वास्को : झुवारीनगर येथील झुवारी अॅग्रो केमिकल्स लिमिटेड या खत कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात तीन कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बोकारो इंडस्ट्रियल या कंत्राटदार कंपनीच्या साईट सुपरवायझर ए प्रधान याला पोलिसांनी अटक केली आहे. निष्काळजीपणाचा ठपका ठेवून 304 (अ), 336 कलमाखाली त्याला अटक करण्यात आली.तर बोकारो इंडस्ट्रियल या कंत्राटदार कंपनीच्या आणि झुवारी अॅग्रो केमिकल्स लिमिटेड या कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. काल मंगळवारी कारवाई करुन या कंपनीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
एका टाकीचा बोल्ट काढण्यासाठी हॉट गॅस कटरचा वापर करण्यात आला होता. झुआरीनगर येथील झुआरी अॅग्रो केमिकल्स खत कारखान्यात टाकीमध्ये तयार झालेला गॅसमुळे भीषण स्फोट होऊन तीन कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला होता. ही दुर्घटना मंगळवारी दुपारी 2.45 वाजता घडली होती. यात इंद्रजीत घोष (40, मूळ पश्चिम बंगाल), रंजन चौधरी (28, मूळ बिहार), अवकाश करण सिंग (32 पंजाब) या तिघांचा मृत्यू झाला होता.
ज्वालाग्राही रसायनांचा वापर ज्या ठिकाणी होतो, त्या ठिकाणी धातू कापण्यासाठी हॉट गॅस कटरचा वापर केला जात नाही. त्यासाठी कोल्ड गॅस कटर वापरले जाते. यातून स्पार्किंग होऊन आगीच्या ठिणग्या उडत नाहीत. म्हणूनच अशा धोकादायक ठिकाणी 'कोल्ड गॅस कटिंग' सर्वांत सुरक्षित मानली जाते. या कामगारांनी बोल्ट काढण्यासाठी कोल्ड गॅस कटरचा वापर केला असता तर सुदैवाने तीन मजुरांचा प्राण वाचला असता. तसेच सेफ्टी बेल्टचा वापर केला असता तरी त्यांचे प्राण वाचले असते, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
वेर्णा पोलीस याविषयी अधिक चौकशी करत आहेत. या अपघातामुळे 2011 साली घडलेल्या नाफ्ता वाहिनीच्या स्फोटाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. टाकीचा वरचा भाग संपूर्णपणे बंद केलेला असतो. त्यामुळे तेथील बोल्ट काढण्यासाठी कामगारांनी 'हॉट गॅस' कटर वापरला. परिणामी टाकीमध्ये गॅस तयार होऊन त्याचा भीषण स्फोट झाला. यात तिन्ही कामगार उसळून टाकीपासून सुमारे 30 मीटर अंतरावर जमिनीवर आपटून जखमी झाले.
दरम्यान मृत व्यक्तींची कुटुंबं उद्या गोव्यात पोचणार असून शवचिकित्सेनंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात देणार असल्याचे पोलीस निरीक्षक डायगो ग्रेसियस यांनी सांगितले आहे. मृतदेह मडगाव होस्पिसियो इस्पितळात ठेवण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.