केपे: कुडचडे मतदारसंघातील रस्ते अत्यंत धोकादायक बनले आहेत. या रस्त्यांवर पडलेले खड्डे म्हणजे साक्षात मृत्यूचे सापळे बनले आहेत. तसेच भटक्या कुत्र्यांमुळे लोकांच्या विशेषत: शालेय मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या दोन्ही समस्या त्वरित सोडवण्यासाठी आज कुडचडेचे माजी नगरसेवक पुष्कल सावंत, प्रदीप काकोडकर, मनोहर नाईक, कौस्तुभ भिसे व नागरिकांनी केपेचे उपजिल्हाधिकारी मनोहर कारेकर यांना निवेदन सादर केले.
तसेच या मागण्या पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला. गेल्या दोन वर्षांपासून कुडचडे मतदारसंघातील रस्ते खड्डेमय बनले असून विकासकामांच्या नावाखाली रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत, असे यावेळी प्रदीप काकोडकर यांनी सांगितले. गणेश चतुर्थीचा सण ऐन तोंडावर आला असूनही रस्त्यांवरील खड्डे बुजविले जात नसल्याने कुडचडे बाजारात येण्यास लोक घाबरत आहेत. त्यामुळे बाजारावर विपरित परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
वारंवार त्याच-त्याच जागी रस्ते खोदत असल्याने कसले काम होत आहे हे लोकांना माहीत नसते. कोण कंत्राटदार हेसुद्धा कळत नसल्याने कंत्राटदाराला पूर्ण माहिती भरून असलेला फलक लावण्यास सांगावे अशी मागणी या निवेदनात केली आहे. खड्डेमय रस्त्याबरोबर भटक्या कुत्र्यांचाही वावर बराच वाढला आहे. शालेय मुलांचा हे कुत्रे पाठलाग करतात. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून तातडीने उपाययोजना आखाव्यात, असे निवेदनात म्हटले आहे.
कुडचडे मतदारसंघाचा विकास करण्यासाठी सध्या मिळेल तेथे रस्ते खोदून ठेवल्याने या दोन वर्षांत अनेक अपघात घडलेले आहेत. एका युवकाला आपला जीवसुद्धा गमवावा लागला आहे तर कित्येकजण गंभीर जखमी झाले आहेत, असे पुष्कल सावंत यांनी सांगितले. मतदारसंघातील रस्ते मृत्यूचे सापळे बनले आहेत. या रस्त्यांची डागडुजी करण्यास कुणीच पुढे येत नसल्याने आज निवेदन सादर करावे लागत आहे असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, उपजिल्हाधिकारी कारेकर यांनी आपण याविषयी त्वरित संबंधित अधिकारी व कंत्राटदारांची बैठक घेऊन तोडगा काढू, असे सांगितले.
विकासकामांच्या नावाखाली कुडचडेवासीयांचा छळ सुरू आहे की काय असे आता वाटू लागले आहे. गेल्या दोन वर्षांपासून रस्ते खोदून ठेवले आहेत. ते दुरुस्त करण्याचे नावही संबंधित खाते घेत नसल्याने लोक संताप व्यक्त करत आहेत. चतुर्थीपूर्वी रस्त्यावरील खड्डे न बुजविल्यास तसेच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास आम्ही प्रखर आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे व त्यानंतर होणाऱ्या परिणामांना सरकारच जबाबदार असेल, असे मनोहर नाईक यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.