Goa Politics: घराणेशाहीच्या विरोधात देशभरात मोहीम छेडून भाजपने सत्ता मिळवली आहे. परंतु गोव्यातील भाजपमधील घराणेशाही अपवाद असल्याचे पक्षश्रेष्ठीने अनेकदा स्पष्ट केले आहे. तरी देखील आजही पक्षांतर्गत घराणेशाहीला विरोध होत आहे. असाच प्रकार सध्या मडगाव भाजप मंडळात सुरू आहे.
काँग्रेस सोडून आलेले मडगावचे आमदार दिगंबर कामत आपल्या मुलगा योगीराजला मडगावतील भाजप तिकीट मिळावे, यासाठी प्रयत्नशील आहेत. खुद्द दिगंबर राव लोकसभा किंवा राज्यसभेवर जाण्याची शक्यता असल्याने मडगाववर आपली पकड कायम ठेवण्यासाठी हा खटाटोप चालला आहे.
मात्र मडगाव मंडळातील शर्मद रायतुरकर, रुपेश माहात्मे, मनोज मसुरकर, चंदन नायक, महेश आमोणकर यांनी योगीराज कामतला तिकीट देण्यास आतापासून विरोध सुरू केला आहे. तिकीट ही पात्रतेवर देण्यात यावी, कारण मडगाव मंडळात काम केलेल्या व्यक्तीला तिकीट दिली जाते. मात्र केवळ आपले वडील आमदार आहेत,
म्हणून एखाद्याला तिकीट देणे चुकीचे आहे. कारण हे घराणेशाहीला आणखी वाव देणारे असल्याचे विरोध करणारी मंडळी तर्क देत असल्याची चर्चा सध्या पक्षात सुरू आहे.
शहांबाबत इतका विश्वास
म्हादई प्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांनी हुबळीत केलेले वक्तव्य गोवा सरकारच्या अडचणी वाढवणारे ठरले आहे. त्या निवेदनाचा निषेधही करता येत नाही आणि त्याला पाठिंबाही देता येत नाही, अशी अवस्था गोव्यातील भाजप नेत्यांची बनली आहे. दोन आमदारांनी त्याबाबत जे वक्तव्य केले, त्याला तसा कोणताच अर्थ नाही.
पण काही विरोधी नेत्यांनी मात्र शहांनी जे काय वक्तव्य केले, ते खरेच असेल असे छातीठोकपणे सांगितले. त्यामुळे राज्यातील अनेकांच्या भुवया उंचावल्या, हे मात्र खरे. कारण सदर नेता एकेकाळी भाजपबरोबर होता, त्यावेळी त्यांचे अमित शहाशी घनिष्ठ संबंध होते.
त्यामुळे त्यांच्या वागण्याची त्यांना चांगली माहिती असल्यानेच ते जे काय बोलले ते खरेच असेल, असे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले असावे, असे मानले जाते.
गाड्यांवर सिलिंडरचा सर्रास वापर
म्हापसा येथे एका गाड्यांवर झालेल्या सिलिंडर स्फोटानंतर अशा सिलिंडर वापराबाबत संबंधित यंत्रणा खडबडून जागी झालेली आढळून येते. हेच नव्हे, तर असे प्रकार घडल्यानंतरच हालचाली सुरू होतात. मुद्दा एवढ्यावर थांबत नाही, तर उघड्यावर खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या गाड्यांवरही अशा प्रकारे सिलिंडरचा वापर सुरू असतो.
पण संबंधित यंत्रणाच केवळ नव्हे, तर पालिका-पंचायतीही त्याकडे दुर्लक्ष करत असतात. गोष्टी एवढ्यावर थांबत नाहीत तर हे सिलिंडर व्यावसायिक नव्हे, तर घरगुती वापराचे असतात, असे आढळून येते.
‘एम्प्रेगाद’ खूष झाले !
‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन’ अशीच खुशी आपल्या देशातील ‘एम्प्रेगाद’ म्हणजे सरकारी व इतर नोकरदारांची झाली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात आयकरात सरकारने मोठी सूट जाहीर केल्याने सरकारी कर्मचारी खूष आहेत. पूर्वी दीड लाखापर्यत शून्य कर होता, आता तीन लाखांपर्यंत आयकर असणार नाही.
शिवाय आयकर स्लॅब वाढविण्यात आल्यामुळे सरकारी नोकर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना धन्यवाद द्यायला लागले आहेत.
2024 सालात होणाऱ्या निवडणुकीवर डोळा ठेवून तयार केलेला अर्थसंकल्प अशी टीका विरोधक करीत असले तरी नोकरदार म्हणतात ‘काश हर साल चुनाव होते, तो कितना अच्छा होता!’ काही का असेना आता सरकारी बाबूच्या खिशात पैसे खुळखुळणार तर.
‘ओटीएस’ योजनेमुळे कोणाची चांदी...
सध्या पाण्याची थकीत बिले चुकती करण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या ‘ओटीएस’चा लाभ घेण्यासाठी गर्दी उसळत आहे. सरकारने ही योजना आता फेब्रुवारी अखेरपर्यत विस्तारीत केली आहे. मात्र ही योजना नेमकी कोणासाठी असे सवाल केले जाऊ लागले आहेत.
कारण बिले थकलेली आहेत, ती लाख वा कोटीची. अर्थात ती मोठ्या उद्योगाची वा बड्या असामींची असणार, ती सर्वसामान्यांची नसणार हे ओघानेच आले. खात्यातील लोकांच्या म्हणण्याप्रमाणे वर्षानुवर्षे बिले थकवायची व नंतर अशी सवलत पदरी पाडून घ्यावयाची ही आता सवय होऊन गेली आहे. या ‘ओटीएस’मुळे या मंडळींना अच्छे दिन आले हे मात्र खरे.
म्हादईमुळे नवागतांची कोंडी
म्हादईमुळे सध्या राज्यातील सामाजिक व राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. अन्य सगळे मुद्दे सध्या पिछाडीवर गेले आहेत. त्याचा सर्वाधिक फटका काँग्रेसमधून सत्ताधारी पक्षात आलेल्या आमदारांना बसला आहे.
त्यांच्या पेक्षाही या मंडळींचे समर्थक नाराज झालेले आहेत. कारण त्यांनी रचलेले मनोरथ आता दिवस जातात, तसे ढासळू लागले आहेत. कारण पक्षांतर केलेल्या आमदारांपेक्षाही त्यांच्या समर्थकांच्या मनीषा मोठ्या होत्या.
पण आमदारांना कोणतेही पद मिळत नाही, की भाजपात त्यांची विशेष दखल घेतली जात नसल्याने ही मंडळी चिंताग्रस्त झाली आहे. म्हादईचा गुंता सुटेपर्यंत, ही स्थिती बदलणार नाही, असे ते खासगीत बोलू लागले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.