Panjim: एटीएम स्वॅपिंग रॅकेटचा पर्दाफाश, हरियाणाच्या टोळीला अटक; 50 हून अधिक एटीएम कार्ड्स जप्त

ATM fraud Racket: एटीएम मशीनमधून पैसे काढण्यात अडचण येणाऱ्यांना व ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलीय.
ATM Swapping Racket
ATM Swapping RacketDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: एटीएम मशीनमधून पैसे काढण्यात अडचण येणाऱ्यांना व ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या हरियाणातील संजय महेशवाल (वय ३३) व सोनू कुमार ( वय ३२) या दोघांना डिचोली पोलिसांनी शिताफीने अटक करून एटीएम स्वॅपिंग रॅकेटचा पर्दाफाश केला.

त्यातील एकजण फरारी आहे. त्यांच्याकडून विविध बँकांची ५० हून अधिक एटीएम कार्डे, दोन भाडेपट्टीवरील दुचाक्या तसेच १४ हजार रुपये रोख रक्कम जप्त केली. देशभरात सुमारे १०० हून अधिक प्रकरणात ते गुंतले असून गोव्यात पाच गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

डिचोली येथील ७९ वर्षीय सेवानिवृत्त वासुदेव सावंत यांनी डिचोली पोलिस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. २५ जून २०२५ रोजी दुपारी ते डिचोलीतील चर्च स्क्वेअर येथील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्यासाठी एक व्यक्ती पुढे आली.

त्याने एटीएम कार्ड मशीनमध्ये घातले व त्यांना ‘पिन’ क्रमांक घालण्यास सांगितले. त्यावेळी त्याने तो अज्ञात व्यक्तीने क्रमांक बघितला होता. पैसे काढल्यानंतर त्याने एटीएम कार्डची अदलाबदल केली. पैसे व बदललेले एटीएम कार्ड दिल्यावर सावंत तेथून निघून गेले. काही मिनिटातच त्यांच्या मूळ एटीएम कार्डवरून बोर्डे - डिचोली येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून प्रत्येकी १० हजार रुपयांप्रमाणे चारवेळा संशयिताने एकूण ४० हजार रुपये काढले.

ATM Swapping Racket
Goa News: ढवळी येथील भगवती मंदिरासमोरील रस्त्यावर धावत्या कारला आग; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

सावंत हे घरी गेले, तेव्हा त्यांना मोबाईलवर आलेल्या मेसेजमधून पैसे काढल्याचे लक्षात आले. एटीएम कार्ड बदललेले गेल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू झाला.

१०० हून अधिक एटीएम कार्डांची चोरी

संजय महेशवाल व सोनू कुमार या दोघांनी एटीएम मशीनमध्ये येणाऱ्या वृद्धांना तसेच एटीएम वापरताना अडथळा येणाऱ्या लोकांची फसवणूक केली असून सुमारे १०० एटीएम कार्डे चोरली आहेत. संशयित २१ जून रोजी हरियाणातून निघाले. वाटेत त्यांनी इंदोर, महाराष्ट्र, सोलापूर, बिजापूर व त्यानंतर म्हापसा, डिचोली व पणजीत गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. यापूर्वी त्यांच्याविरुद्ध २०२० मध्ये दिल्ली, पंजाब, हुबळी, पठाणपूर, गांधीनगर व राजस्थान येथे फसवणूक व चोरीप्रकरणी गुन्हे नोंद आहेत.

असा लावला प्रकरणाचा छडा...

या तपासादरम्यान डिचोली पोलिसांनी सीसी टीव्ही कॅमेरा व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे संशयित दोघे असल्याचे आढळून आले. ते रेंट ए बाईक घेऊन आले होते. त्यामुळे या दुचाकींचे क्रमांक मिळाल्यावर पोलिसांची तपास चक्रे वेगाने सुरू झाली.

या रेंट ए बाईक मालकाला पोलिसांनी शोधून काढून ज्यांना या दुचाकी भाडेपट्टीवर दिल्या होत्या त्याची माहिती मिळवली. ही माहिती मिळताच डिचोली पोलिसांनी कळंगुट येथील प्रेमा गेस्ट हाऊसमधून त्यांना ताब्यात घेतले.

ATM Swapping Racket
Goa News: ढवळी येथील भगवती मंदिरासमोरील रस्त्यावर धावत्या कारला आग; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

यावेळी पोलिसांनी ते राहत असलेल्या खोलीची झडती घेतली असता अनेक एटीएम कार्डे तसेच रोख रक्कम व काही इतर साहित्य जप्त केले. संशयितांनी म्हापशात ३, मुरवागात २, तर पणजीत २ प्रकरण केले आहे व याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.

संशयित गोव्यात आल्यानंतर रिक्षा पकडून कळंगुट येथे गेले. तेथे त्यांनी प्रेमा गेस्ट हाउसमध्ये खोली बुकिंग केली. त्यानंतर तेथीलच दोन रेंट ए बाईक भाडेपट्टीवर घेतल्या. या दुचाकीने त्या दोघांनी डिचोली, म्हापसा, मुरगाव व पणजीत एटीएम मशीनच्या ठिकाणी नागरिकांना लक्ष्य बनवून एटीएमची अदलाबदल करून पैसे काढले. डिचोली पोलिसांचा तपास झाल्यानंतर त्यांना म्हापसा व पणजी पोलिस चौकशीसाठी घेणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com