Goa BSNL: राज्यातील टेलिफोन सेवा अधिक चांगली करण्यासाठी बीएसएनएलने नवीन साॅफ्टवेअर सुरू केले आहे. मात्र, हे नवीन सॉफ्टवेअर हाताळायचे कसे याची माहिती बीएसएनएल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाच नसल्याचे उघडकीस आले आहे.
चांदर येथील लिंकन फर्नांडिस याला मडगाव बीएसएनएल कार्यालयात गेल्यावर हा अनुभव आला. आपला लँडलाईन फोन का बंद पडला, असे विचारण्यासाठी तो या कार्यालयात आला असता त्याला हे साॅफ्टवेअरचे कारण सांगितले गेेले.
चांदर येथे राहणारे फर्नांडिस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, गेल्या गुरुवारी त्यांचा फोन बंद पडला होता. यासंबंधी त्यांनी चांदर कार्यालयात संपर्क साधला असता, सध्या चतुर्थीचा काळ असल्यामुळे तुमची तक्रार अटेंड करण्यासाठी कुणी येऊ शकणार नाही, असे उत्तर त्यांना मिळाले.
दोन दिवसांनी त्यांनी पुन्हा चांदर कार्यालयाकडे संपर्क साधला असता, तुमची लाईन मडगावहून बंद करण्यात आली आहे, असे त्यांना उत्तर दिले गेले. हे साॅफ्टवेअर लागू करण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांना त्याचे प्रशिक्षण का दिले नाही, असा सवाल त्यांनी केला.
यासंबंधी बीएसएनएल अधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी मडगाव कार्यालयातील २७१४८८८ या फोनवर कित्येकवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, एकदाही हा फोन उचलण्यात आला नाही. त्यामुळे बीएसएनएलची बाजू समजू शकली नाही.
कुडतरीतील ग्राहकांनाही त्रास
बीएसएनएलच्या मडगाव कार्यालयात मंगळवारी विचारणा केली असता नवीन सॉफ्टवेअरमुळे ही अडचण आली आहे, असे सांगण्यात आले. ही अडचण कशी दूर करावी, याची माहिती मडगाव कार्यालयातील कुणालाही नव्हती.
त्यामुळे पणजी कार्यालयात संपर्क साधून हे कर्मचारी फाेनवरून ही दुरुस्ती कशी करावी, याची माहिती घेत हाेते,असे लिंकन फर्नांडिस यांनी सांगितले. फक्त चांदरमध्येच नव्हे तर कुडतरीतील कित्येक ग्राहकांना अशा अडचणींना सामोरे जावे लागते, असेही यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.