Goa BJP: भाजपचेच पदाधिकारी 'या' घोटाळ्‍यात कसे? 'Cash For Job'वरुन विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Cash For Job Scam: कॅश फॉर जॉब घोटाळ्यात भाजप कार्यकारिणीवरील काही पदाधिकाऱ्यांचीच नावे पुढे आल्‍यामुळे भाजप पक्षाची नाचक्‍की सुरू झाली आहे. विराेधकांनी या मुद्यावरून सरकारला लक्ष्‍य करणे सुरू केले आहे.
Yuri Alemao, Vijai Sardesai
Yuri Alemao, Vijai SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

Opposition targets BJP government over Cash For Job Scam

मडगाव: कॅश फॉर जॉब घोटाळ्यात भाजप कार्यकारिणीवरील काही पदाधिकाऱ्यांचीच नावे पुढे आल्‍यामुळे भाजप पक्षाची नाचक्‍की सुरू झाली आहे. विराेधकांनी या मुद्यावरून सरकारला लक्ष्‍य करणे सुरू केले आहे. भाजपचेच पदाधिकारी या घोटाळ्‍यात कसे, असा सवाल विरोधकांनी करण्‍यास सुरू केले आहे.

फोंडा येथील १.२० कोटी रुपयांच्‍या सरकारी नाेकरी घाेटाळ्‍यात श्रुती प्रभुगावकर हिला अटक केल्‍याने या चर्चेला ऊत आला आहे. श्रुती प्रभुगावकर ही लग्‍नापूर्वी उत्तर गोव्‍यातील भाजपच्‍या युवा माेर्चाची कार्यकर्ती हाेती. तिचे लग्‍न नुवे येथे राहणाऱ्या एका व्‍यक्‍तीशी झाल्‍यानंतर ती नुवेतील भाजप कार्यात काही काळ सक्रिय हाेती. भाजपच्‍या नुवे महिला मोर्चाची ती माजी अध्‍यक्ष असून नुवेच्‍या भाजप मंडळावरही ती पदाधिकारी होती, असे सांगण्‍यात येते.

यापूर्वी काणकोण येथे एका युवतीला सार्वजनिक बांधकाम खात्‍यात अभियंत्‍याची नोकरी देण्‍याचे आमिष दाखवून लुटल्‍याचे प्रकरण पुढे आले होते. या प्रकरणात भाजपच्‍या दक्षिण गोवा इतर मागासवर्गीय विभागाचा माजी उपाध्‍यक्ष पराग रायकर याला अटक झाली होती. आता आणखी एका पदाधिकाऱ्याचे नाव या घोटाळ्यात पुढे आल्‍याने विरोधकांनी भाजपला लक्ष्‍य करणे सुरू केले आहे.

‘भाजप’ने नैतिक अधिकार गमावला; विजय सरदेसाई

‘कॅश फॉर जॉब’ घाेटाळ्‍यात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हेच गुंतलेले असल्‍याचे आता पुढे येऊ लागले आहे. ही सर्व परिस्‍थिती पाहिल्‍यास भाजपने गोव्यावर राज्य करण्याचा आपला नैतिक अधिकार गमावला आहे, अशी टीका गाेवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी केली.

ज्‍यांनी नोकरीसाठी पैसे दिलेत आणि स्‍वत:ला नागवून घेतले त्‍यांच्‍याप्रती मला किंचितही सहानुभूती नाही. कारण नोकरी मिळविण्‍यासाठी पैसे देऊन तेही या गुन्‍ह्यात सहभागी झाले आहेत. मला चिंता जर कुणाची वाटत असेल तर ती या नोकऱ्या मिळविण्‍यासाठी ज्‍या हजारो गोमंतकीय युवक-युवतींनी परीक्षा दिली आणि ते पात्र असतानाही त्‍यांच्‍या हातच्‍या नोकऱ्या अशा हिरावून घेतल्‍या आहेत त्‍यांची.

