
मडगाव: एका बाजूने कोमुनिदादीचे रक्षण करा अशी मागणी घेऊन गोव्यातील वेगवेगळ्या कोमुनिदादींचे पदाधिकारी एकत्र येतात, तर दुसऱ्या काही कोमुनिदादी आपल्या जागा दुसऱ्यांच्या घशात घालू लागल्या आहेत.
काणकोण तालुक्यातील नगर्से कोमुनिदादीच्या मालकीची सुमारे ५ लाख चौरस मीटर जमीन त्यांच्याच पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने दिल्लीतील व्यावसायिकाच्या घशात घालण्यात आली असल्याचा आरोप केला जात आहे. नगर्सेतील लोकांनी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांची भेट घेऊन अधिवेशनात आवाज उठविण्याची मागणी केली. सरदेसाई यांनी त्यास होकार दिला.
ते म्हणाले, सदर जमिनीचा मालकीहक्क नगर्से कोमुनिदादीचा असल्याचे पुरावे सरकारी दस्तावेजात नमूद असताना कोमुनिदादीने मात्र ही जमीन आपली नसून ती खासगी मालकीची असल्याचे सांगून एका जमीनमालकाला दिल्याचे उघड झाले आहे. या खासगी जमीनमालकाने ही जमीन दिल्लीच्या एका बड्या व्यावसायिकाला विकली असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला.
नगर्से कोमुनिदादीच्या मालकीची ही जमीन दिल्लीच्या व्यावसायिकाला विकण्याच्या कटकारस्थानात काणकोणच्या बाहेरील, मात्र सत्ताधारी भाजपशी जवळीक असलेल्या एका स्थानिक राजकारण्याचा हात असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डच्या पर्यावरण विभागाचे अध्यक्ष विकास भगत यांनी केला.
गोमन्तक टीव्हीच्या ‘साश्टीकार’ या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, जी जमीन विकण्यात आली आहे, तेथे बाजूला यापूर्वी आयटीआय आणि नवोदय विद्यालय हे दोन प्रकल्प उभे राहिलेले आहेत.
या दोन्ही प्रकल्पांनी या जागेचे निर्धारित मूल्य नगर्से कोमुनिदादीत भरले होते. मग असे असताना त्याच्या बाजूची जमीन खासगी मालकीची कशी?
या जमिनीची जी कागदपत्रे आहेत, त्यात या जमिनीची मालकी नगर्से कोमुनिदादीकडे आहे असे स्पष्टपणे नमूद आहे. तरीही कोमुनिदादीने ही जमीन आपली नाही म्हणून ती दुसऱ्या व्यक्तीला कशी काय दिली? असा सवाल भगत यांनी उपस्थित आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.