

म्हापसा: ‘बर्च दुर्घटना’ ही उच्चस्तरीय प्रकरण असल्याने, साध्या कर्मचाऱ्यांना यात अडकवून ज्या खरोखर क्लबसंदर्भात निर्णय घेणाऱ्या व्यक्ती होत्या, त्यांचा नामोल्लेख हणजूण पोलिसांकडून कुठेही झालेला दिसत नाही. आर्थिकदृष्ट्या उच्च व्यवस्थापक व्यक्तींना संरक्षण देण्याचा प्रयत्न झाल्याचा युक्तिवाद अॅड. विनायक पोरोब यांनी केला.
बर्च क्लब दुर्घटनेत सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या राजीव कुमार मोडक यांच्या जामीन अर्जावर म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयात युक्तिवाद झाले. मोडक यांच्यातर्फे अॅड. विनायक पोरोब (अर्जदार-बचाव पक्ष) यांनी युक्तिवाद केले. त्यानुसार याप्रकरणाची पुढील सुनावणी ही येत्या गुरुवारी (८ जानेवारी) सकाळपर्यंत तहकूब करण्यात आली.
यादिवशी सरकारी पक्षाकडून जामिनावर युक्तिवाद केला जाणार आहे. ‘पोलिसांनी संशयितांना अटक केल्यानंतर त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी आम्हाला (अर्जदार-बचाव पक्ष वकिलास) संशयितापर्यंत पोहचण्यास योग्य अॅक्सेस मिळाला नाही. पोलिस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडीत देखील कारागृहाच्या गेटवर वकिलास आपल्या अशिलास भेटण्यासाठी चार-चार तास प्रतीक्षा करावी लागली’, असे अॅड. पोरोब यांनी न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले.
सोमवारी, युक्तिवादावेळी अॅड. पोरोब म्हणाले, राजीव कुमार मोडक यांचा थेट बर्च क्लबच्या दैनंदिन व्यवहाराशी थेट सहभाग नाही. राजीव मोडक हे कॉर्पोरेट मुख्य जनरल व्यवस्थापकपदी असले तरी हडफडे येथील बर्च क्लबमधील दैनंदिन व्यवहारांशी मोडकचा संबंध येत नाही. बर्च दुर्घटनेच्या चौदा दिवस आधीच, मोडक हे बर्च क्लबचे फक्त कामकाज पाहण्यास गोव्यात मध्य प्रदेशमधून आले होते.
हणजूण पोलिसांनी राजीव मोडक यांना अकारण या दुर्घटनेत अटक केली. मोडक यांच्यावरती इतर पदानुक्रम निर्णय घेणारे व्यवस्थापक होते. बर्च क्लबची दैनंदिन व्यवहाराची जबाबदारी ही ऑपरेशनल मॅनेजर बिजय कुमार सिंग यांच्यावर होती.
तसेच इतर बर्चचे ऑपरेशनल हेड, सहयोगी उपाध्यक्ष यासारखे इतर पदानुक्रम व्यक्ती मोडक यांच्यावरती पदावर होते. मात्र, पोलिसांनी या व्यक्तींचा नामोल्लेख या दुर्घटनेविषयी वगळला.
बर्च क्लबविषयी खरोखर निर्णय घेणाऱ्या व्यक्तींचा नामोल्लेख टाळून साध्या कर्मचाऱ्यांना यात गोवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.
बर्च क्लबच्या दैनंदिन ऑपरेशनची जबाबदारी इतरांवर होती, म्हणजे क्लबच्या व्यवस्थापनासाठी इतर पदानुक्रम होते. मुळात दुर्घटनेच्या दिवशी जबाबदार असलेला ऑपरेशनल मॅनेजर बिजय कुमार सिंग हा क्लबस्थळी हजर होता. मात्र, अग्निकांड घडताच, तो पळाला.
तसेच गोव्यातून त्याने पलायन केले. असे असताना, हणजूण पोलिसांनी बिजय कुमार सिंग याच्यावर गुन्हा किंवा याप्रकरणात त्यास संशयित बनवले नाही, असा युक्तिवाद अॅड. पोरोब यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.