Dabolim Airport : उत्तर गोव्यातील मोपा विमानतळ सुरू झाल्यावर दाबोळी विमानतळ बंद होणार, अशी भीती दक्षिण गोव्यातील पर्यटन व्यावसायिकांना अजुनही वाटते. मात्र, सध्या त्यांच्यासाठी खुशखबर आहे. कारण डिसेंबर अखेरपर्यंत दाबोळी विमानतळावर दररोज किमान 90 विमाने उतरणार असून हे प्रमाण 31 डिसेंबरपर्यंत तरी कायम राहण्याची शक्यता आहे.
दाबोळी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक धनंजय हेडगे यांनी सांगितले, की सोमवारी जवळपास 90 विमाने या विमानतळावर उतरली. रविवारी या संख्येने विक्रमी आकडा गाठला होता, त्यादिवशी 99 विमानांचे आगमन झाले. गोव्यातील ‘दाबोळी’वर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने विमाने उतरली आहेत.
31 डिसेंबरपर्यंत तरी दैनंदिन सरासरी 90 विमाने उतरण्याची शक्यता असून 30 आणि 31 डिसेंबर रोजी या संख्येत विक्रमी भर पडण्याची शक्यता आहे. अजून तरी कुठल्याही विमान कंपनीने दाबोळी विमानतळावरील आपली ऑपरेशन्स बंद करणार नसल्याचे कळविलेले नाही, अशी माहिती हेगडे यांनी दिली.
बुकिंग वाढले
गोव्यात पर्यटक वाढल्याने सध्या पर्यटन व्यावसायिकही खूष आहेत. गोव्यातील हॉटेल्सची बूकिंग वाढले असून सध्या टॅक्सी चालकही चांगला व्यवसाय करत आहेत.
80 टक्के प्रवासी हे पर्यटक!
रविवारी एकूण सात चार्टर विमाने दाबोळी विमानतळावर उतरली होती. त्यात प्रामुख्याने रशियन आणि युकेच्या विमानाचा समावेश होता. दाबोळी विमानतळ सध्या प्रवाशांनी गजबजलेला आहे. गोव्यात येणाऱ्या प्रवाशांपैकी 80 टक्के प्रवासी पर्यटक असल्याचे दाबोळी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक धनंजय हेडगे यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.