वेतर्फे तेथे उड्डाण पूल बांधण्याची तयारी सुरू झाली आहे. यासंबधी तेथे रस्त्याचे मोजमाप करण्यासाठी मंगळवारी (ता. २२) रेल्वे अधिकारी मंगल व कामगार आले होते. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी करमली, काही ग्रामस्थ उपस्थित होते.
रेल्वेचे कामगारांनी तेथे मोजमाप सुरू केल्यावर स्थानिकांनी त्यांना मोजमापसंबंधी काही प्रश्न विचारले. तथापि, ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यांच्या मोजमापानंतर तेथील वारसास्थळे असलेल्या बऱ्याच घरांना धोका निर्माण होत असल्याचे दिसून आले.त्यामुळे स्थानिकांनी विरोध केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते ओलंसियो सिमोईस म्हणाले की, या घरांमागून बाजूने दुपदरी रेलमार्ग जातो, तर पुढच्या भागातून रस्ता जाणार आहे.त्यामुळे ती घरे नष्ट होण्याची भीती आहे. सेट बॅकसाठी जागाच राहणार नाही. जर सेट बॅक ठेवायचा असेल, तर बेडरूमपासून मोजमाप करावे लागेल.म्हणून उड्डाणपुलाचा आराखडा रद्द करावा. याप्रकरणी संबंधितांनी विचार करावा.
सामाजिक कार्यकर्ते ओर्विल दोरादो म्हणाले, या उड्डाणपुलाच्या रस्त्यासाठी जे मोजमाप करण्यात आले त्यामुळे काहीजणांच्या घराच्या पायऱ्या, व्हरांडे, विहिरी तसेच घरांचा काही भाग मोडावा लागणार आहे. त्यासाठी उड्डाणपुलाऐवजी भुयारी रस्ता बांधण्याची गरज आहे. जेणेकरून लोकांची घरे वाचतील. तसेच भुयारी रस्त्यासाठी कोणाचीही हरकत नाही. उड्डाणपुलामुळे गावाचा विद्ध्वंस करण्याऐवजी भुयारी रस्ता करणे योग्य ठरेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.