Ponda Municipal Election
Ponda Municipal ElectionDainik Gomantak

Ponda Municipal Election: भाटीकरांचे नेतृत्व निर्णायक ठरणार?

कवित्व सुरूच : अनेक राजकीय समीकरणांची शक्यता; राजेश वेरेकरांवरही लक्ष
Published on

Ponda Municipal Election फोंडा नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागून दोन दिवस झाले असले तरी त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. या निवडणुकीत भाजपबरोबर कडवी झुंज दिलेल्या ‘रायझिंग फोंडा’च्या डॉ. केतन भाटीकर यांच्या नेतृत्वावरही ‘फोकस’ पडायला लागला आहे.

मागच्या वेळी हा गट मगोचा अधिकृत घटक होता. त्यावेळी उमेदवारांच्या पोस्टरवर तसेच कार्डावर मगोचे नेते सुदिन ढवळीकर व पक्षाची निशाणी असलेल्‍या सिंहाचा फोटो होता. ढवळीकरांनी प्रचारात सक्रियपणे भाग घेतला होता.

पण यावेळी उमेदवाराच्या पोस्टरवर तसेच कार्डावर ना ढवळीकरांचा फोटो ना सिंहाची निशाणी. प्रचारात त्यांचा सहभागही दिसला नाही.

या पॅनलच्या प्रत्येक उमेदवाराच्या फोटोवर फक्त भाटीकरांचे फोटो झळकताना दिसत होते. त्यामुळे हे पॅनल मगोचा घटक होता की काय, हेसुद्धा कळायला मार्ग नव्हता.

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत केतन भाटीकर हे मगोचे फोंडा मतदारसंघातील उमेदवार होते आणि त्यांनी त्यावेळी ७४३७ मते प्राप्त करून दुसरा क्रमांक मिळविला होता. फोंड्याचे आमदार रवी नाईक यांच्याकडून त्‍यांना केवळ ७७ मतांनी पराभव स्‍वीकारावा लागला होता.

विधानसभा निवडणुकीनंतर लगेच झालेल्या कुर्टी-खांडेपार पंचायतीच्या निवडणुकीत त्यांचे ११ पैकी ४ समर्थक पंच निवडून आले होते. आणि आता झालेल्या पालिका निवडणुकीतीही त्यांचे ४ नगरसेवक निवडून आलेले आहेत.

दोघांचा विजय अवघ्या मतांनी हुकला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही ‘लोकल बॉडी’च्या निवडणुकीत ना सुदिन यांचा वाटा होता ना मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकरांचा.

पालिका निवडणुकीत सुरूवातीलाच म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ‘रायझिंग फोंडा’च्या प्रभाग तेरामधील उमेदवार विद्या पुनाळेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे या पॅनलला मोठा धक्का बसला होता.

भाजपच्‍या तेथील उमेदवार दर्शना नाईक यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेऊन विद्या यांचा मार्ग मोकळा करून दिला होता. हा धक्का पचवूनही ‘रायझिंग फोंडा’ने भाजपशी कडवी झुंज दिली. आता पालिकेत त्यांच्या नगरसेवकांना विरोधकांची कणखर भूमिका बजवावी लागणार आहे.

या निवडणुकीत प्रथमच काँग्रेस पक्ष बराच पिछाडीवर पडला. विद्यमान पालिका मंडळात विलियम्‍स आगियार यांच्या रूपाने एक तरी नगरसेवक होता. पण आता काँग्रेसची पाटी कोरी झाली असून पक्षाच्या फोंड्यातील अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या बाबतीत काँग्रेसचे फोंड्यातील नेते तथा गेल्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार राजेश वेरेकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पण फोंडा पालिका निवडणुकांचा निकाल पाहता भाजपनंतर भाटीकरांच्या ‘रायझिंग फोंडा’चाच क्रमांक लागतो.

त्यामुळेच विधायक विरोधक म्हणून रायझिंग फोंडा व त्यांचे नेते डॉ. केतन भाटीकर हे कोणती खेळी खेळतात यावर लोकांचे लक्ष लागून राहणार आहे.

‘रायझिंग’ला ३५१३ मते

फोंडा पालिका निवडणुकीत ‘रायझिंग फोंडा’ने बारा प्रभागांतून उमेदवार रिंगणात उतरविले होते. त्यांना एकूण ३५१३ मते मिळाली. त्यांचे ४ उमेदवार निवडून आले आणि दोन उमेदवारांचा विजय अनुक्रमे तीन आणि एक मताने हुकला.

