Boma Road Expansion: भोम रुंदीकरणाची बाजू भक्कम! गावडेंपाठोपाठ आता ढवळीकरांचाही जाहीर पाठिंबा

कामधंदा नाही, तेच करतात आंदोलने
Boma-Khorlim National Highway
Boma-Khorlim National HighwayFile Photo
Published on
Updated on

Boma-Khorlim National Highway : भोम येथील रस्ता रुंदीकरणाची बाजू भक्कम होत चालली आहे. कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्यापाठोपाठ आता वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनीही रस्ता रुंदीकरणाचे जाहीर समर्थन केले आहे.

भोम येथे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रुंदीकरण हाच एकमेव उपाय आहे, यावर त्यांनी भर दिला. ज्यांना कामधंदा नाही, ते भोम येथे येऊन आंदोलने करतात, अशी तिखट प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

भोम येथील रस्ता रुंद झाला पाहिजे, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आज पर्वरी येथे सांगितले. मंत्रालयात पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी हे भाष्य केले. ते म्हणाले, भोम येथे भूसंपादन केले, तेव्हा तेथील भूखंड मोठा असल्याने काही घरांची नोंद तेथे झाली आहे.

त्या घरमालकांची नावे यादीत आली म्हणजे ती घरे पाडली जाणार, असा त्याचा अर्थ होत नाही. त्या घरमालकांना यानिमित्ताने ते त्यांचे घर आहे, हे दर्शवणारा एक दस्तावेज तयार झाला आहे. ती जमीन भाटकाराची असल्यास त्याविषयीची प्रक्रिया करण्यासाठी तो दस्तावेज त्यांना साह्यभूत ठरणार आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे.

कुंडई ते बाणस्तारी सहापदरी रस्ता होणार आहे. डेक्कन केमिकल ते जुने गोवेपर्यंत उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. भोम येथील रस्ता रुंदीकरणाचे हे काम झालेच पाहिजे. जे लोक चुकीचे काम करतात, त्यांना बाजूला सारून हे काम झाले पाहिजे. विरोध करणाऱ्यांचा विरोध हा डळमळीत आहे, असे ढवळीकर यांनी सांगितले.

उड्डाण पूल अशक्य असल्याने रुंदीकरण

भोम येथे बगल रस्ता करणे शक्य नाही, असे नमूद करून ढवळीकर म्हणाले, येथे उड्डाण पुलाची शक्यता पडताळून पाहिली होती. उड्डाण पुलाला सर्वसाधारण रस्त्याच्या दुप्पट खर्च येतो, हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला ठाऊक असते. असे असतानाही त्यांनी ही शक्यता पडताळून पाहिली आणि तेही शक्य नाही म्हणून अखेरीस रस्ता रुंदीकरणाचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.

अधिसूचनेतून ‘ती’ ७५ बांधकामे वगळू; भोमवासीयांना भेटणार

भोम येथे रस्ता रुंदीकरणाला होणाऱ्या विरोधाची धार कमी करण्यासाठी सरकारने या प्रकल्पाच्या अंतिम अधिसूचनेतून ७५ बांधकामांच्या मालकांची नावे वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी आज रात्री ही माहिती दिली. ते म्हणाले, गैरसमजातून हे आंदोलन सुरू आहे. केवळ चारच घरे पाडावी लागणार आहेत. त्यांना भूखंड घेऊन घर बांधण्यासाठी पैसे देण्यात येणार आहेत. तेथील लोकांना ज्यांची नावे प्रारूप अधिसूचनेत आली आहेत, त्‍यांचीही बांधकामे पाडली जातील अशी भीती वाटत आहे.

त्यामुळे अंतिम अधिसूचनेतून ती नावे वगळण्याचे ठरवले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग ती अंतिम अधिसूचना जारी करेल, तेव्हाच लोकांना सत्य समजेल. भोमवासीयांची तयारी असेल तर भोम येथे जाऊनही सादरीकरण करण्याची माझी तयारी आहे. लोकांपासून सरकार काही दडवणार नाही, असेही ते म्हणाले.

ढवळीकर ‘रस्ता रुंदीकरणातील खलनायक’ : ग्रामस्थ आक्रमक

भोमवासीयांनी सुदिन ढवळीकर यांना ‘रस्ता रुंदीकरणातील खलनायक’ संबोधले. बुधवारी रात्री काही भोमवासीय संघटित झाले. ते म्हणाले, ढवळीकर यांची २०११ पासून गावावर वक्रदृष्टी आहे. बहुजन म्हणून मते घेतली, याची तरी त्यांनी जाण ठेवावी. येथील डोंगर आता आमचे राहिले नाहीत.

निदान गाव तरी आमच्यासाठी राखून ठेवा. साबांखा मंत्री नीलेश काब्राल यांची गावात येण्याची हिंमत नाही. रस्ता २५, ५० की ६० मीटरचा होणार हे कोणी सांगत नाही. २०११ साली बगलमार्ग काढला असता तर प्रश्न सुटला असता. तो ढवळीकर यांच्यामुळेच सुटला नाही, असे ग्रामस्थ म्हणाले.

चर्चेतून प्रश्‍न सोडवू : गावडे

यापूर्वी मंत्री गोविंद गावडे यांनी रस्ता रुंदीकरणाचे समर्थन केले आहे. त्यांनी सांगितले की, साबांखा मंत्री नीलेश काब्राल यांनी अभ्यासपूर्वक सादरीकरण केले आहे. त्याच गोष्टी सांगण्यासाठी रविवारी मी भोमवासीयांची भेट घेतली. सरकार यात कोणाचीही फसवणूक करणार नाही.

रस्ता रुंदीकरण एका रात्रीत, महिन्यात होणार नाही. काही प्रश्न असतील तर ते चर्चेने सोडवता येऊ शकतात. काहीजणांनी राजकीय हेतूने प्रेरित होऊन गैरसमज निर्माण केले आहेत.

जत्रेच्या वेळी वाहतूक कोंडी

मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की, भोम येथे वारंवार अपघात होत असल्यामुळे येथे रस्ता रुंदीकऱण झालेच पाहिजे. आता प्रत्येक घरात वाहनांची संख्या वाढली आहे. राज्यात दर माणशी एक वाहन आहे. भोम येथील रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग आहे.

महाराष्ट्र व कर्नाटकातील वाहने याच रस्त्यावरून धावतात. तेथे मोठी वाहने आली की काय स्थिती उद्‌भवते, हे आम्ही दररोज पाहतो. जत्रेच्यावेळी होणारी वाहतूक कोंडी विसरता येणार नाही.

काब्राल यांच्या मताला दुजोरा : भोम येथे उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन होते. कुंडई ते मुस्लीमवाडा या टप्प्यात हा उड्डाणपूल होणार होता. मात्र, या मार्गावर अनेक घातक वळणे असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तो प्रस्ताव स्वीकारला नाही.

आताही नको त्या व्यक्ती या विषयात डोके खुपसत आहेत. भोम येथे रस्ता रुंदीकरणामुळे काहीच समस्या निर्माण होणार नाही. येथे चारच घरे पाडावी लागणार आहेत, याचाही पुनरूच्चार ढवळीकर यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com