Bicholim : तालुक्यातील कुडणे गावात काळ्या तांदळाची शेती फुलत असून, शेतकऱ्यांनी प्रथमच केलेला प्रयोग यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. कृषी खात्याच्या तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्थेच्या (आत्मा) सहकार्याने कुडणेतील सुभाष मळीक, दिनेश गुरव या दोन शेतकऱ्यांनी जवळपास ८०० चौरस मीटर वायंगण शेतजमीन काळ्या तांदळाच्या लागवडीखाली आणली आहे. ही शेती चांगली बहरली आहे.
काळे तांदूळ हे धार्मिक कार्यासह आरोग्यासही उपयुक्त आहेत. अनेक रोगांवर काळे तांदूळ गुणकारी असल्याचे मानले जाते. काळ्या तांदळांना भावही चांगला असून, सध्या ३५० ते ४०० रुपये किलो असा या दर आहे. या शेतीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.
कृषी खात्याचे मार्गदर्शन
कृषी खात्याच्या ‘आत्मा’ अंतर्गत काळ्या तांदळाची भातशेती करण्यासाठी सुभाष मळीक आणि दिनेश गुरव हे शेतकरी पुढे सरसावले. त्यांना कृषी कार्यालयाच्या विभागीय कृषी अधिकारी निलिमा गावस, सहायक अधिकारी पंकज पोकळे, ‘आत्मा’च्या तंत्रज्ञान व्यवस्थापक पूनम महाले, सुरेंद्र बेतकीकर आणि अन्य कर्मचाऱ्यांनी योग्य मार्गदर्शन करून या शेतकऱ्यांना काळ्या तांदळाचे बियाणे उपलब्ध करुन दिले.
काय आहे काळा तांदूळ?
हा तांदूळ सर्वसाधारण तांदळासारखा असला तरी रंगाने काळा आहे. या तांदळाचे उत्पादन पूर्वी चीनमध्ये केवळ राजपरिवाराच्या वापरासाठी होत असे. सर्वसामान्यांना मज्जाव असल्याने ‘फॉरबिडन राइस’ अशीही त्याची पाश्चात्त्य देशात ओळख आहे. कालांतराने तो अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोपमध्ये व नंतर उत्तर-पूर्व भारतात आला.
कुडणेत केलेली काळ्या तांदळाच्या लागवडीचा प्रयोग यशस्वी ठरत आहे. यापासून अन्य शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. कुडणेप्रमाणेच तालुक्यातील अन्य भागातही खरीप हंगामात काळ्या तांदळाची भातशेती लागवड करण्यासाठी भर देण्यात येणार. कुडणेत भातशेती पिकल्यानंतर बियाणेही उपलब्ध होणार आहे.
- पूनम महाले, तांत्रिक व्यवस्थापक, आत्मा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.