Sunburn Festival 2024 Camurlim Comunidade Meeting
आधीपासूनच ड्रग्स आणि इतर गैरप्रकारांमुळे बदनाम झालेला सनबर्न ईडीएम महोत्सव कामुर्ली गावात शिरकाव करण्याच्या प्रयत्नात असतानाच स्थानिकांनी त्याला तीव्र आक्षेप घेतला आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा सनबर्न महोत्सव आयोजित केला जात आहे, त्या ठिकाणी धार्मिक स्थळ असून हा विषय लोकांच्या धार्मिक भावनांशी जोडला गेला आहे. शिवाय भावी पिढीही बिघडू नये, असे येथील रहिवाशांना वाटते.
ज्या कोमुनिदाद जागेत हा सनबर्न आयोजनाचा प्रस्ताव आहे, तिथे आमची शेती आहे. आता माझी सासू व मी तिथे शेती करतो. एकदा सनबर्नचा गावात शिरकाव झाल्यास तो माघारी परतणार नाही. यास्थळी वड आहे व तिथे जागृत गोबरेश्वर देवस्थान आहे. वटपोर्णिमेला आम्ही महिला याठिकाणी वडाकडे पूजेसाठी जातो. या जागेशी धार्मिक व आस्थेची नाळ जोडली आहे. त्यामुळे इथे आम्हाला हा गोंधळ नको आहे. रविवारी कोमुनिदादच्या सभेत कोणता निर्णय होतो, त्यावर आम्ही पुढची दिशा ठरवू. गरज पडल्यास न्यायालयाची पायरीही चढू.
गैरप्रकारांना चालना मिळते, असे फेस्टिव्हल आम्हाला गावात नको आहेत. कारण असे महोत्सव गाव तथा पिढ्या उद्ध्वस्त करतात. आम्हाला गाव पुढच्या पिढीसाठी राखून ठेवायचा आहे. याआधीच दक्षिण गोव्यातील लोकांनी व बहुसंख्य पंचायतींनी या फेस्टिव्हलला झिडकारले आहे. गावात आमची सध्या लोकांची स्वाक्षरी घेण्याची मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत आमचा सनबर्नला विरोध असून, त्याअनुषंगाने निवेदनावर लोकांच्या स्वाक्षरी घेऊन हे निवेदन सरकारला देणार आहोत. आतापर्यंत हजारपेक्षा अधिकांनी आपल्या सह्या दिल्या आहेत.
मुळात आमचे कामुर्ली हे सांस्कृतिक व शांतता प्रिय गाव आहे. जे गावात सनबर्न आणून पाहत आहेत, त्यांना सांगू इच्छितो की जोपर्यंत सनबर्न कामुर्ली गावातून मागे जात नाही, तोपर्यंत आमचा विरोध सुरूच राहणार आहे. तसेच गॅझेटमध्ये जोपर्यंत सनबर्न रद्द झाला असे छापून येत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. या सनबर्नचे दुष्परिणाम समाजावर होतात. मुळात ज्यास्थळी हा सनबर्न आणू पाहत आहेत, ती जागा अरुंद आहे. परिणामी येथील नैसर्गिक संपदा नष्ट होईल. स्थानिक कोमुनिदादने या सनबर्नला आपल्या जागेत परवानगी देऊ नये.
ध्वनिप्रदूषणाची समस्या तीव्र होईल; संजना माशेलकर (पंचसदस्य, कामुर्ली)
आमचा सनबर्नला तीव्र विरोध आहे. गावात अरुंद रस्ते आहेत, तसेच ज्या जागेचा प्रस्ताव आहे ती अपुरी आहे. महोत्सवात लोकांची गर्दी उसळते, अशावेळी वाहतूक कोंडीचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागेल. तसेच मुलांच्या परीक्षा त्यावेळी असतील. त्यामुळे लाउड म्युझिकचा मुलांच्या अभ्यासावर परिणाम होईल. तिथे रहिवासी घरे आहेत. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याशिवाय ज्येष्ठांना व लोकांना रात्रभर चालणाऱ्या या धिंगाण्याचा त्रासच होणार व लोकांची झोपमोड होईल. जनहितार्थ आम्हाला गावात सनबर्न नको आहे.
मुळात सनबर्नमुळे आमचा काही फायदा नाही; परंतु सनबर्न कामुर्लीत आल्यास व्यावसायिकांना त्याचा फायदा होईल. कारण पर्यटकांची रेलचेल असेल, ज्यातून लोकांच्या दुकानांना गिऱ्हाईक भेटेल. तसेच टॅक्सीवाल्यांना चार पैसे जोडण्यास मिळतील. तसे एरव्ही यास्थळी कुणी येत नाही. सनबर्नमुळे लोकांना काही दिवस व्यवसाय मिळेल. राहिला प्रश्न ध्वनिप्रदूषणाचा. इतर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवेळी मध्यरात्रीपर्यंत संगीत वाजतेच ना! दुसरीकडे सनबर्नवर देखरेख ठेवून तो वेळेत बंद करावा. प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो.
मुळात सनबर्नची संकल्पना मला माहिती नाही. आम्ही कधी असले इव्हेंट पाहिले नाहीत किंवा आम्हाला रुची नाही. सनबर्न म्हणजे तिथे संगीत वाजते व गर्दीमुळे लोकांचे मोबाईल चोरले जातात, एवढेच ऐकले आहे. त्यामुळे सनबर्न होण्याने किंवा नाही होण्याने फरक पडत नाही; पण स्थानिकांना काय हवे, त्यानुसार लोक सनबर्नविषयी योग्य निर्णय घेतील. काही लोक विरोध दर्शवतात तर काही लोक पसंती दर्शवतात.
कामुर्ली गावात सनबर्नसारखा महोत्सव आल्यास आमचा त्याला प्रखर विरोध असेल. मुळात गावात एक मेगा प्रकल्प येऊ पाहतोय. याला यापूर्वीच आम्ही हरकत घेतली आहे. या प्रकल्पातील काहीजण सनबर्नला प्रोत्साहन देत आहेत. कारण सनबर्न गावात आल्यास संबंधित मेगा प्रकल्पास त्याचा फायदा होईल. तसेच एकदा गावात सनबर्न आला की बाहेरचे लोक गावात अतिक्रमण करतील. अशाने गावचे गावपण हरवेल तसेच डांबरी रस्ते येतील आणि एकदा महोत्सव आला की तो कायमचा गावातच स्थिरावेल. त्यामुळे आमचा सनबर्नला कडाडून विरोध आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.