Bodgeshwar Jatra: बा देवा, बोडगेश्‍‍वरा सरकारला सुबुद्धी दे! भव्य जत्रोत्सवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची वानवा

Bodgeshwar Temple Jatrotsav: जत्रोत्‍सवाच्‍या काळात हजारो भाविकांची श्रींच्‍या दर्शनासाठी भली मोठी रांग लागलेली दिसते. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत देवदर्शन सुरू असते.
Bodgeshwar Jatra
Bodgeshwar Temple JatrotsavDainik Gomantak
Published on
Updated on

Bodgeshwar Temple Jatrotsav Problems

म्हापसा: नुकतेच जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त झाले. या फेस्तासाठी सरकारी यंत्रणा महिनाभर आधीपासून तयारीला लागते. तर, दशवार्षिक शवप्रदर्शन सोहळ्यासाठी सहा महिन्यांपूर्वीच सरकारची धावपळ सुरू होते. परंतु, गोव्यातील प्रसिद्ध तसेच भक्तांचा जनसागर लोटणाऱ्या जत्रोत्‍सवांबाबत सरकारी दरबारी तेवढी उत्‍सुकता दिसत नाही. सध्‍या सुरू असलेल्‍या म्‍हापशातील श्री बोडगेश्‍‍वर देवस्‍थानच्‍या जत्रोत्‍सवात भाविकांच्‍या महासागराबरोबरच समस्‍यांचाही महापूर आलेला दिसतोय.

येथील प्रसिद्ध श्री बोडगेश्‍‍वर देवस्‍थानचा यंदाचा ९०वा जत्रोत्सव रविवारपासून सुरू झाला आहे. त्‍यानिमित्त भव्‍य फेरी भरली असून, ती पंधरा दिवस चालणार आहे. या काळात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. गोव्यातच नव्हे तर शेजारील राज्‍यांतही श्री देव बोडगेश्‍‍वराचे भक्त मोठ्या संख्‍येने आहेत.

त्‍यामुळे जत्रोत्‍सवाच्‍या काळात हजारो भाविकांची श्रींच्‍या दर्शनासाठी भली मोठी रांग लागलेली दिसते. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत देवदर्शन सुरू असते. यातून श्री बोडगेश्‍‍वर देवाची व जत्रोत्सवाची महती अधोरेखित होते. परंतु जत्रोत्सवाच्या पूर्वतयारीला प्रशासकीय यंत्रणा किंवा सरकारकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही.

ओल्‍ड गोव्‍यात सेंट फ्रान्‍सिस झेवियर शवप्रदर्शनाच्‍या निमित्ताने सरकारी यंत्रणा अगोदर सहा महिन्‍यांपासून कामाला लागली होती. मात्र म्‍हापशात तसे काही दिसून आले नाही. येथेसुद्धा जुने गोवा फेस्ताप्रमाणे लक्ष घालणे सरकारची तितकीच जबाबदारी ठरते. गर्दीमुळे मोठी दुर्घटना घडल्यास त्‍यास जबाबदार कोण? कारण प्रश्‍‍न फक्त कायद्याचा नसून संपूर्ण व्यवस्थेचा आहे. ज्या ठिकाणी आठवडाभरापेक्षा अधिक दिवस जत्रा भरते, त्‍या ठिकाणी भाविकांची गैरसोय होणार नाही याची खातरजमा करणे सरकारचे कर्तव्य ठरते.

पालिकाही उदासीन

देवस्थान समिती आपल्या परीने पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रयत्न करते. परंतु त्या पुरेशा नसतात. भर उन्‍हात भाविकांना ताटकळत थांबावे लागते. परंतु तिथे त्‍यांच्‍यासाठी पिण्याच्या पाण्याची व विक्रेत्‍यांसाठी स्नान किंवा प्रातर्विधीसाठी व्यवस्था नाही. स्थानिक म्हापसा पालिका दुकानदारांकडून सोपो वसूल करते. परंतु कचरा गोळा करण्यापलीकडे कुठलीच सुविधा त्यांना देत नाही. किमान पालिकेने पुढाकार घेऊन यास्थळी दुकानदारांसाठी शौचालयाची व्यवस्था होईल, याची खात्री करून घेणे गरजेचे असते. मात्र आत्तापर्यंतच्या जत्रोत्सवांत असे कधी घडलेले दिसत नाही. तसेच भाविकांसाठीही शौचालयाची व्यवस्था केली जात नाही.

भाविक कडक उन्‍हात

पहिल्या दिवशी श्री बोडगेश्‍‍वर देवाचा वार असलेल्या रविवारीच जत्रा आल्याने भाविकांचा प्रचंड सागर लोटला. परिणामी, त्‍यांच्‍यावर तासन्‌तास उन्हात उभे राहण्याची वेळ ओढवली. मंदिरात प्रवेश करताना त्‍यांची ओढाताण सुरू होती. सरकारची उदासीनता, दूरदृष्टीचा अभाव यामुळे भाविकांना हा मन:स्‍ताप सहन करावा लागतोय. वाहतूक कोंडीचा तर बोजवारा उडाला आहे. काही पोलिस तैनात केले म्‍हणून समस्‍या सुटत नाहीत. जुने गोवा येथील शवप्रदर्शन सोहळ्यास भेट देणाऱ्यांसाठी रस्त्यावरून चर्चमध्ये जाण्याकरिता डोक्यावर छत, चालण्यासाठी लाग रंगाचा गालिचा, जवळच पिण्याच्या पाण्याची सुविधा, तसेच आसपासच्या परिसरात शौचालयांची सुविधा पण जत्रोत्‍सवाच्‍या ठिकाणी यापैकी काहीच नाही.

