Pernem News : पेडणे, कलाकारांना व त्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी कलाकारांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडली पाहिजे. त्यामुळे कलाकाराला आपल्या कलेची कुणीतरी दखल घेतली म्हणून आनंद व समाधान मिळते व त्यांच्यातील कलेस उत्तेजन मिळते.
माऊली कला संघ गेली अनेक वर्ष कला व संस्कृतीसाठी कार्य करत आहे. त्यांना माझ्याकडून सरकारी पातळीवर व वैयक्तिकरीत्या आवश्यक पाठिंबा असेल, असे प्रतिपादन पेडणेचे आमदार तथा गोवा हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण आर्लेकर यांनी केले.
गावठणवाडा - मोपा येथील माऊली एकता कला व सांस्कृतिक क्लब व कला आणि सांस्कृतिक संचालनालय पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. विठ्ठल लक्ष्मण नाईक गावकर स्मृती नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
कला व सांस्कृतिक संचालनालयाचे साहाय्यक संचालक मिलिंद माटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला खास निमंत्रीत म्हणून गोमंतकीय दिंडी सम्राट बाबू गडेकर व गोमंतकीय ज्येष्ठ संगीतकार नारायण तथा नाना आसोलकर, तसेच खास मान्यवर म्हणून तोर्से जिल्हा पंचायत सदस्या सीमा खडपे,
सरपंच सुबोध महाले, तांबोसे मोपा उगवे पंचायतीचे पंच सदस्य काशिनाथ पेडणेकर, सातेरी माऊली देवस्थानचे महाजन वासुदेव लक्ष्मण नाईक गावकर, जयप्रकाश परब, देवानंद गावडे, आत्माराम परब आणि संस्थेचे अध्यक्ष सत्यवान नाईक गावकर उपस्थित होते.
जिल्हा पंचायत सदस्य सीमा खडपे यांनी यावेळी जिल्हा पंचायत निधीतून साऊंड सिस्टम संस्थेचे पदाधिकारी अरुण नाईक यांच्याकडे सुपूर्द करून माऊली एकता कला संघाच्या कार्याचे कौतुक करून शक्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. बाबूगडेकर म्हणाले, मोपा गावात मोठमोठे कलाकार निर्माण झाले.
या गावचे गोमंतकीय ज्येष्ठ संगीतकार नारायण तथा नाना आसोलकर हे आहेत. कला व सांस्कृतिक संचालनालयाचे साहाय्यक संचालक मिलिंद माटे आहेत. गावातील कलाकारांनी त्यांचे सहकार्य घेऊन आपली कला वृद्धिंगत करावी.
प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष सत्यवान नाईक यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया आसोलकर व समिता तांबोसकर यांनी केले. मंगेश परब यांनी आभार मानले. तद्नंतर ‘दगडू सावधान’ हा नाट्यप्रयोग झाला.
३५ जणांचा गौरव
नाट्य क्षेत्राला योगदान दिलेल्या गावातील ३५ जणांचा तसेच २५ दिवंगत नाट्य कलाकारांचा (पूर्वी वॉटर सप्लाय मोपा यांच्या सहकार्याने) मरणोत्तर सत्कार त्यांच्या कुटुंबीयांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानीत करून करण्यात आला.
दिवंगत कलाकारांच्या स्मृतींना उजाळा
कला व सांस्कृतिक संचालनालयाचे साहाय्यक संचालक मिलिंद माटे म्हणाले, की संस्थेने या नाट्य संमेलनामुळे व या गावातील नाट्य कलाकारांच्या सत्कारामुळे तसेच जे कलाकार हयात नाहीत त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करून त्यांनी नाट्य क्षेत्राला दिलेल्या योगदानाच्या स्मृती जाग्या केल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.