पणजी : काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढ़ी यांनी रविवारी गोव्यातील अल्पसंख्याकांना अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि समाजाच्या हितासाठी गोव्यात ‘अल्पसंख्याक आयोग’ स्थापन करण्याचे आश्वासन दिले.
प्रतापगढ़ी यांनी रविवारी पणजी येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले आणि सांगितले की, गोव्यातील अल्पसंख्याकांच्या समस्या सोडवण्यात भाजपला अपयश आले आहे. ‘‘अनेक लोकांना भेटल्यानंतर आणि त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर मला समजले की भाजपने या 10 वर्षात अल्पसंख्यांकासाठी काहीही केलेले नाही.’’ असे ते म्हणाले.
यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस (Congress) समितीच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष नजीर खान आदी उपस्थित होते. इम्रान प्रतापगढ़ी म्हणाले की, अल्पसंख्याक आयोग ही काळाची गरज आहे. "मी वचन देतो की आमचे सरकार सत्तेवर आल्यावर आम्ही ते स्थापन करू. कबरास्तानचे प्रश्नही प्रलंबित आहेत. या समस्या सोडवायला हव्यात आणि काँग्रेस ते करून दाखविणार. येथील ज्या समस्या आहेत त्या बद्दल मी राहुल गांधी यांच्याशी बोलणार आहे."असे ते म्हणाले.
भाजप सरकारने (BJP government) लोकशाहीची हत्त्या केली आहे. यासाठी आम्हाला लोकशाही आणि संविधान वाचवण्याची गरज आहे. ते नष्ट करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजप गोव्याचा (goa) वारसा आणि अस्मिता खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. ही लढाई आपली लोकशाही वाचवण्यासाठी आहे. " असे प्रतापगढ़ी म्हणाले. ते म्हणाले की गोव्यातील वातावरण जगात सर्वांना आवडते. ‘‘पण भाजप (bjp) सरकार गोव्यात कोल हब उभारण्याचा प्रयत्न करत आहे. गोव्यात कोळसा आणून भाजप गोव्याचे वातावरण बिघडवेल. भाजपची जनविरोधी धोरणे थांबवायला हवीत.’’ असे ते म्हणाले.
युवकांना नोकऱ्या देण्यात आणि इतर प्रश्न सोडवण्यात भाजप अपयशी ठरल्याने लोकांमध्ये भाजपवर नाराजी आहे. “भाजपला माहित आहे की लोक काँग्रेसला मतदान करतील कारण ते सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले आहे. त्यामुळे काँग्रेसची मते फोडण्यासाठी भाजपने गोव्यात टीएमसी (TMC) आणि आपला आणले आहे.’’ असा आरोप त्यांनी केला. नाझीर खान म्हणाले की, भाजप नेते उरफान मुल्ला यांनी अल्पसंख्याकांना भेडसावणाऱ्या सर्व समस्यांवर दुर्लक्ष केले आहे. ‘‘ते भाजपसाठी काम करून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी काहीही करत नाहीत.’’ असे आरोप खान यांनी केला. तसेच “भाजपकडून अल्पसंख्याकांना धोका आहे.’’ असे ते म्हणाले.
दरम्यान, इम्रान प्रतापगढ़ी यांनी ओल्ड गोवा येथील वारसा स्थळावर उभारलेल्या बेकायदा बांधकामाला विरोध करणाऱ्या लोकांची भेट घेतली आणि गरज पडल्यास कायदेशीर मदत करण्याचे आश्वासन दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.