आता याला अटक केली त्‍याला अटक केली, असे सांगितले जाते. मात्र, ज्‍या पात्र उमेदवारांवर अन्‍याय झाला त्‍यांचे काय, असा सवाल करून या युवकांना न्‍याय मिळायचा असेल तर ही संपूर्ण भरती प्रक्रिया थांबवून ती नव्‍याने सुरू करण्‍याची गरज सरदेसाई यांनी पुन्‍हा एकदा व्‍यक्‍त केली. यासाठी आता राज्‍यपाल पी.एस. श्रीधरन पिल्‍लई यांनी हस्‍तक्षेप करून ही भरती प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे.

राजकारण्यांच्या सहभागाबाबत चौकशी करा; युरी आलेमाव

‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात अटक झालेल्या संशयितांचा राजकारण्यांशी काही संबंध आहे का, याची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे. समाजमाध्यमातील ‘एक्स’ या प्लॅटफॉर्मवरून त्यांनी ही मागणी केली आहे.

युरी यांनी म्हटले आहे की, सत्तेतील मुख्य एजंटांना वाचवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संशयितांची साखळी तोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आपण सर्व पीडितांना विनंती करतो की, त्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे. काँग्रेस पक्ष व आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू. ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळा उघड झाल्यापासून दररोज एक-एक प्रकरण बाहेर येत आहे. तक्रार दिल्यास आपल्यामागे पोलिसांचा ससेमिरा लागेल किंवा आपणास अटक होईल, या भीतीने काहीजण तक्रार देण्यास घाबरतात.

‘नोकरी घोटाळ्‍या’त भाजपचेच पदाधिकारी कसे? खुलासा करा!

सध्‍या गोव्‍यात सुरू असलेल्‍या ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्‍यात विरोधकांनी सरकारवर टीका केल्‍यामुळे भाजप प्रवक्ते विरोधकांना दोष देत आहेत. मात्र, आता या घोटाळ्‍यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नावे पुढे येत असल्याने त्याबाबत त्यांनी खुलासा करावा, असे जाहीर आव्‍हान बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्‍हिएगस यांनी दिले आहे.

यापूर्वी या नोकरी घाेटाळ्‍यात भाजपच्‍या इतर मागासवर्गीय विभागाचा उपाध्‍यक्ष असल्‍याचे पुढे आले होते. आता नुवे महिला मोर्चाच्‍या माजी अध्‍यक्षांचे नाव पुढे आले आहे. भाजप कार्यकर्त्यांची, मंडल अध्यक्षांची नावे नोकरीच्या घोटाळ्यात ऐकू येत आहेत आणि त्यांना पोलिसांनी अटकही केली आहे. त्‍यामुळे आता भाजप पक्षाच्या प्रवक्त्यांनी यावर लोकांकडे खुलासा करण्‍याची गरज आहे, असे व्‍हिएगस यांनी म्‍हटले आहे. या घाेटाळ्यात भाजपचे कार्यकर्तेही बळी ठरले आहेत. भाजप कार्यकर्त्यांकडूनही नोकरी देण्‍यासाठी पैशांची मागणी करण्‍यात आल्‍याचे ऑडिओ व्‍हायरल झाले आहेत, असे त्‍यांनी म्‍हटले आहे.

Yuri Alemao, Vijai Sardesai
Cash For Job Scam: प्रिया यादवचे गुन्हे मोजून संपेनात!! डिचोलीमधून १८ लाखांची फसवणूक उघडकीस

सध्याच्या सरकारमध्ये काहीच चांगले नाही, त्‍यामुळे आम्ही आता हा मुद्दा राज्यपालांकडे नेणार आहोत. त्‍यासाठी मी उद्या राज्यपालांची भेट मागितली आहे. भाजप सरकार गोव्यातील युवकांच्‍या भविष्याशी खेळत आहे, असा आरोप व्‍हिएगस यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com