
गोव्यातील युवा जलतरणपटू आणि गोवा ओपन वॉटर स्विमिंग क्लबच्या मुख्य प्रशिक्षक असलेल्या अरुणिमा बोस हिने अलीकडेच आपल्या धैर्याने आणि मेहनतीने इंग्लंड व फ्रान्स दरम्यानची प्रसिद्ध इंग्लिश खाडी यशस्वीरित्या पार केली आहे. भारतातील अविनाश थडानी, किरण राजगोपाल, मधुर गोपाल आणि यज्ञ सोमयाजी यांच्यासह ‘स्विमलाइफ अॅरोज’ या पाच सदस्यीय रिले टीमचा भाग म्हणून अरुणिमाने ही कामगिरी केली.
२१ जून रोजी इंग्लंडमधील डोव्हर येथील शेक्सपियर बीचवरून प्रारंभ करून फ्रान्समधील कॅप-ग्रिस-नेझ येथे पोहोचण्यासाठी या टीमने १५ तास ५८ मिनिटांचा थरारक जलप्रवास केला. इंग्लिश खाडी येथे ६०० हून अधिक टँकर आणि सुमारे २०० फेरी व इतर जहाजे वाहतुकीसाठी वापरली जातात. त्यामुळे केवळ अंतरच नव्हे, तर जलतरणपटूंना हवामान, तापमान, वाऱ्याचा वेग, समुद्राच्या लाटा आणि जहाजांची वर्दळ अशा अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो.
एक्सप्रेसिव्ह आर्ट थेरपिस्ट असलेल्या अरुणिमा बोस हिला लहानपणापासून पोहण्याची आवड होती. मात्र, गोव्यातील समुद्र किनाऱ्यांनी तिला खुल्या पाण्यात पोहण्याची प्रेरणा दिली. "समुद्रात पोहण्याच्या अनुभवामुळे खुल्या पाण्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची जिद्द मिळाली," असे अरुणिमा सांगते.
बर्फाच्या पाण्यानं आंघोळ, जिम वर्कआउट्स आणि विशेषतः ध्यानधारणा व मनाची दृढता यांमुळेच ती अशा कष्टप्रद आव्हानांना तोंड देऊ शकले, असं अरुणिमा म्हणाली.
अरुणिमा गोवा ओपन वॉटर स्विमिंग क्लबच्या माध्यमातून जलतरणप्रेमींना खुल्या पाण्यात पोहण्याचा अनुभव देण्याचे कार्य करते. तिच्या म्हणण्यानुसार, "भारतातील जलतरणपटूंना खुल्या समुद्रात पोहण्याचा आत्मविश्वास मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत."
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.