तसेच प्रभाग एकमध्ये त्यांच्या उमेदवाराला ३२ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. प्रभाग सहामधल्या ‘रायझिंग फोंडा’च्या मंगेश कुंडईकराना सगळ्यात कमी (८५) तर प्रभाग आठमधील प्रतीक्षा नाईक यांना सर्वाधिक (४०४) मते प्राप्त झाली.

त्यामुळे या पालिका निवडणुकीत ‘रायझिंग फोंडा’ ही एक प्रबळ शक्ती म्हणून उदयाला आली असल्याचे मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. अर्थात नगरपालिका व विधानसभा निवडणुकीतील समीकरणे वेगवेगळी असली तरी या निकालाकडे एक ‘ट्रेलर’ म्हणून बघता येईल.

Ponda Municipal Election
Karnataka Election 2023 : मतदानासाठी जाणाऱ्या कन्नड रहिवाशांत उत्साह

दोन गटांमुळे भविष्‍यात भाजपची लागेल कसोटी

फोंड्यात सध्या भाजपचे दोन गट आहेत. मूळ भाजपचे कार्यकर्ते व रवी नाईक यांच्‍यासमवेत भाजपमध्ये आलेले कार्यकर्ते अशी त्‍यांच्‍यात विभागणी झालेली दिसत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत याचा प्रत्यय आला होता.

रवी नाईक यांचा पाडाव करण्यासाठी बरेच मूळ भाजपवासी वावरले होते हे आता लपून राहिलेले नाही. रवी हे एक अनुभवी खेळाडू असल्यामुळे ते या अंतर्गत कारस्थानांना पुरून उरले.

पण तरीसुद्धा दर निवडणुकीत साडेनऊ हजारांच्या आसपास मते घेणाऱ्या रवींना केवळ साडेसात हजार मतांवरच समाधान मानावे लागले होते. आता पुढील विधानसभा निवडणुकीत रवीपुत्र रितेश यांना भाजपने उमेदवारी दिल्यास या बंडखोरीची ‘नवी आवृत्ती’ निघू शकते.

Ponda Municipal Election
Para Athlete Sakshi Kale: गोव्याच्या पॅरा ॲथलिट साक्षीने पटकावले आंतरराष्ट्रीय पदक

सत्तेपुढे लढणे खूप कठीणच!

पालिका व पंचायत निवडणुकांत सत्ताधारी पक्षाबरोबर लढणे कठीणच असते. याचे कारण म्हणजे पंचायती व पालिका या ‘लोकल बॉडी’ असल्यामुळे त्यांना सरकारवर विसंबूल राहावे लागते.

याचा अनुभव रवींनाही 2013 साली आला होता. तेव्‍हा फोंडा पालिका निवडणुकीत रवी नाईक यांच्‍यासारखा माजी मुख्यमंत्री नेता असूनसुद्धा काँग्रेसच्या फोंडा विकास समितीचा धुव्वा उडाला होता.

त्यांना 14 पैकी एकच जागा मिळाली होती. या पार्श्वभूमीवर या पालिका निवडणुकीतील ‘रायझिंग फोंडा’ने मिळविलेले यश बऱ्यापैकी उठून दिसते.

Ponda Municipal Election
Today's Program In Goa: गोव्यात आज असणार कार्यक्रमांची मेजवानी!

विद्या पुनाळेकर यांचा ‘पलटवार’ धक्कादायक

पालिका निवडणुकीच्या सुरूवातीलाच ‘रायझिंग फोंडा’च्या खंद्या समर्थक विद्या पुनाळेकर यांचा भाजपप्रवेश अनेकांना आश्चर्याचा धक्का देऊन गेला. विद्या या २०१३ साली प्रथम नगरसेविका बनल्या. त्यावेळी त्यांनी फोंडा विकास समितीचे सुभाष शिरसाट यांचा अवघ्‍या एका मताने पराभव केला होता.

त्यावेळी हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले होते. त्यानंतर २०१८ साली त्यांचा प्रभाग क्रमांक १३ इतर मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे त्या निवडणुकीत उतरू शकल्या नव्हत्या. यावेळी त्यांनी उमेदवारी दाखल केली होती, पण ऐनवेळी ‘पलटवार’ करून त्या बिनविरोध निवडून आल्या.

‘हिम्मत असेल तर राजीनामा देऊन भाजप पॅनलवर त्‍यांनी निवडून यावे’ असे आव्हान भाटीकर यांनी त्‍यांना दिले आहे. अर्थात अशी आव्हाने कोणी गंभीरपणे घेत नसतो, हा भाग वेगळा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com