पणजी: राज्यात ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंट संसर्ग रोखण्यासाठी सरकारने राज्यातील प्रमुख चेक नाक्यांवर कडक बंदोबस्त, तसेच गोव्यात प्रवेश करणाऱ्यांची रॅपिड अँटिजन चाचणी (आरएटी) सुरू केली केली असली तरीही अनेकजण प्रमुख चेकनाक्यांना बगल देत आडमार्गाने राज्यात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे राज्यावरील ‘डेल्टा प्लस’चे सावट गडद होत आहे. दैनंदिन कामानिमित्त किंवा इतर कामासाठी राज्यात येणारे या आडमार्गाचा वापर करीत असल्याची माहिती ‘गोमन्तक’ कडे आहे. त्यामुळे गोव्याच्या सीमेवर तपासणीचा दावा सरकार करीत असले तरी या आडमार्गाने येणाऱ्या प्रवाशांना रोखण्यास ते अपयशी ठरले आहे.
पोलिस सुस्त, प्रवासी सुसाट!
पर्ये येथील चेकनाक्यांवर पोलिस बंदोबस्त नाही. तसाच प्रकार न्हयबाग व आरोंदा किरणपाणी ठिकाणच्या सीमेवर आहे. येथे काही पोलिस असतात ते बरेच सुस्त असतात. पर्येत सरसकट सर्वांकडे निगेटिव्ह प्रमाणपत्र न पाहता काहींना जाऊ दिले जाते. न्हयबाग व आरोंदा किरणपाणी येथे पोलिसांनी नजर चुकवून काही लोक ये - जा करतात. या प्रकारामुळेही धोका वाढण्यास मदत होते. त्यामुळे पोलिसांचा हा सुस्तपणा धोकादायक ठरू शकतो.
आज न्यायालयात निर्णय
राज्यात प्रवेश करणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर करण्यात आलेल्या जनहित याचिकांवरील सुनावणीवेळी करण्यात आलेली आहे. रॅपिड अँटिजन चाचणी ही ‘फूलप्रूफ’ नसल्याचे ‘आयसीएमआर’ने स्पष्ट केले असल्याचा दावा याचिकादारांनी केला आहे. कोविड संदर्भातच्या विविध विषयांवर उद्या (28 जून) उच्च न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे.
या आडमार्गांचा होतोय वापर
पत्रादेवी, दोडामार्ग, केरी- सत्तरी, मोले व पोळे या पाच मुख्य चेकनाक्यांवर कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्राशिवाय राज्यात प्रवेश दिला जात नाही. ज्यांच्याकडे असे प्रमाणपत्र नाही त्यांना कोरोना चाचणीची सक्ती करून त्यांची सोय अवघ्या 270 रुपयांत येथे करण्यात येत आहे. हे प्रमाणपत्र सक्तीचे केले असल्याने व ते नेहमी करणे शक्य नसल्याने काही प्रवाशांनी हणखणे, हळर्ण, वन मावळिंगे, पर्ये, तेरेखोल या गावातून गोव्यात येण्याच्या ज्या आडवाटा तथा आडमार्गांचा वापर चालविला आहे.
पत्रादेवी येथे सर्वाधिक चाचण्या
पत्रादेवी चेकनाक्यावर सर्वाधिक कोरोना चाचण्या होत असून, त्यांची संख्या दिवसाला 290 च्या आसपास आहे. मोले चेकनाक्यावर 150 ते 200 चाचण्या होत आहेत. केरी चेकनाक्यावर 100 च्या आसपास चाचण्या होत आहेत. दोडामार्ग चेकनाक्यावर मात्र फक्त 25 ते 40 कोरोना चाचण्या गेल्या दोन दिवसांत झाल्याचे कळते, तर पोळे चेकनाक्यावर गेल्या दोन दिवसांत मिळून 120 कोरोना तपासणी झाल्याचे कळते.
हलगर्जीपणा ठरू शकतो धोक्याचा\
राज्यात चेकनाक्यावर जीवनावश्यक माल वाहतूक वाहनांवरील दोन चालक व एका हेल्परची थर्मल गनने प्रत्येकवेळी तपासणी केली जाते. आरोग्य तपासणीत त्यात संशय आल्यास त्याची चाचणी करणे आवश्यक आहे. मात्र कर्नाटक व महाराष्ट्रातून गोव्यात दिवसाला मोठ्या संख्येने हे ट्रक माल घेऊन येतात मात्र त्यावरील चालक किंवा हेल्पर यांच्या तपासण्याच चेकनाक्यावर केल्या जात नाहीत.
या हलगर्जीपणामुळे त्यांचा हा प्रवेशही ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंट संसर्ग गोव्यात येण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे या चालक, तसेच हेल्परला रॅपिड अंटिजन चाचणी प्रत्येकवेळी सक्तीची करणे आवश्यक आहे, असे मत उच्च न्यायालयात जनहित याचिकेत बाजू मांडणाऱ्या एका वकिलांनी व्यक्त केले.
मोलेत ‘अशी ही बनवाबनवी’
हुबळी, धारवाड, बेळगाव, खानापूर आदी भागातून गोव्यात येण्याचा मुख्य मार्ग असलेल्या मोले चेकनाक्यावर परराज्यातील काही नागरिक बनवाबनवी करीत आहेत. धारबांदोडा प्रतिनिधींने दिलेल्या माहितीनुसार, अनमोड घाटातून कार घेऊन आल्यानंतर तपासणी नाक्यापासून दूरवर वाहन उभे करून वाहनातील चालक वगळून इतर लोक उतरतात. ते जंगलमार्गे पायी चालत मोले बाजारात येतात व वाहनाचा चालक निगेटिव्ह प्रमाणपत्र घेऊन किंवा तपासणी करून चेकनाका ओलांडून गोव्यात येतो.
मग फायदा काय?
प्रमुख चेकनाक्यावरील बंदोबस्त चुकवून चोरवाटांनी काही नागरिक गोव्यात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या गोव्यातील प्रवेशामुळे ‘डेल्टा प्लस’चा प्रवेश गोव्यात होण्याचा शक्यता आहे.
रेल्वे मार्गे येणाऱ्या प्रवाशांची खास करून तपासणी करण्यात येत आहे. आज (रविवारी) मडगाव, थिवी व करमळी या रेल्वे स्थानकावर प्रवशांची ॲन्टिजन चाचणीबाबतचे अहवाल तपासण्यात आले. प्रवशांचा राज्यात वाढता लोंढा लक्षात घेऊन सरकारने आत्तापासूनच योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.