
मडगाव: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेत्या आतिषी यांच्याकडे आम आदमी पक्ष गोवा राज्याच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रभारीपदी नियुक्ती केल्यानंतर आतिषी पहिल्यांदच गोव्यात हजेरी लावली. यावेळी यांनी भाजपवर टीका करत सरकारमधील भ्रष्टाचारावर भाष्य केले. राज्यात आप सध्या सक्षम पर्याय असल्याचा दावा देखील आतिषी यांनी यावेळी केला.
आतिषी दाबोळी विमानतळावर दाखल झाल्यानंतर आपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
"गोव्याची जनता खड्डेमय रस्ते, कचरा आणि सरकारमध्ये सुरु असलेल्या भ्रष्टाचारामुळे त्रस्त आहेत. सरकाच्या भ्रष्टाचाराबद्दल आता बाहेरचे लोक नाही तर भाजपचे मंत्रीच बोलायला लागले आहेत. भाजपचे एक मंत्री म्हणाले की, छोटी कामे करण्यासाठीही १५-२० लाख रुपये द्यावे लागतायेत. फाइल पास करण्यासाठीही पैसे द्यावे लागतायेत असा आरोप केल्यानंतर संबधित मंत्र्याची पदावरून हकालपट्टी केली जाते," असे आतिषी म्हणाल्या.
"गोव्यात आम आदमी पक्ष एक सक्षम पर्याय म्हणून जनतेसोबत खंबीरपणे उभा आहे. गोव्यातील जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी ते काम करत आहेत. गोव्यातील जनता भाजपच्या कुशासनाला कंटाळली आहे आणि येणाऱ्या काळात गोव्यातील जनता निश्चितच बदल घडवून आणेल," असे आतिषी म्हणाल्या.
गेल्या आठवड्यात आतिषी यांच्याकडे पक्षाने गोवा प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली. २०२७ च्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतिषी यांची नियुक्ती महत्वाची मानली जात आहे.
आम आदमीने २०१७ मध्ये गोव्यात प्रवेश केला. पक्षाने यावर्षी लढविलेल्या निवडणुकीत दोन उमेदवार निवडून आले आहेत. २०२७ च्या निवडणुकीत पक्षाला मोठ्या अपेक्षा आहेत.
गोवा आपचे प्रभारी पंकज गुप्ता होते, गुप्ता यांची तब्येत खराब असल्याने आतिषी यांची तात्काळ प्रभावाने नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव संदीप पाठक यांनी याबाबत नियुक्तीची माहिती दिली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.