Banastarim Bridge Accident: तिघांचा जीव घेणारा चालक होता नशेत, अटक टाळण्यासाठी रचला होता बनाव

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Banastarim Bridge Accident Mercedes Driver arrested
Banastarim Bridge Accident Mercedes Driver arrestedDainik Gomantak
Published on
Updated on

Banastarim Bridge Accident: फोंडा-पणजी महामार्गावरील बाणस्तारी पुलावरील झालेल्या भीषण अपघातामुळे राज्यभर मद्यपी चालकांच्या बेदरकारपणे व निष्काळजीपणामुळे तिघा निरपराधांचा जीव गेल्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया लोकांमधून व्यक्त होत आहेत. संशयित कारचालक ही वजनदार व्यक्ती असल्याने राजकीय दबाव व चालकाची बनवाबनवी करण्याचे प्रयत्न झाले.

म्हार्दोळ पोलिसांनी अपघाताला कारणीभूत असलेल्या कारचालकाला गजाआड केले. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे व इतर अपघातग्रस्त वाहनांमध्ये असलेल्यांचा जबाब घेण्यात आला.

खांडेपार येथील नंदनवन येथील पार्टीसाठी सावर्डेकर कुटुंबीय पती-पत्नी व दोन मुले गेली होती. पार्टी आटोपून ते फोंड्याहून पणजीच्या दिशेने मर्सिडीज कारने परतत होते. बाणस्तारी पूल सुरू होतो तेथील वळणावर भरधाववेगात व दारूच्या नशेत असलेल्‍या कारचालकाचे पुढे असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करताना वाहनावरील नियंत्रण गेले व उजव्या बाजूने फोंड्याच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेने दुचाकीचा चक्काचूर होऊन दुचाकीचालक जागीच ठार झाला. त्यानंतर आणखी एका दुचाकीला धडक दिली. ही धडकही इतकी जबरदस्त होती की दुचाकीस्वार ठार झाला व मागे बसलेली त्याची पत्नी दुचाकीवरून हवेत उडून ती पुलाच्या डाव्या बाजूने सुमारे ४५ मीटर खोल पडली व तिचाही जागीच मृत्यू झाला. (Goa Crime News)

या कारचा वेग अधिक असल्याने या दोन दुचाकींना ठोकर दिल्यानंतर समोरून येणाऱ्या तीन कारना धडक दिली. या जोरदार धडकेने कारमधील चालक राज माजगावकर व शंकर हळर्णकर तर एका दुचाकीवरील मागे बसलेली वनिता भंडारी ही महिला मिळून तिघेजण गंभीर जखमी झाले.

कारचालक गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाला होता. या कारचा वेग इतका होता की या वाहनांना धडक देऊन विजेच्या खांबाला कार आदळून दुभाजकावर अडकली.

Banastarim Bridge Accident Mercedes Driver arrested
"आम्ही मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक"; अपघातानंतर धमकी देणाऱ्या दोघांना अटक!

मद्याचे प्रमाण तीनपटीने

या मर्सिडीज कारमध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. या बाटल्यांमध्ये दारू व इतर पेय मिक्स करण्यात आले होते. त्यामुळे तो कार चालवत असताना दारूचे घोट घेत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मद्यप्राशान केलेल्या व्यक्तीच्या १०० मिली रक्तामध्ये ३० मिलीग्रॅम मद्य आढळून आल्यास कायद्यानुसार दंडात्मक कारवाई होते. मात्र, त्याची मद्य वैद्यकीय चाचणी करण्यात आली तेव्हा त्याचे प्रमाण ९४ मिलीग्रॅम आहे व ते तीनपटीने आहे. त्यामुळे कार चालवत असताना चालक पूर्णपणे दारूच्या नशेत होता, हे या चाचणीतून स्पष्ट झाले आहे.

चालकाचा पोबारा

अपघात घडताच मर्सिडीज कारच्या चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे तेथे जमा झालेल्या जमावाने पोलिसांना चालकाला जोपर्यंत घटनास्थळी आणले जात नाही, तोपर्यंत कार हलवायला देणार नाही, असा पवित्रा घेतला. ही कार संशयिताच्या पत्नीच्या नावावर नोंद असल्याचे उघड होताच पोलिसांनी चालकाचा शोध घेण्यास सुरवात केली.

