

कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यातील विनय राम गेली चार वर्षे आपल्या घरी गेलेले नाहीत. त्यांनी तयार केलेल्या आकर्षक राम मंदिराच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन देशभर १०८ ठिकाणी करून नंतरच घरी परतेन, अशी भीष्मप्रतिज्ञा त्यांनी केली आहे. श्री रामावर त्यांची इतकी भक्ती आहे, की ते स्वतःला हनुमान मानतात.
स्वतःचे मूळ नाव बदलून ‘विनय राम’ हे नाव आता त्यांनी स्वीकारले आहे. त्यांच्याशी बोलताना एखादा नास्तिकदेखील उत्कट भक्तिभावामुळे भावनाप्रधान होऊ शकतो.
पणजीतील महालक्ष्मी मंदिराच्या सभागृहात त्यांनी निर्माण केलेली श्रीराम मंदिराची अतिशय कलात्मक आणि सुंदर प्रतिकृती रसिक आणि भाविकांच्या दर्शनासाठी ठेवली आहे. यापूर्वी गोव्यातील पर्तगाळ आणि मडगाव येथे या प्रतिकृतीचे प्रदर्शन झाले आहे. १० जानेवारी रोजी पणजी येथील प्रदर्शन आटोपल्यानंतर राम मंदिराची ही प्रतिकृती साखळी येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
हे पणजीतील पर्यायाने देशातील ९७ वे प्रदर्शन आहे. प्रतिकृतीच्या या प्रदर्शनाची सुरुवात बंगळुरू येथे झाली.
शेवटचे १०८ वे प्रदर्शन अयोध्येत होणार आहे. विनय राम यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत किमान २५ लाख लोकांनी या प्रतिकृतीचे दर्शन घेतले आहे. ज्याप्रकारे अयोध्येतील श्रीराम मंदिरात विविध देवांच्या मूर्ती मंदिराच्या विविध भागांत बसविल्या आहेत, त्याचप्रकारे विनय राम यांनी त्यांच्या या मंदिराच्या प्रतिकृतीत त्याच देवतांच्या छायाचित्रांची योजना केली आहे.
मूळ मंदिरात आणि या प्रतिकृतीत फरक हा आहे, की मूळ मंदिर संगमरवरी आहे, तर ही प्रतिकृती थर्माकोल, लाकूड, फोम वापरून बनवली आहे आणि तिला सोनेरी झळाळी दिली आहे.
३७ वर्षांचे विनय राम हे शाळेत गणिताचे शिक्षक होते. मात्र, जेव्हा त्यांनी आपले जीवन अध्यात्माला वाहून घ्यायचे ठरविले तेव्हा त्यांनी नोकरी सोडली.
१:१८ या प्रमाणात मंदिराच्या प्रतिकृतीची रचना करण्यासाठी विनय राम यांना सुमारे तीन महिने लागले. नवीन ठिकाणी मंदिराची प्रतिकृती उभारण्यासाठी विनय राम यांना आता तीन दिवस लागतात. तितकेच दिवस त्यांना ती प्रतिकृती सुटी करण्यासाठी लागतात. कोणाचीही मदत न घेता ते एकटेच हे काम करतात.
मी कलाकार किंवा स्थापत्यकार नाही. भगवान शिवाच्या प्रेरणेने अयोध्येतील श्रीराम मंदिराची ही प्रतिकृती निर्माण करण्याची प्रेरणा मला मिळाली, असे मी मानतो. श्रीरामाची शिकवण सर्वत्र पोहोचावी, या भावनेने मी उपक्रम चालवला आहे. त्याशिवाय जे लोक आपल्या अडचणीमुळे अयोध्येतील श्रीरामाच्या मंदिराला भेट देऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी त्या मंदिराची ही प्रतिकृती मी तयार केली आहे, जेणेकरून त्यांना मूळ मंदिराची रचना लक्षात येऊ शकेल. मंदिराची ही प्रतिकृती सर्वत्र पोहोचावी, या हेतूने मी २०२२ साली या उपक्रमाला सुरुवात केली. प्रत्येक ठिकाणी किमान ७ दिवस ही प्रतिकृती प्रदर्शनासाठी मांडली जाते. काही ठिकाणी ४८ दिवस देखील ती प्रदर्शनासाठी मांडली आहे. विशेष म्हणजे प्रदर्शनाच्या प्रत्येक ठिकाणी लोकांकडून मला अतिशय छान वागणूक मिळाली आणि सहकार्यही लाभले. अयोध्येतील श्रीराम मंदिराची ही हुबेहूब प्रतिकृती पाहताना अनेकांच्या भावना उचंबळून येतात.
विनय राम
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.