Goa News: जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून ‘गोमन्तक तनिष्का’ व्यासपीठाच्या माध्यमातून गोव्यातील उद्योगशील महिलांसाठी ‘उद्योग शाळा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. गोव्यात विशेषतः ग्रामीण भागातील महिला छोटे-छोटे गृहउद्योग करत असतात. पण या महिलांना ते उद्योग वाढवण्यासाठी मार्गदर्शन लाभत नाही.
उद्योग - व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना या महिला आपल्या परीने व्यवसाय करतात. त्यांना व्यवसायवृद्धीसाठी मार्गदर्शन मिळावे या हेतूने 8 मार्च रोजी हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.
गेल्या दोन वर्षांत ‘गोमन्तक तनिष्का’ व्यासपीठाद्वारे गोव्यातील अनेक उद्योगशील महिलांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून या उपक्रमाची निर्मिती झाली आहे. विविध शासकीय योजना, वेगवेगळ्या संस्थांच्या वतीने बचत गटांतील महिलांना व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते. परंतु आपल्या उत्पादनाचे मार्केटिंग कसे करायचे, हे काही शिकवले जात नाही.
शिवाय व्यवसायवृद्धीसाठी काय करावे याचे मार्गदर्शनही महिलांना मिळत नाही. त्यांच्या उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळत नाही. हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन महिलांसाठी ‘उद्योग शाळा’ हा उपक्रम सुरू केला जात आहे. दुपारी 3 ते संध्याकाळी 5 या वेळेत हा कार्यक्रम पणजीतील ईडीसी कार्यालयाच्या नालंदा सभागृहात होणार आहे.
''उद्योग शाळा'' उपक्रमाअंतर्गत महिलांना व्यवसायवृद्धी आणि त्यांनी बनवलेल्या उत्पादनांना बाजारपेठ कशी मिळवून देता येईल, याचे वर्षभर प्रशिक्षण त्यांना देण्यात येईल. दरम्यान, अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या संचालक ज्योती सरदेसाई यांची मुलाखत प्रसिद्ध लेखिका ज्योती कुंकळकर या घेणार आहेत.
ईडीसी, एफडीएचे लाभणार मार्गदर्शन
जागतिक महिलादिनी या उपक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांना आर्थिक विकास महामंडळ (ईडीसी) व अन्न आणि औषध प्रशासनातर्फे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. डिचोली, मांद्रे, मुळगाव, साळ, मोरजी, मुरगाव, वेर्णा, नागोवा, शिरोडा,
काणकोण, खोतीगाव आदी गावांमधील महिला या उपक्रमात सहभागी होतील. महिला उद्योगासाठी असलेल्या योजना तसेच खाद्यपदार्थांशी संबंधित व्यवसाय करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, याबाबत ईडीसी आणि एफडीएकडून प्रशिक्षण देण्यात येईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.