Bicholim Factory Explosion : डिचोलीतील दुर्घटना; कारखान्यात सलग चार स्फोट

Bicholim Factory Explosion : अर्धा किलोमीटरपर्यंत घरांना प्रचंड हादरे : जीवितहानी टळली
Bicholim Factory Explosion
Bicholim Factory ExplosionDainik Gomantak

Bicholim Factory Explosion :

डिचोली, येथे पोलाद उत्पादन करणाऱ्या ‘ऑरेंज फॉक्स स्टील’ या कुंदन शेट्ये यांच्या मालकीच्या कारखान्यात एकाचवेळी सलग चार स्फोट झाल्याने लगतच्या सुमारे अर्ध्या किलोमीटर परिसराला जबरदस्त हादरे बसले.

कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने परिसरातील लोक भयभीत झाले. मात्र, या दुर्घटनेत जीवितहानी टळली, अशी माहिती मिळाली.

शहरापासून जवळच असलेल्या मुस्लिमवाड्यानजीक रोलिंग मिल परिसरात

आज (गुरुवारी) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सलग चार स्फोट झाले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि मागाहून पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान तसेच पोलिस घटनास्थळी होते. उशिरापर्यंत मदतकार्य आणि शोधमोहीम सुरू होती.

Bicholim Factory Explosion
Goa Election 2024: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

परिसरात धावाधाव, गदारोळ

एकापाठोपाठ चार स्फोट झाल्याने रोलिंग मिल परिसरात धावाधाव सुरू झाली. कानठळ्या बसवणारा प्रचंड आवाज आणि घरांना हादरे बसल्याने नेमके काय झाले, ते लोकांना कळलेच नाही. मात्र, खरा प्रकार लक्षात येताच लोकांनी रोलिंग मिलकडे धाव घेतली. या स्फोटांची तीव्रता इतकी होती की, साधारण दोन किलोमीटर अंतरापर्यंत त्यांचा आवाज पोहोचला. या दुर्घटनेमुळे परिसरातील लोक घाबरले असून, ते अजूनही भीतीच्या सावटाखाली आहेत.

आस्थापनाची भूमिका संशयास्पद

दुर्घटनेची माहिती मिळताच काही वेळाने डिचोली अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळी पोचले. त्यावेळी आस्थापनातील वीजप्रवाह आणि मुख्य फाटकही बंद होते. १५ मिनिटांनी वीजप्रवाह सुरू झाला. मात्र, आस्थापनात उपस्थित असलेले लोक या दुर्घटनेची नेमकी माहिती देण्यास टाळाटाळ करीत होते आणि मदतकार्यासाठी सहकार्य करण्यासही तयार नव्हते. त्यामुळे सुरवातीस मदतकार्यात अडथळा निर्माण झाला. आस्थापनाची ही भूमिका संशयास्पद वाटत होती.

कामगार अचानक गायब

ही दुर्घटना नेमकी कशी घडली आणि या घटनेत नेमके किती मालमत्तेची हानी झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेनंतर काही कामगार घटनास्थळावरून गायब झाले. मात्र, या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही, अशी माहिती डिचोली अग्निशमन दलाचे अधिकारी राहुल देसाई यांनी दिली. स्फोट झाले, त्यावेळी भट्टीजवळ पाच कामगार होते, अशी माहिती मिळाली.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

ज्या कारखान्यात हे स्फोट झाले, त्याच कारखान्यातील पावडर प्रदूषणामुळे त्रस्त झालेले नागरिक वर्षभरापूर्वी रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर कारखान्याच्या वतीने काही प्रमाणात उपाययोजना केली. मात्र, आता याच कारखान्यात चार स्फोट झाल्याने लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन यामागचे कारण शोधून काढावे आणि जनतेच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी मागणी नगरसेवक रियाज बेग, जमीर मागोडकर, कृष्णनाथ डिचोलकर, वितेंद्र गोवेकर यांनी केली आहे.

आई-मुलगा बचावला

स्फोट होताच आगीच्या ज्वाळा कारखान्याभोवतालचे पत्रे छेदून तीव्र गतीने बाहेर पडल्या. स्फोट झाले, त्याचवेळी जवळच्या रस्त्यावरून अस्नोडा येथील एक युवक दुचाकीवरून डिचोलीच्या दिशेने जात होता. दुचाकीवर मागे त्याची आई होती. कारखान्याजवळ पोचताच बाहेर पडलेली एक मोठी ज्वाळा त्यांच्या डोक्याजवळून गेली. मात्र, या दुर्घटनेतून ते दोघेही सुखरूप बचावले.

चौकशी करण्याचे आदेश

पोलाद उत्पादन करणाऱ्या कारखान्यात स्फोट होणे, ही चिंताजनक बाब आहे. ही दुर्घटना कशी घडली, त्याची सरकारी पातळीवरून सखोल चौकशी करण्यात येणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांशी मी संपर्क साधला आहे. कामगार आणि जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेण्यात येईल, अशी ग्वाही आमदार

डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com