बेबनाव उघड

त्या कारमालकाकडे कामाला असलेला चालक म्हार्दोळ पोलिस स्थानकात दाखल झाला व कार तो चालवीत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, इतर कारना धडक बसलेल्या व अपघात पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शींनी हा तो चालक नव्हे, असे पोलिसांना सांगितले.

पुरावा नष्ट करण्याच्या आरोपाखाली अटक करतो, असे पोलिसांनी या चालकाला सांगितल्यावर त्याने सत्य उघड केले. त्यानंतर कारचालक श्रीपाद सावर्डेकर हा जुने गोवे येथे नातेवाईकांच्या घरी होता तो पोलिसांना शरण आला.

पोलिस कारवाईबाबत जनतेमध्ये नाराजी

अपघातस्थळी म्हार्दोळ तसेच जुने गोवे पोलिस स्थानकाचे पोलिस पोहोचले. या अपघातात मृत्यू पावलेल्या तसेच गंभीर जखमी झालेल्यांना मदत करण्याऐवजी या पोलिसांनी मर्सिडीज कारमध्ये असलेल्या महिलेला तसेच मुलांना संरक्षण देण्यात धन्यता मानली.

त्यामुळे तेथील जमावाने संताप व्यक्त केला. आलिशान गाडी पाहून पोलिसांनी श्रीमंतांना मदतीचा हात दिल्याने पोलिसांच्या या कार्यपद्धतीबाबत जनतेमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Banastarim Bridge Accident Mercedes Driver arrested
Calangute News : टाऊटस्‌कडून दमदाटी, ‘क्लब चावला’वर तक्रार

खरे तेच सांगणार

या भीषण अपघातात मर्सिडीज कारची धडक ज्या कारला बसण्यापासून चुकली व त्यातून बचावलेले त्या कारचे चालक दिग्विजय वेलिंगकर यांनी पोलिसांच्या घटनास्थळीच्या कार्यपद्धतीवर आरोप केले आहेत.

जखमींना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी पोलिसांनी मर्सिडीजमधील व्हीआयपींना मदत करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पोलिसांनी जर आपली घटनेचा साक्षीदार म्हणून जबानी घेतल्यास घडलेला खरा प्रकार सांगू. साक्ष देताना कोणताही दबाव आला तरी त्याला बळी पडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

या अपघातप्रकरणी अपेक्षित शिक्षा

  • भादंसं कलम २७९

    सार्वजनिक मार्गावर बेदरकारपणे वाहन चालवणे - जो कोणी सार्वजनिक मार्गावर मानवी जीवन धोक्यात येईल किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला दुखापत किंवा दुखापत होण्याची शक्यता असेल अशा बेदरकारपणे किंवा निष्काळजीपणे वाहन चालवतो त्याला सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा एक हजारापर्यंत दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते. ही शिक्षा गुन्ह्याच्या क्षमतेनुसार न्यायालय देते.

  • भादंसं कलम - ३०४

    या ३०४ कलमाखाली दोषी व्यक्तीच्या हत्येसाठी शिक्षेची तरतूद आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला जातो. जो कोणी हत्या न करता त्याच्या चुकीमुळे एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर हा गुन्हा नोंदवण्यात येतो. या गुन्ह्याखाली आरोपीला जन्मठेप किंवा १० वर्षांपर्यंत शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात आहे.

  • भादंसं कलम - ३३८

    हे कलम इतरांचे जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कृत्याद्वारे गंभीर दुखापत करणे यासाठी लावण्यात येते. ज्याने मानवी जीवन किंवा इतरांची वैयक्तिक सुरक्षा धोक्यात येईल अशा अविचारीपणे किंवा निष्काळजीपणाने कोणतेही कृत्य करून एखाद्या व्यक्तीला गंभीर दुखापत केली असेल, त्याला कारावासाची शिक्षा केली जाते. ही शिक्षा एक किंवा दोन वर्षांपर्यंत किंवा एक हजारापर्यंत दंडात्मक कारवाई किंवा दोन्ही असू शकतो. ही शिक्षा गुन्ह्याच्या तीव्रतेवर अवलंबून असते.

