Mahadayi Water Dispute : म्हादई ही आम्हा गोमंतकीयांची जीवनदायिनी; परंतु तिला अडवण्याचा, हिसकावण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही सर्व गोमंतकीय म्हादईच्या संरक्षणासाठी एकत्र आहोत हे दाखवून देण्यासाठी शनिवार, 20 रोजी राजधानी पणजीत संध्याकाळी 4 ते 6 वा.दरम्यान शहरातील विविध भागांत ‘मानवी साखळी’चे आयोजन करण्यात आले आहे.
गोवेकरांनी तसेच म्हादईच्या पाण्यावर जगणाऱ्या प्रत्येकाने या मानवी साखळीत सहभागी व्हावे, असे आवाहन सेव्ह म्हादई सेव्ह गोवा फ्रंटचे महेश म्हांबरे यांनी सांगितले. सूर्यकिरण हेरिटेज येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी जॅक अजित सुखिजा, प्रा. प्रजल साखरदांडे, ॲड. हृदयनाथ शिरोडकर व इतर उपस्थित होते. म्हांबरे म्हणाले, दोनापावल ते सांतामोनिका जेटीदरम्यान सात ठिकाणी या मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे 8 हजारांहून अधिक नागरिक या मानवी साखळीत सहभागी होणार आहेत.
सेव्ह म्हादई सेव्ह गोवाच्या पदाधिकाऱ्यांनी क्रॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई, आपचे आमदार यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी आपण या मानवी साखळीत सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनादेखील निमंत्रण दिले आहे. राज्यातील विविध एनजीओ तसेच सांस्कृतिक संघटनांनीदेखील या मानवी साखळीला पाठिंबा दर्शविला आहे. त्यासोबतच गोमंतकीय कलाकार हेमा सरदेसाई, ऑक्सर रिबेलो, प्रा. राजेंद्र केरकर व इतर मंडळी या मानवी साखळीत सहभागी होणार असल्याचे प्रा. प्रजल साखरदांडे यांनी सांगितले.
दबाव आणण्यास यशस्वी ठरलो
सेव्ह म्हादई सेव्ह गोवा संघटनेच्या माध्यमातून आम्ही एकत्र आलो आहोत. म्हादई संवर्धनाच्या अनुषंगाने राज्यात जी आंदोलने झाली त्यामुळे जीवनदायिनी म्हादई वाचविण्यासाठी सत्ताधाऱ्यांवर एक दबाव निर्माण झाला. या मानवी साखळी कार्यक्रमात सत्ताधाऱ्यांनीदेखील सहभागी होणे गरजेचे आहे; कारण म्हादई आम्हा सर्वांची असल्याचे प्रतिपादन प्रा. प्रजल साखरदांडे यांनी केले.
विविधांगी कलांचे सादरीकरण
मानवी साखळीदरम्यान गोमंतकातील विविध लोककलांचे सादरीकरण केले जाईल. त्यासोबतच म्हादई संवर्धनाचे संदेश देणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील. तसेच इतरही विविधांगी कलाप्रकारांचे सादरीकरण केले जाणार असून राज्यातील विविध भागातील कलाकार यात भाग घेणार असल्याचे ॲड. हृदयनाथ शिरोडकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.