
म्हापसा: बनावट कागदपत्रांद्वारे आसगाव-बार्देश येथील ७८/२ भूखंडावर मालकी हस्तांतरित करण्याच्या प्रकरणी एसआयटीने ७९५ पानांचे आरोपपत्र म्हापसा प्रथम श्रेणी सत्र न्यायालयासमोर दाखल केले आहे.
तपासात समोर आले की, संशयित मोहम्मद सुहेल, रॉयसन रॉड्रिगीस, राजू मेथी, पॉलिना दिनिज यांच्यासह इतरांनी कट रचून जमीन मालकी हक्क खोट्या पद्धतीने हस्तांतरित केले. मुख्य संशयित सुहेल सध्या कोलवाळ कारागृहात, रॉयसन जामिनावर बाहेर तर पॉलिना दिनिज तब्येतीमुळे अंथरुणावर आहे.
संशयितांनी जमिनीच्या मालमत्तेची बनावट कागदपत्रे तयार केली व संबंधित अधिकाऱ्यांसमोर जमीन मालमत्तेचा खोटा दावा केला. तसेच सदर मालमत्तेच्या सर्वेक्षण क्र. ७८/२ मधील अधिकार हस्तांतरित करण्यात यशस्वी झाले. या संशयितांनी कायदेशीर वारसांना त्यांचे कायदेशीर हक्क उपभोगण्यापासून वंचित ठेवून, जमीन मालमत्तेच्या कायदेशीर वारसांची फसवणूक केली.
या प्रकरणाच्या चौकशीनंतर, तपास अधिकाऱ्यांना असे आढळले की, संशयित मोहम्मद सुहेल (४८) हा यातील मुख्य मास्टरमाईंड आहे. त्याने कट रचून बँक खाती व इतर सर्व बनावट कागदपत्रे तयार केली. नंतर ती नष्ट केली. सध्या सुहेल हा कोलवाळ कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला जून २०२५ मध्ये अटक झाली होती. दरम्यान, पुढील सुनावणी ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ठेवण्यात आली आहे.
दुसरा संशयित रॉयसन रॉड्रिग्स (४९) याला जुलै २०२५ मध्ये अटक झाली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. संशयित राजू मेथी (४४) हा मोहम्मद सुहलेचा जवळचा सहकारी आहे. तर, पॉलिना जुलियाना दिनिज ऊर्फ पामरिना गोन्साल्विस (८०) हिने मुख्य आरोपी मोहम्मद सुहेलच्या कटात मदत केली. तिची तब्येत ठीक नाही व ती सध्या अंथरुणाला खिळलेली आहे. अन्य संशयित मारियानो अँटोनियो टेलेस गोन्साल्विस, ब्रँका राड्रिगीस, प्रेमानंद देसाई यांचे निधन झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.