Verna Old Highway Road Widening Work Cancelled
सासष्टी: वेर्णा येथील जुन्या राष्ट्रीय महामार्गाचे आग्नेल आश्रम ते होंडा शोरुम पर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव होता. मात्र, त्याला स्थानिकांचा विरोध होता. रुंदीकरणामुळे अनेक घरांना बाधा येण्याची शक्यता होती.
आज दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ता सुरक्षा व वाहतूक व्यवस्थापन समितीची बैठक झाली व या बैठकीत या रस्त्याचे रुंदीकरण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही माहिती दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी पत्रकारांना दिली.
या जुन्या राष्ट्रीय महामार्गाच्या समांतर यापूर्वीच नवा पश्र्चिम बगल रस्ता बांधण्यात आलेला आहे. सर्व वाहतूक त्या रस्त्यावरुन वळविण्यात आली आहे. या नव्या रस्त्यावर जो उड्डाण पूल बांधण्यात आला आहे, तोही या महिन्यात वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. अशा परिस्थितीत वेर्णा येथील जुन्या रस्त्याचे रुंदीकरणाचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगून या कामामुळे सरकारचे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत, असेही ते म्हणाले.
आजच्या बैठकीत अनेक चांगले निर्णय घेण्यात आले. दांडेवाडो, चिंचोणे येथे सुद्धा राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. या पूर्वी या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी तीन प्रस्ताव देण्यात आले होते. मात्र, अधिकऱ्यांनी ते फेटाळून त्यांना हवे तसे रस्त्याचे डिझाईन तयार केले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी पुनर्संरेखन करावे,अशी मागणी या बैठकीत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
गोवा कॅनचे निमंत्रक रोलांड मार्टिन्स यांनी बनावट हेल्मेट रस्त्यावर विकतात, हा मुद्दा उपस्थित केला. गोव्यात दोन्ही जिल्ह्यात ब्युरो इंडियन स्टॅण्डर्डची कार्यालये सुरू करण्यास प्राधान्य देण्याचे बैठकीत ठरले. बैठकीला दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एगना ट्लेटस व दक्षिण गोव्याच्या पोलिस अधिक्षक सुनिता सावंत व विविध सरकारी खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
रस्ते अपघातांसंदर्भात सरकारच्या अनेक योजना आहेत. मात्र, लोकांना त्या माहीत नाहीत. या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जागृती मोहीम हातात घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. जर अपघातग्रस्ताला मदत केली, त्याला इस्पितळात पोहोचविले तर ५ हजार रुपयांचा पुरस्कार देण्याची योजना आहे. शिवाय एखाद्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना विम्याच्या रुपाने २.५ लाख रुपये पर्यंत देण्याची योजना आहे, असेही खासदार विरियातो फर्नांडिस म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.