पणजी: गोवेकरांची न्याहारी ज्या पदार्थाशिवाय अधुरी आहे तो पाव आता महागणार आहे. येत्या 2 ऑक्टोबरपासून गोवेकरांना 5 रुपयाला पाव विकत घ्यावा लागणार आहे. पावाबरोबरच ब्रेड स्लाईसच्या किमतीतही वाढ होऊ शकते. त्यामुळे गोमंतकीयांचा नाष्टा व जेवणही महागडे होणार आहे.
मैद्याच्या पिठाच्या आणि अन्य वस्तूंच्या किमतीत भरमसाट वाढ झाल्याने आम्हाला नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे अखिल गोवा बेकर्स संघटनेचे अध्यक्ष पीटर फर्नांडिस यांनी बुधवारी ‘गोमन्तक’ला सांगितले. पावाची किंमत नियंत्रित ठेवण्यासाठी गोवा सरकारने आम्हाला काही सवलती द्याव्यात, अशी मागणी आम्ही केली होती. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता दरवाढीचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे ते म्हणाले.
पाव भाजी हा गोमंतकीयांचा सकाळच्या न्याहारीचा आवडता मेनू आहे. कच्चा माल आणि इंधनाचे भाव वाढत असल्याने ही दरवाढ करीत असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे. पाव विक्रेते या घोषणेने खूष झाले असले तरी हॉटेलमालकांत नाराजी आहे. कारण, त्यांनाही पाव-भाजीचे दर वाढवावे लागतील.
700 हून बेकरी व्यवसायात
गोव्यात आजही 700 हून अधिक लोक बेकरीच्या व्यवसायात आहेत. मात्र वाढत्या महागाइमुळे हा व्यवसाय करणे अनेकांनी सोडलेला आहे. काही जण अजूनही पारंपरिक पद्धतीने हा व्यवसाय चालवत असून ते महागाइच्या संकटाला सामोर जात आहेत. कच्चा माल महागल्यामुळे बेकरी व्यवसायापुढे अनेक प्रश्न आहेत.
"सर्वच पदार्थांचे दर वाढत आहेत. त्यामुळे पावाचादेखील उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे बुधवारी झालेल्या संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पाव विक्रेत्यांनादेखील इंधन वाढीचा फटका बसत आहे. त्यांनाही दिलासा मिळेल."
- पीटर फर्नांडिस, अध्यक्ष, ऑल गोवा बेकर्स असोसिएशन.
सध्याच्या वाढत्या महागाईत पाच रुपयांत पाव विकणे परवडणारे नसल्याने नारळ, ऊस आणि काजू उत्पादकांच्या धर्तीवर पाववाल्यांनाही सरकारने आधारभूत किंमत द्यावी, अशी मागणी अखिल गोवा बेकर्स आणि कन्फेक्शनर्स संघटनेने केली.
आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत या संघटनेचे अध्यक्ष पीटर फर्नांडिस यांनी पाववाल्यांवरील आर्थिक भार हलका होण्यासाठी राज्यात अनुदानित किमतीत सरपण उपलब्ध करून देण्याचीही मागणी केली.
कोरोना महामारीचा गोव्यातील पदेरावर विपरीत आर्थिक परिणाम झाला असून, त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारी मदतीची गरज असल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले. पण, उत्पादकांना विशेष सवलतीत साहित्य उपलब्ध करून देण्याबरोबर त्यांच्यासाठी विमा योजना व पेन्शन योजना सुरू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
1 ऑक्टोबरपासून पाव पाच रुपयांत
वाढत्या महागाईला तोंड देता यावे यासाठी 1 ऑक्टोबरपासून गोव्यात पावाची किंमत 5 रुपये करण्यात येणार आहे, अशी माहिती पीटर फर्नांडिस यांनी दिली. सध्या गोव्यात पावाची किंमत 4 रुपये आहे. होलसेलमध्ये जो पाव 3.20 रुपयांना विकला जायला तो आता 4 रुपये किमतीत विकला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
"पदेरासाठी सरकारने स्टार्ट अप योजना सुरू करावी. तसेच परवाना मिळविण्यासाठी ज्या किचकट अटी आहेत, त्या दूर करून एक खिडकी योजनेखाली हा परवाना आणावा."
- पीटर फर्नांडिस, अध्यक्ष, अखिल गोवा बेकर्स आणि कन्फेक्शनर्स संघटना
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.