पणजी: ‘आझादी का अमृत महोत्सव’च्या निमित्ताने हर घर तिरंगा, तिरंगा रॅली, मोटारसायकल रॅली, मूक रॅली, ऐतिहासिक वारसा स्थळांवर ध्वजारोहण, शाळा, महाविद्यालय यांच्यामार्फत प्रभात फेरी, विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. गुरुवार, 11 रोजी आग्वाद कारागृह संग्रहालयावर ध्वजारोहण केले जाणार असून यावेळी स्वातंत्र्यसैनिकांचा गौरवही करण्यात येणार आहे. राज्यात 13 ते 15 ऑगस्टदरम्यान भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
(Azadi Ka Amrit Mahotsav will be celebrated grandly says cm Pramod sawant)
यावेळी मुख्यमंत्री सावंत म्हणाले, महोत्सवाची सुरवात 11 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 वाजता आग्वाद कारागृह संग्रहालयावर ध्वजारोहणाने होईल. यावेळी स्वातंत्र्यसैनिकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार होईल. यावेळी पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्षही उपस्थित असतील. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. जुने सचिवालय ते आझाद मैदान आणि मडगाव पालिका ते लोहिया मैदान येथे या तिरंगा यात्रा होणार आहेत. या दिवशी ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू होणार आहे.
विभाजन हुतात्मा स्मरण दिवस
14 ऑगस्ट रोजी विभाजन हुतात्मा स्मरण दिवस पाळला जाणार आहे. यासाठी पणजी आणि म्हापसा बस स्टॅण्डवर फोटो आणि पोस्टर प्रदर्शन होत आहे. हे प्रदर्शन पुरातत्व आणि अभिलेख खात्याच्या वतीने भरवण्यात येणार आहे. चर्च स्क्वेअर ते आझाद मैदान आणि वास्को येथे मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. तर 15 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्वच 12 ही तालुक्यांच्या ठिकाणी मंत्री आणि आमदार ध्वजारोहण करतील. यानिमित्ताने माहिती आणि प्रसिद्धी खात्याने स्पर्धांचे आयोजन केले आहे.
पुस्तक प्रकाशन : गोवा मुक्ती लढ्यामध्ये हुतात्मे झालेल्या 75 हुतात्म्यांच्या नातेवाईकांचा विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यातील 28 हुतात्मे हे राज्याबाहेरील आहेत, तर 46 जण राज्यातील आहेत. हुतात्म्यांची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी होणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.