
मडगाव: केवळ गोव्यातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या ब्रिटिश बॅगपॅकर डॅनियली मॅकलॉग्लीन (२८) खून प्रकरणाचा खटला आता अंतिम टप्प्यात पोहचला असून, हा खटला लवकरच निकाली लागावा यासाठी न्यायालयाने येत्या १३ व १४ जानेवारीला संपूर्ण दिवस या खटल्याची सुनावणी ठेवली आहे.
दक्षिण गोवा सत्र न्यायालयात हा खटला सुरू असून सध्या अतिरिम युक्तिवाद सुरू आहे. जलदगतीने या खटल्याची सुनावणी सुरू असल्याने लवकरच त्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. १३ मार्च २०१७ रोजी काणकोणातील (Canacona) राजबाग-आगोंद येथे डॅनियलीचा खून झाला होता. खुनापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचारही झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले होते. या खुनाचे पडसाद विदेशातही उमटले होते.
काणकोण पोलिसांसाठी (Police) हा खून एक आव्हान बनले होते. तत्कालीन पोलिस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी या खुनाचा छडा लावून याच तालुक्यातील भगतवाडा येथील विकट भगत याला अटक केली होती. त्यावेळी त्याचे वय २४ वर्षे होते. विकट व डॅनियली या दोघांत मैत्री होती. खुनानंतर तिचा मोबाईलही चोरीला गेला होता. तिच्या अंगावर ७ जखमा होत्या. विकटचे तुरुंगातील वर्तनही चांगले नाही. त्यामुळे न्यायालयाने त्याला बेड्या घालून सुनावणीस आणण्याचा आदेश दिला होता. वडिलांच्या निधनानंतर तो पॅरोलवर सुटला होता.
काणकोण पोलिसांनी विकटवर न्यायालयात एकूण ३७४ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या ३०२ (खून), ३७६ (बलात्कार), ३९४ (जबरी चोरी) व २०१ (पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न) आदी कलमाखाली गुन्हा नोंद आहे. मागच्या सुनावणीच्या वेळी सरकार पक्षाच्या वकिलाने या खटल्याची सुनावणी जलदगतीने करावी, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर या खटल्याचा निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.