North Goa Noise Pollution: ध्वनिप्रदूषणावर खंडपीठ आक्रमक; पोलिस महासंचालकांना सक्त निर्देश

गैरप्रकार रोखा : रात्री उशिरापर्यंतच्‍या संगीत पार्ट्यांचे व्हिडिओ सादर
Noise Pollution
Noise PollutionDainik Gomantak
Published on
Updated on

North Goa Noise Pollution: हणजूण आणि पेडणे या किनारपट्टी परिसरात रात्री 10 वाजल्यापासून पहाटेपर्यंत कर्णकर्कश आवाजामध्ये संगीत पार्ट्या सुरू असल्याचे व्हिडिओ आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

या ध्वनी प्रदूषणाची गंभीर दखल घेत खंडपीठाने पोलिस महासंचालकांना तातडीने बैठक घेऊन हे प्रकार त्वरित रोखण्याचे निर्देश दिले. ध्वनिप्रदूषण प्रतिबंधक नियमानुसार राज्यात रात्री 10 वाजल्यानंतर सार्वजनिक ठिकाणच्या कार्यक्रमासाठी मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यास बंदी आहे.

वेळोवेळी सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालयाने संबंधित सरकारी यंत्रणांना निर्देश देऊनही ध्वनिप्रदूषण सुरूच आहे. या संगीताचा त्रास त्या परिसरातील लोकांना होत असल्याच्या तक्रारी पोलिस स्थानकात देऊनही पोलिस संबंधितांवर कारवाई करत नाहीत.

ज्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत संगीत पार्ट्या आयोजित केल्या आहेत. तसेच, त्याच्या जाहिरातीही प्रसिद्ध केल्या जातात. त्यामध्ये स्पष्टपणे वेळ नमूद केलेली असते. तरीही पोलिस स्वत:हून कोणतीच कारवाई करत नाहीत.

ध्वनी प्रदूषणाच्या विरोधातील अनेक याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यामध्ये वेळोवेळी न्यायालयाने पोलिसांना निर्देश दिले आहेत.

स्वेच्छा दखल घेण्याचे निर्देश

फेरेरा यांनी दाखविलेल्या व्हिडिओची खंडपीठाने गंभीर दखल घेतली. न्यायालयाच्या आदेशांची पायमल्ली केली जात असल्याबद्दल पोलिस महासंचालकांना अवमान नोटीस बजावण्याचा पवित्रा घेतला होता.

मात्र, खंडपीठाने लवचिक भूमिका घेत, महासंचालकांची आजच भेट घेऊन हे व्हिडिओ दाखवावेत व त्यावर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी अशा प्रकरणात तक्रारी येण्याची वाट न बघता स्वेच्छा दखल घेऊन कारवाई करावी, असेही बजावले.

गस्तीवर पोलिस काय करतात?

यावेळी सरकारी वकील म्हणाले, तक्रार आल्यावर पोलिस घटनास्थळी पोहचतात. मात्र, तोपर्यंत तेथे ध्वनी कमी केलेला असतो. किनारी भागात रात्री पोलिस गस्त सुरूच असते, पोलिसांची गस्त असते, तर व्हिडिओनुसार कारवाई का झाली नाही, असा प्रश्‍न खंडपीठाने केला.

Noise Pollution
CM Pramod Sawant on FIR: मी खेद व्यक्त करतो..! बिहारमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर काय म्हणाले मुख्यमंत्री; वाचा सविस्तर

कानउघाडणी

खंडपीठाच्या निर्देशानुसार, ॲड. कार्लोस फेरेरा यांनी रात्री 10 वाजल्यानंतर किनारी भागात सुरू असलेल्या संगीत पार्ट्यांचे व्हिडिओ पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांना दाखवले. या बैठकीवेळी किनारी भागातील पोलिस अधिकारी उपस्थित होते.

सिंग यांनी या अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत असे प्रकार पुन्हा घडल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे खडसावले.

या बैठकीला पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन, उपअधीक्षक जीवबा दळवी, पेडण्याचे निरीक्षक दत्ताराम राऊत देसाई तसेच हणजूणचे पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई उपस्थित होते.

रात्री 10 वाजल्यानंतर पार्टीमध्ये कर्णकर्कश आवाजात संगीत वाजवण्यास बंदी आहे. वेळोवेळी न्यायालयाने निर्देश देऊनही अंमलबजावणी होत नाही. पोलिस कारवाई करत नसल्यास त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव असावा.

- ॲड. कार्लुस फेरेरा, आमदार, हळदोणे.

Noise Pollution
Power Shutdown in Goa: गोव्यात 4 तसेच 5 मे रोजी 'या' भागांमध्ये वीज पुरवठा खंडित

पार्ट्या कुणाच्या आशीर्वादाने? : अशा पार्ट्यांना ‘आशीर्वाद’ असल्याशिवाय त्या उशिरापर्यंत सुरू राहणे शक्यच नाही. या पार्ट्या काही विदेशी नागरिक आयोजित करत असून त्याची जाहिरातही बिनधास्तपणे प्रसिद्ध केली जाते.

या आयोजकांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. रात्री उशिरा होणाऱ्या या ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी व रोखण्यासाठी प्रत्येक तासाने या किनारपट्टी परिसरात पोलिस गस्त होणे गरजेचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com