
मडगाव: बांगलादेशातून मोठ्या प्रमाणावर युवतींची तस्करी करून त्यांना भारतात वेश्या व्यवसायाला जुंपण्याचे प्रकार वाढलेले असतानाच बांगलादेशमधून पळवून आणलेल्या एका २३ वर्षीय युवतीची मानव तस्करी प्रतिबंधक विभागाचे पोलिस आणि कोकण रेल्वे पोलिसांच्या साहाय्याने मडगाव रेल्वे स्थानकावर सुटका करण्यात आली.
त्या युवतीच्या भावाने बांगलादेशमधील एका एनजीओच्या साहाय्याने गोव्यातील (Goa) अर्ज या संस्थेकडे संपर्क साधला. अर्जने पोलिसांशी समन्वय साधून तिची सुटका केली. सध्या या युवतीला महिला संरक्षणगृहात ठेवण्यात आले आहे. लवकरच तिची रवानगी तिच्या मूळ गावी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या डिसेंबर महिन्यातच गोव्यात आणलेल्या बांगलादेशी युवतींची सुटका करण्याचे हे तिसरे प्रकरण असून यापूर्वी पेडणे पोलिसांनी अशाच प्रकारे गोव्यात आणलेल्या आणखी दोन बांगलादेश युवतींची सुटका केली होती.
काल ही युवती कोलकात्याहून अमरावती एक्सप्रेसने गोव्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर अर्ज या बिगर सरकारी संस्थेच्या सदस्यांनी पोलिसांच्या साहाय्याने तिची सुटका केली. काल सायंकाळी ५ वा. मडगाव रेल्वे स्थानकावर तिला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले. या युवतीच्या अपहरणाबद्दल बांगलादेशात तिच्या भावाने तक्रार दाखल केलेली आहे, अशी माहिती मानवी तस्करी प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक सुदिक्षा नाईक यांनी दिली. या युवतीला पुन्हा बांगलादेशमध्ये (Bangladesh) पाठविण्यात येणार असे त्यांनी सांगितले.
अर्ज या संस्थेचे अध्यक्ष अरुण पांडे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, बांगलादेशमध्ये जी तक्रार नोंद झाली आहे, त्यानुसार काही महिन्यापूर्वी ही युवती बाजारहाटासाठी बाहेर पडली असता ती गायब झाल्याचे म्हटले होते. या युवतीच्या दाव्याप्रमाणे, तिला बेशुद्ध करून भारतात आणले गेले. जेव्हा तिला जाग आली, तेव्हा तिला कोलकाता येथे एका खोलीत डांबून ठेवले होते, हे तिला कळून आले. नंतर एका इसमाने तिला गोव्यात आणले. काही दिवस गोव्यात वास्तव करून झाल्यावर तिला पुन्हा कोलकात्यात नेण्यात आले. तिला आपल्या घरी जायचे होते. पण घरी जाण्यासाठी कुठलीही कागदपत्रे हाती नसल्याने तिने पुन्हा गोव्यात येणे पसंत केले. त्यापूर्वी आपल्या भावाला फोन करून आपण गोव्याला जाते, असे तिने सांगितले होते.
या युवतीला वेश्या व्यवसायासाठी गोव्यात आणले होते, की अन्य काही कामासाठी हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. तिची चौकशी केल्यानंतरच ही बाब पुढे येईल, असे पांडे म्हणाले. यापूर्वी पेडणे पोलिसांनी बांगलादेशमधून आणलेल्या आणखी एक युवतींची काही दिवसांपूर्वीच सुटका केली होती. त्या युवतींचा वेश्या व्यवसायासाठी वापर केला जात होता, ही बाब पुढे आली आहे, असे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.