  • मोटर वाहन कायदा कलम १८५

    जर एखादी व्यक्तीच्या शरीरातील १०० मिलीच्या रक्तामध्ये ३० मिलीग्राम मद्य सापडले व ती व्यक्ती वाहन चालवत असेल तर मद्यपान करून वाहन चालविण्याचे प्रकरण मानले जाते. मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ खाली दंडात्मक कारवाई केली जाते.

    पहिल्या गुन्ह्यासाठी दोन हजार रुपये दंड व सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्यानंतर पुढील तीन वर्षांत गुन्हा केल्यास, प्रत्येक गुन्ह्यासाठी तीन हजार रुपये दंड, दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

एअरबॅग खुली झाली अन्....

मर्सिडीज ही आलिशान कार असल्याने आतमध्ये अपघात घडल्यास चालक व सहचालक तसेच मागील आसनावरील प्रवाशांसाठीही जीव वाचण्यासाठी एअरबॅग समाविष्ट असतात. जर वाहनाने समोरून धडक दिली तर त्या आपोआप खुलतात.

जेव्हा मर्सिडीज कारने धडक दिली तेव्हा एअरबॅग खुली झाली व कारचालकाला समोर काहीच दिसेनासे झाले. वाहन वेगात असल्याने मद्यधुंद स्थितीत असलेल्या चालकाला नियंत्रण ठेवणे शक्य झाले नाही. वेगवान कारने समोरून आलेल्या वाहनांना धडक दिली.

कारमधील महिलाही मद्यधुंद

अपघातानंतर मर्सिडीज कारच्या चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्यानंतर कारमध्ये त्याची पत्नी व दोन मुले होती. त्यामुळे तेथे जमा झालेल्या जमावाने मर्सिडीज कार महिला चालवत होती, असा अंदाज बांधला.

लोकांनी तिला कारमधून बाहेर काढले. मात्र, तीसुद्धा दारूच्या नशेत असल्याने तिला उभेही राहणे शक्य होत नव्हते. यावेळी जमलेल्या लोकांशी ती अहंकाराने बोलू लागली, असे तिवरे-वरगावचे सरपंच जयेश नाईक यांनी सोशल मीडियाशी बोलताना सांगितले.

१,५४७ मद्यपींविरुद्ध कारवाई

राज्यात एप्रिल २०२२ ते जून २०२३ पर्यंत मद्यपान करून वाहने चालवल्याप्रकरणी १,५४७ वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून त्यांचे वाहनचालक परवाने निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

सरासरी प्रत्येक महिन्याला ११५ वाहनचालकांविरुद्ध दारू पिऊन गाडी चालविल्याप्रकरणी कारवाई होते. वाहतूक खात्याने २०२२ मध्ये १,०१७ जणांविरुद्ध मद्यप्राशन करून वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई केली आहे.

राज्यात तीन दिवसांमागे दोघांचा मृत्यू

  • या काळात ३,०११ रस्ता अपघातांची नोंद झाली असून त्यातील २५६ भीषण अपघात आहेत तर २०० गंभीर अपघात आहेत. रस्ते अपघातात राज्यात तीन दिवसांमागे दोघांचा मृत्यू होतो.

  • २०२२ साली २७४ जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे तर २३४ जण अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. यावर्षी २०२३ मध्ये जूनपर्यंत १६३ जणांना अपघातात मृत्यू झाला, तर १६२ जण गंभीर जखमी झाले. ४३४ जण किरकोळ जखमांवर बचावले.

  • आतापर्यंत वाहतूक खात्याने ३ लाख १४ हजार ५७४ चालकांविरुद्ध कारवाई करून १७ कोटी ७९ लाख ६ हजार ६५० रुपये दंड वसूल केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com