Goa: 'हे' आहे राज्यातील पहिले आत्मनिर्भर गाव

स्थानिकांच्या उत्स्फूर्ततेमुळेच नियोजित उपक्रमांची उद्दिष्टपूर्ती : ईशा सावंत
Goa Map
Goa MapDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: गोवा राज्य सर्व क्षेत्रात आत्मनिर्भर व्हावा या हेतूने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने 2 ऑक्टोबर 2020 रोजी कार्यान्वित केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत – स्वयंपूर्ण गोवा मोहिमे’ला चांगल्यापैकी प्रतिसाद लाभत असून यासंदर्भातील उद्दिष्ट पूर्ण करणारे अस्नोडा हे पहिले गाव ठरले आहे. (Assonora is the first self-sufficient village in Goa)

नियोजित उपक्रम पूर्ण करणारा अस्नोडा (Assonora) हा पहिला गाव असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तेथील एका कार्यक्रमात केली होती. यासंदर्भात स्वयंपूर्ण मित्र तसेच बीएलओ यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले होते. स्थानिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच हे शक्य झाल्याचे या गावासाठी ‘स्वयंपूर्ण मित्र’ म्हणून कार्यरत असलेल्या महसूल खात्याच्या अव्वल सचिव ईशा सावंत यांनी स्पष्ट केले आहे. सरकारने वन खात्याचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे सोपवलेला असून त्या व्यापातून वेळ काढून त्या अस्नोडा गावच्या ‘स्वयंपूर्ण मित्र’ ही जबाबदारी सांभाळत आहेत.

या मोहिमेखाली राज्य सरकारने स्वयंपूर्ण मित्र म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी मिळून एकूण 191 उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची तसेच तालुका स्तरावर 12 नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती ऑक्टोबर 2020 मध्ये केली होती. त्यानंतर हा उपक्रम नगरपालिका क्षेत्रांपर्यंतही विस्तारित करण्यात आला व त्या अनुषंगाने गोवाभरातील 14 पालिका क्षेत्रांमध्ये प्रत्येकी एक अशा ‘स्वयंपूर्ण मित्रां’ची नियुक्ती करण्यात आली. हे ‘स्वयंपूर्ण मित्र’ प्रत्येक शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत संबंधित कार्यक्षेत्रात उपस्थित राहून जनसंपर्क करीत असतात.

Goa Map
Goa Vaccination: पहिल्यांदाच गरोदर महिलेला कोरोना प्रतिबंधक लस

अस्नोड्यात यासंदर्भात वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला होता. त्या अनुषंगाने या गावातील एकंदर परिस्थितीचे अवलोकन करून त्या वातावरणात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्या उपाययोजना घेता येतील यासंदर्भातील आराखडा तयार करण्यात आला. कित्येक बैठका, चर्चात्मक उपक्रम व पंचायत सदस्यांशी संपर्क अशा माध्यमांतून या कार्याला चालना देण्यात आली. त्यासंदर्भात बूथ पातळीवरील अधिकाऱ्यांची निवडही त्या गावात करण्यात आली. तेथील जनसमूहाची नाळ ओळखून तसेच त्यांच्‍या समस्या जाणून घेऊन यासंदर्भातील उद्दिष्टपूर्ती करण्यात आली आहे.

तिराळी प्रकल्पामुळे येथील शेतीची हानी झाली आहे व त्यामुळे शेतीव्यवसाय करणे शक्य नाही, अशी कैफियत तेथील लोकांनी व्यक्त केली होती. त्या अनुषंगांने ‘स्वयंपूर्ण मित्रा’ने जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांशी ग्रामस्थांची चर्चा घडवून आणली व त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या समस्यांना अंशत: मुक्ती मिळाली. आगामी काळात त्या समस्या आणखी कमी होतील अशी अपेक्षा ‘स्वयंपूर्ण मित्र’ असलेल्या ईशा सावंत या शासकीय अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.

अस्नोड्यातील लोकांनी कृषी व्यवसायासाठी सध्या पर्यायी शेतजमीन शोधली असून तिथे आता टॉमेटो, मिरची, भोपळा इत्यादी भाज्यांचे उत्पादन केले जात आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. कारण तिळारीच्या कालव्यामुळे त्यांच्या शेतीची हानी झाली होती व त्यावर आता त्यांना दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात कायमचा तोडगा काढण्यासाठी जलस्रोत खाते प्रयत्नशील असून तोपर्यंत तेथील ग्रामस्थ पर्यायी जागेत किफायतशीर स्वरूपाचा कृषी व्यवसाय करीत आहेत.

या गावात आरोग्य खात्यातर्फे जनजागृती करून तंबाखू आणि अन्य अमलीपदार्थांच्या विरोधात तसेच कोविडसंदर्भातही जनजागृती करण्यात आली. समाजकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी शासकीय योजनांबाबत जनप्रसार केला. यासंदर्भात ज्येष्ठ नागरिकांच्या अभिवृद्धीच्या दृष्टीने अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आंतरजातीय विवाह आणि स्वयंसाहाय्य गट यांचाही प्रसार त्याअंतर्गत करण्यात आला.

कौशल्य विकास आणि उद्यमशीलता खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्या खात्याच्या अंतर्गत असलेल्या विविध अभ्यासक्रमांबाबत माहिती दिली आहे. तसेच महिला आणि बाल विकास खाते, राज्य ग्रामीण विकास यंत्रणा, गोवा हस्तकला ग्रामीण आणि लघुउद्योग विकास महामंडळ, मत्स्योद्योग खाते, खादी आणि ग्रामीण उद्योग मंडळ, कृषी खाते या खात्यांच्या अधिकाऱ्यांनीही शासकीय योजनांचा प्रसार या गावात केला आहे. त्याला ग्रामस्थांचा चांगल्यापैकी प्रतिसादही मिळत आहे.

महिलावर्गाकडून अधिक प्रतिसाद...

शासकीय योजनांना अस्नोडा पंचायत क्षेत्रात पुरुषांपेक्षा महिलावर्गाकडून जास्त उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. स्वयंपूर्ण होण्याबाबत त्यांचा निसर्गत: कल असल्याने हे शक्य झाले. बूथ पातळीवरील अधिकाऱ्यांचे ग्रामस्थांशी सलोख्याचे संबंध होते व लोकांचाही त्यांच्यावर विश्वास होता, असे यासंदर्भात बोलताना शासकीय अधिकारी ईशा सावंत यांनी सांगितले. त्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात प्रत्येक कुटुंबाशी संपर्क साधून व ग्रामस्थांशी सुसंवाद साधून त्यांना सरकारच्या विविध योजनासंसंदर्भात नावनोंदणी करण्यास प्रोत्साहित केले आहे, असेही त्या म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com