Sonali Phogat Death Case: सोनाली फोगट हत्या प्रकरणातील आरोपी सुखविंदरला जायचंय हरियाणाला, न्यायालयात याचिका
हरियाणाच्या भाजप नेत्या, टिकटॉक स्टार सोनाली फोगट यांच्या हत्येतील आरोपी सुखविंदरला हायकोर्टातून 03 मे रोजी जामीन मिळाला आहे. न्यायालयाच्या अटीनुसार तो गोवा सोडू शकत नाही. तसेच, दर आठवड्याला त्याला स्थानिक पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागते. पण, सुखविंदरला आता त्याच्या मूळगावी हरियाणाला 15 दिवस जाण्याची इच्छा आहे.
सुखविंदरने हरियाणाला जाण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. 27 जून रोजी त्यांचे वकील सुखवंत सिंग डांगी यांच्यामार्फत न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. सुखविंदरच्या याचिकेवर आज (दि.13) न्यायालयात सुनावणी होणार आहे.
सुधीरलाही मिळाला आहे जामीन
सोनाली फोगट हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुधीर सांगवान यालाही 23 जून रोजी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सुधीर देखील गोव्यात बाहेर जाऊ शकत नाही. 10 महिन्यांनंतर त्यांचा जामीन मंजूर झाला आहे.
गोव्यात 22-23 ऑगस्ट 2022 रोजी सोनाली फोगट यांची हत्या झाली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर हे गोव्यात होते. सुधीर आणि सुखविंदरने त्यांची हत्या केल्याचा सोनालीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे.
सुधीरला सोनालीची मालमत्ता हडपायची असल्याने त्याने सोनाली यांना गुंगीचे औषध देऊन जीवे मारले. जबरदस्तीने अमली पदार्थ पाजल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला.
सोनालीचा भाऊ रिंकू याने गोवा पोलिसांत सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांच्याविरुद्ध खुनाची तक्रार दाखल केली. सोनालीच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळून आल्या.
गोवा पोलिसांनी सोनालीचे पीए सुधीर सांगवान आणि त्याचा साथीदार सुखविंदर यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच, रिसॉर्ट मालक आणि अमली पदार्थ पुरवठादारासह 5 जणांना अटक करण्यात आली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.