
Andhra Pradesh Tourist Murder in Calangute Goa
कळंगुट: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला गोव्यातील प्रसिद्ध कळंगुट समुद्र किनाऱ्यावर शॅकमालक आणि पर्यटकांमध्ये झालेल्या वादात भोला रवी तेजा नावाच्या आंध्र प्रदेशमधील तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. यामुळे सगळीकडेच चिंतेचं वातावरण पसरलं आहे आणि पर्यटकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जातेय.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, तेजा आणि त्याच्या मित्रांना कळंगुट येथील मरीना बीच शॅकमध्ये जास्त पैसे घेतल्याचे वाटले आणि त्यानंतर हा संपूर्ण वाद सुरु झाला. शॅक कर्मचाऱ्यांनी हिंसक हल्ला सुरू केल्यानंतर मयत भोला रवी तेजा हा त्याच्या मैत्रिणीला वाचवण्यासाठी मध्यस्थी करू लागला असता त्याच्या डोक्यावर बांबूने हल्ला करण्यात आला आणि यातच त्याने प्राण गमावले.
भोला रवी तेजाच्या भावाने आता मोठ्या भावाच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार रवी तेजा हा खूप शांत स्वभावाचा माणूस होता. घरात, शेजारी किंवा कामाच्या ठिकाणी कितीही वाद झाला तरीही तो कधीच त्याचा पारा चढू द्यायचा नाही.
घरात आई-वडिलांमध्ये जरी वाद झाला तरीही भोलाने मध्यस्थी केल्याने तो वाद नक्कीच सुटेल अशी आम्हाला खात्री असायची. एवढ्या शांत स्वभावाच्या माणसाने नेमकं काय केलं असेल ज्यामुळे त्याचा मृत्यू व्हावा असा प्रश्न मला त्याच्या मृत्यूनंतर सतावतोय, भोलाचा भाऊ म्हणालाय.
रवी तेजाच्या भावाने सांगितलेली गोष्ट भावूक करणारी आहे. तो म्हणतोय की, माझ्या भावाच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती, त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होतं, त्याचे मित्र मदतीसाठी हाका मारत होते तरीही कोणीही मदत करण्याची तसदी घेतली नाही. शिवाय त्याचे मारेकरी बाजूलाच उभं राहून यावर हसत होते.
रवी तेजाचं गोव्यावर भरपूर प्रेम होतं, गेल्या काही काळात तो किमान २० वेळा गोव्याला जाऊन आला आहे आणि त्याचा असा दुर्दैवी मृत्यू देखील गोव्यात होईल अशी कोणीही कल्पना केली नव्हती. रवी तेजाचा भाऊ सांगतो की त्यांचे वडील स्ट्रोकचे रुग्ण आहेत, त्यांना ही बातमी कशी सांगावी हा सर्वात मोठा प्रश्न होता. गोव्यातून रवी तेजाच्या मृत्यूच्या तपासाबद्दल कोणतीही माहिती परिवारापर्यंत पोहोचलेली नाही. गोव्यातील पर्यटनावर मोठा वाद सुरु असताना ही घटना आणखी खळबळ निर्माण करतेय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.