Bodgeshwar Jatra
माटव मेड! गोव्याच्या जत्रेतील असा विधी ज्याशिवाय व्यापारी दुकानही थाटत नाहीत

१२०० पेक्षा अधिक दुकानदार वाऱ्यावर

जत्रोत्सवात लाखोंच्या संख्येने लोक असतात, मग त्यांनाही तेवढ्याच चांगल्या व्यवस्था, सोयीसुविधा नकोत का? श्री बोडगेश्‍‍वर जत्रोत्सवानंतर आता लवकरच शिरगाव येथील श्री लईराई देवीचा होमकुंड जत्रोत्सव होणार आहे. या जत्रेलाही भाविकांची तोबा गर्दी उसळते. अशा जत्रोत्सवांनिमित्त सरकार सार्वजनिक सुट्टी देत नाही किंवा भाविकांसाठी विशेष काही करताना दिसत नाही. श्री बोडगेश्‍‍वराच्‍या जत्रोत्‍सवात मनोरंजनात्मक करमणुकीसह विक्रेत्यांचे जवळपास १२०० पेक्षा अधिक दुकाने आहेत. त्यामुळे या जत्रोत्सवाची व्याप्ती किती मोठी आहे, याचा अंदाज येतो.

Bodgeshwar Jatra
Bodgeshwar Jatra: श्री देव बोडगेश्वर चरणी लोटला जनसागर; 90 व्या जत्रोत्सवाला सुरवात

भाविक महिलांची कुचंबणा

गोव्‍यात अशी काही प्रमुख देवस्‍थाने आहेत की तेथील जत्रोत्‍सवांना, उत्‍सवांना भाविकांची मोठी गर्दी उसळते. पण त्‍यांच्‍या सोयीसाठी सरकारकडून कोणत्‍याच सोयीसुविधा पुरविल्‍या जात नाहीत. परिणामी या भाविकांची विशेषत: महिलांची प्रचंड कुचंबणा होते.

देवस्थान समिती आपल्या परीने साधनसुविधा उभारण्याचा प्रयत्न करते. मात्र आमच्याकडे एवढी मोठी यंत्रणा नाही. सरकारने आपणहून यंत्रणा उभारली तर अनेक प्रश्‍‍न मार्गी लागू शकतात. जुने गोवे फेस्तसाठी सरकार अर्थसाहाय्य देते, आपली प्रशासकीय यंत्रणा राबवते. मग हिंदूंचे जत्रोत्सव किंवा सणांसाठी का नाही? फेस्तासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते, मग राज्‍यातील महत्त्‍वाच्‍या जत्रोत्‍सवांसाठी ५० लाखांपर्यंत तरतूद करायला काय हरकत आहे?

आनंद भाईडकर, (अध्यक्ष : श्री देव बोडगेश्‍‍वर देवस्थान समिती)

म्हापसा पालिका केवळ महसूल गोळा करते. कचरा उचलण्यापलीकडे पालिकेची भूमिका नसते. वास्‍तविक पालिकेला पुढाकार घेऊन जत्रोत्‍सव परिसरात भाविक, विक्रेत्‍यांसाठी शौचालयांची व्यवस्था करता आली असती. पण तसे काही झ्राले नाही. जत्रोत्सवाच्या नियोजनात कमतरता प्रकर्षाने जाणवली. सरकारने स्थानिक पालिकेला सूचना करून भाविकांना किमान पिण्‍याचे पाणी तरी उपलब्‍ध करून द्यावे.

संजय बर्डे, स्थानिक

आम्ही दुकाने, स्‍टॉल्‍स थाटतो, परंतु अपेक्षित सुविधा मिळत नाहीत. नैसर्गिक विधीसाठी उघड्यावर जावे लागते. शौचालये आहेत, परंतु ती सर्वांना पुरणारी नाहीत. त्‍यामुळे महिलांची मोठी कुचंबणा होते. जत्रोत्सवाच्‍या नियोजनात व व्यवस्थापनात थोडा बदल करणे गरजेचे आहे.

जयेश परब, दुकानदार

रविवारी देवाचा दिवस व जत्रेचा पहिला दिवस असल्याने मोठी गर्दी उसळली होती. त्यामुळे आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे होते. सरकारकडून अर्थसाहाय्याची गरज नाही. कारण देवस्थान समितीकडे पुरेसा फंड आहे व भक्तगण सढळ हस्ते देणगी देतात. तसेच पार्किंगसाठी बऱ्यापैकी जागा आहे. मात्र त्याचा वापर योग्यरित्या करणे गरजेचे असते. शिवाय शेतकरीवर्गाकडून चांगले सहकार्य मिळते. पर्यटन विभागाकडून शौचालयांसाठी मदत घेता येऊ शकते. म्हापसा-कळंगुट रस्‍तारुंदीकरणाचे काम जत्रेच्या वेळीच हातात घेतले गेले. हे काम थोड्या दिवसांनी सुरू करता आले असते, तर चालले असते. कारण या कामामुळे वाहतुकीत अचडण निर्माण होत आहे.

अ‍ॅड. महेश राणे, स्थानिक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com