Birch By Romeo Lane Fire: 25 मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 15 लाख! ‘बर्च’ अग्निकांडात लुथरा बंधूंचा उच्च न्यायालयात भरपाईचा मोठा प्रस्ताव

Birch By Romeo Lane Fire Case: मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने या प्रस्तावाची नोंद घेत पीडितांच्या कुटुंबीयांना भरपाईचा प्रस्ताव मान्य आहे की नाही, याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
Birch By Romeo Lane Fire Case
Birch By Romeo Lane FireDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाईट क्लबमधील भीषण आग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि क्लबचे मालक सौरभ लुथरा व गौरव लुथरा यांनी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या २५ जणांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १५ लाख रुपये भरपाई देण्याची तयारी दर्शविली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने या प्रस्तावाची नोंद घेत पीडितांच्या कुटुंबीयांना भरपाईचा प्रस्ताव मान्य आहे की नाही, याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, आगीत मृत्यू झालेल्या आस्थापनातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना यापूर्वीच प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. भरपाईच्या मुद्द्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे निर्देश देत न्यायालयाने पुढील सुनावणी १२ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली. ‘बर्च बाय रोमिओ लेन’ या नाईट क्लबमध्ये ६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत २५ जणांचा गुदमरून मृत्यू झाला, तर ५० हून अधिक जण जखमी झाले होते.

तपासादरम्यान क्लबचे बांधकाम अनधिकृत असल्याचे तसेच आपत्कालीन बाहेर पडण्याच्या मार्गांची कमतरता आणि अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे तपासात समोर आल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, सत्र न्यायालयाने लुथरा बंधूंना जामीन मंजूर केला होता. मात्र, तपासातील निष्काळजीपणा आणि गंभीर सुरक्षा त्रुटींच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने सौरभ लुथरा, गौरव लुथरा आणि त्यांचा भागीदार अजय गुप्ता यांचा जामीन रद्द केला.

त्याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिल्यानंतर तिघांनी १४ सप्टेंबर २०२६ रोजी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले. सध्या तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.

आरोपींनी सर्व २५ मृतांच्या वारसांना प्रत्येकी १५ लाख रुपये भरपाई देण्याचा प्रस्ताव न्यायालयात मांडला आहे. उच्च न्यायालयाने त्याची नोंद घेतली आहे. पीडितांच्या वारसांच्या वकिलांची प्रकृती ठीक नसल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या २५ मृतांपैकी २० जण आरोपींच्या क्लबमधील कर्मचारी, तर पाच जण पर्यटक होते. या सर्व बाबींचा न्यायालय विचार करेल.

- ॲड. देविदास पांगम, राज्याचे महाधिवक्ता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com