Goa Temperature: अनेक दिवस मुसळधार बरसल्यानंतर 9 आणि 10 जुलै रोजी गोव्यात सामान्य मान्सून पाऊस झाला. तथापि, एकीकडे पावसाचा जोर ओसरत असताना दुसरीकडे राज्यात तापमान वाढल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसात झालेला हा हलका पाऊस पोषक मानला जातो. या पावसाचे पाणी जमिनीत मुरते.
गोव्यात काही भागात पावसाचा जोर कमी झाला आहे आणि तापमान वाढू लागल्याने उकाड्यामुळे लोक हैराण झाल्याचे दिसून येत आहे. सलग दोन दिवस गोव्यातील पावसाने थोडी विश्रांती घेतली.
अधूनमधून एक मोठी पावसाची सर येऊन जायची, पण गेल्या काही काळात जितका पाऊस राज्यात झाला त्या तुलनेत गेल्या दोन दिवसात पाऊस ओसरला आहे. आणि दुसरीकडे सलग दुसऱ्या दिवशी तापमान मात्र वाढले होते.
सोमवारी पणजीत 30 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, तर मुरगावमध्ये सोमवारी 29.6 अंश सेल्सिअस तापमान होते. सोमवारी राज्यात सरासरी केवळ 20.7 मिमी पाऊस झाला होता. जुलैमध्ये पावसाची सुरूवात जोरदार झाली. तथापि, या महिन्यात पावसात खंड पडलेला दिसून येऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गोव्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये सुमारे एकूण पावसाळ्याच्या 60 ते 70 टक्के पाऊस पडत असतो. या दोन महिन्यांतील पावसाच्या प्रमाणावरून राज्यात सामान्य, कमी की जास्त पाऊस पडला, हे ठरवले जाते. तीव्र पाऊस किंवा अतिवृष्टी धोकादायक असते. त्यातून पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) 12 आणि 13 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता व्यक्त केली आहे तर 14 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.