लोकांना काहीही कल्पना न देता तिळारी धरणातून अचानक पाणी सोडले जात असल्याने नुकसान सोसावे लागत असल्याची तक्रार इब्रामपूर वासियांनी केंद्रीय आयुष मंत्री श्री श्रीपाद नाईक यांच्याकडे केली. श्री. नाईक यांनी आज पूरग्रस्त इब्रामपूरला भेट दिली व लोकांच्या समस्या जाणून घेतल्या.
येथील नदीच्या किनाऱ्यावर मानवी वस्ती आणि जनावरे असल्याने त्यांचा जीवही वारंवार धोक्यात येत आहे. तिळारी धरणाबाबत महाराष्ट्र राज्य सरकारकडून व्यवस्थित व्यवस्थापन केले जात नसल्यामुळे इब्रामपूरवासियांना त्याचा वारंवार फटका बसत असल्याचे लोकांनी सांगितले.
उच्च स्तरीय बैठक घेऊन तिळारी धरणाच्या व्यवस्थेबद्दल तांत्रिक तज्ज्ञांना नेमून तोडगा काढण्याची मागणी आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे करणार असल्याचे, श्री. नाईक यांनी यावेळी आश्वासन दिले.
तिळारीतील पाणी सोडतेवेळी लोकांना पूर्वसूचना मिळणे आवश्यक असल्याचे मत केंद्रीय आयुषमंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा रक्षा राज्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
गेले दोन दिवस सतत पडलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानी झालेल्या इब्रामपूर व साळ भागाचा केंद्रीय आयुषमंत्री यांनी शुक्रवारी दौरा केला. इब्रामपूर पंचायतीचे सरपंच सोनाली विक्रमपूरकर, उपसरपंच व अन्य सदस्य या पाहणीच्या वेळी उपस्थित होते.
यावेळी नाईक म्हणाले, शेतकऱ्यांचे व खास करून केळींच्या बागायतीचे खूप नुकसान झालेले आढळून आले. बागायतीत साचलेले पाणी तसेच राहिल्याने पीक कूजून गेले आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यातही या भागात असेच नुकसान झाले होते. मागील वर्षाच्या नुकसानीचा अहवाल करण्यात येऊनही अजूनही नुकसानी न मिळाल्याच्या शेतकऱ्यांनी आता तक्रारी केल्या असून सदर नुकसानभरपाई देण्यासाठी आपण मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि कृषीमंत्री बाबू कवळेकर यांना भेटून ही मागणी तडीस नेणार असल्याचे आश्वासनही यावेळी मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिले.
इब्राहमपूर व साळ भागातील ‘ना हरकत’ दाखला न मिळाल्यामुळे या भागातील काही विकासकामे प्रलंबित आहेत. येथील बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात झाडे अडकून पडल्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत. तिळारी धरणातून पाणी सोडले गेले, तर या अडचणीत आणखी भर पडत असल्याचे आढळून आले आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, हा बंधारा आणखी थोडा उंच आणि रूंद करण्यात येऊन या समस्येवर कायमचा तोडगा काढण्यात येणार असल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले.