

म्हापसा: कळंगुट परिसरात बेकायदा मसाज पार्लर्सचे पेव फुटले असून, कोणतीही वैध परवानगी अथवा आवश्यक मंजुरी न घेताच अनेक आस्थापने सुरू असल्याचा आरोप स्थानिक आमदार मायकल लोबो यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून संबंधित आस्थापनांची तातडीने तपासणी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
लोबो म्हणाले की, कळंगुट हे जागतिक स्तरावर प्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्याने येथील कायदा व सुव्यवस्था, पर्यटकांची सुरक्षा तसेच गावाची प्रतिष्ठा यांना सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. अधिकृत व्यवसायांच्या नावाखाली कोणतेही गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. अशा बेकायदा कृत्यांविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
स्थानिक सरपंचांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक आस्थापने वैध परवान्याशिवाय सुरू आहेत. काही ठिकाणी मसाज पार्लरच्या नावाखाली अन्य अनधिकृत प्रकारही सुरू असल्याचा दावा लोबो यांनी केला.
जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी दखल
संशयित आणि बेकायदा आस्थापनांची तातडीने ओळख पटवून त्यांना सील करण्यात यावे. तसेच स्थानिक पंचायत, उपजिल्हाधिकारी किंवा मामलेदार, आरोग्य खाते आणि पोलिस यंत्रणेने संयुक्त पाहणी करून नियमांचे उल्लंघन करणारे व्यवसाय कायमस्वरूपी बंद करावेत, अशी ठाम मागणी लोबो यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.