गोव्याची सांस्कृतिक परंपरा: मराठी संस्कृतीतील भजनकलेचे स्वरूप

मराठी संस्कृतीतील भजनकलेचे स्वरूप
मराठी संस्कृतीतील भजनकलेचे स्वरूप

भजन ही कला आहे. ज्यातून आनंद प्राप्त होतो, ती कला होय. भजनकलेला विशिष्ट शास्त्र आहे. त्यासंदर्भातील शास्त्रीय निकष पाळावेच लागता. भजनात कला व शास्त्र यांच्याबरोबरच नाट्यालाही महत्त्व आहे. कारण, भजनात काही प्रमाणात अभिनय कला व वक्तृत्व कलाही असते. देहबोलीच्या साहाय्याने भावपूर्ण गायन करणे यात अभिनय कला आहे, तर शब्दांचे उच्चारण सुस्पष्ट व व्यवस्थित करणे यात वक्तृत्व कला सामावलेली आहे.

भजन कलाकाराला मुळात भजनाचा छंद असावा लागतो. भजन ही त्याची जणू भूक असायला हवी. ती भूक मानसिक/आत्मिक स्वरूपाची असते. माणसाला प्रामुख्याने तीन प्रकारांची भूक असते. पहिली शारीरिक/पोटाची भूक, दुसरी मानसिक/आत्मिक भूक आणि तिसरी लैंगिक भूक.

भजन कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहून तो आनंद घेण्यातच खरा आनंद असतो. कारण, त्यातच जिवंतपणा ओतप्रोत भरलेला असतो. कलारसिकांसाठी ती वेगळीच अनुभूती असते. तेवढा आनंद त्या कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण ऐकून मिळणारच नाही. ध्वनिमुद्रण अथवा ध्वनिचित्रण ऐकून/पाहून आपल्याला थोडाफार आनंद जरूर मिळेल; पण, त्या आनंदाची तुलना ‘याचि देही, याची डोळां’ पाहिलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळालेल्या आनंदाशी करताच येत नाही. कारण, त्यात कृत्रिमतेपेक्षा नैसर्गिकता असते. जसा आपणांस निसर्गाचे चित्र पाहण्यापेक्षा त्या निसर्गात प्रत्यक्ष रममाण होऊन त्याचा आस्वाद घेण्यात जास्त आनंद मिळतो, तसेच संगीत क्षेत्रातही आहे.

पुरातन काळापासून भारतीय संस्कृतीत असलेले गुरुशिष्याचे पवित्र नाते संगीतकला व भजनकलेत प्रकर्षाने दिसून येते. हे नाते भारतीय जनमानसात पवित्र अशा संस्कारांतून निर्माण झाले आहे. या नात्याचा अनुबंध श्रीदत्तगुरू, व्यासमुनी इत्यादींशी जोडला जातो. संगीत व भजनकलेतील खरा शिष्य स्वतःच्या गुरूच्या प्रति नेहमीच आदरभाव व्यक्त करीत असतो. गुरूची मनोभावे सेवा करण्याचा सत्‍शिष्याचा सदोदित प्रयत्न असतो.

भजन सादरीकरण हे एका व्यक्तीची कला नव्हे, तर तो सांघिक कलाविष्कार असतो. त्यात मुख्य गायक, सहगायक, गायनसाथ करणारे अन्य सहकारी गायक, तसेच पखवाज/तबला संवादिनी (हार्मोनिअम) अशा संगीतवाद्यांचे वादक असे सर्व घटक मिळून सर्वांच्या सहयोगाने, सहकार्याने सादरीकरण करावे लागते. त्या भजनातील सर्व कलाकारांचा कलाविष्कार एकमेकांसाठी पूरक ठरणारा असावा लागतो. भजनात मुख्य कलाकाराला सहकारी कलाकारांनी गायनाची साथ करावी लागते. आवर्तने घेताना, स्वरांचे आलाप गाताना, तानबाजी करताना सहकारी कलाकारांना कलाविष्कार करण्याची संधी द्यावी लागते. कीर्तनकलेच्या क्षेत्रात जसा ‘चक्रीकीर्तन’ हा प्रकार रूढ आहे, तसे भजनातही एका परीने ‘चक्रीभजन’ अथवा ‘चक्रीवादन’ अशा शब्दांचा गोव्यात व्यापकतेने वापर करायला हरकत नाही. चक्रीभजनाचे कार्यक्रम महाराष्ट्रात होतच असतात. गोव्यातही असे कार्यक्रम होतात; पण, गोव्यात त्यासाठी आम्ही सहसा ‘चक्रीभजन’ हा शब्द वापर नाही, एवढाच काय तो फरक.

कलाविषयक व्यक्तिसमूहाला नेहमीच ‘पथक’ संबोधावे. त्यामुळे भजनाच्या पथकाला ‘संघ’ संबोधणे चुकीचे आहे. त्या भजन पथकात सांघिक भावना असली म्हणजे तो संघ ठरत नाही. सांघिक भावनेला इंग्रजी भाषेत ‘टीम स्पिरिट’ असे संबोधले जाते. क्रिकेट, फूटबॉल यांसारख्या क्रीडाप्रकारांत भाग घेणाऱ्या खेळाडूंच्या गटाला संघ म्हणता येते. परंतु, देशभक्तिपर गीताचे गायन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटाला समूह संबोधता येईल. त्यामुळे पथक, संघ, शिष्टमंडळ, प्रतिनिधिमंडळ, तुकडी, गट अशा विविध शब्दांच्या अर्थच्छटा नीट समजून घेणे क्रमप्राप्त आहे.

गोव्याची लोकसंख्या सध्या किमान पंधरा लाख आहे. त्यापैकी असलेली सुमारे सत्तर टक्के हिंदुबांधव जनता या ना त्या नात्याने अर्थांत कलाकार अथवा प्रेक्षक या नात्याने या भजनकलेशी निगडित आहे. कारण, रसिकांविना कोणतीही कला पुढे जाऊच शकत नाही. रसिकजनांच्या प्रतिसादानेच एखादी कला पुढे जात असते. भजन कलाकारांना निमंत्रित करून त्यांचे कार्यक्रम आयोजित करणे, कलाकारांचा यथायोग्य आदर-सत्कार करणे यातूनही रसिकजनही भजनकलेचे परिपोषण करीत असतात. रसिकजनांच्या प्रोत्साहनाने, आशीर्वादाने आणि त्यांच्या सक्रिय पाठिंब्याने भजनकलेचा विकास झालेला असल्याने त्यांचे त्याबद्दलचे योगदान दृष्टिआड करून चालणार नाही.

भजनात सर्वसाधारणपणे विविध दैवतांचे श्लोक, संतांनी रचलेले विविध अभंग, गजर, गौळणी इत्यादींचा समावेश असतो. त्याचप्रमाणे हल्लीच्या काळातील कवींनी रचलेल्या प्रासादिक भक्तिगीतांचेही भजनात तन्मयपूर्वक गायन केले जाते. गोव्यात काही ठिकाणी संवादिनी, तबला/पखवाज इत्यादी संगीतवाद्ये साथीला न घेता केवळ टाळांच्या साहाय्याने आरतीगायन होत असते. काही वेळा टाळ न घेताही केवळ हाताने टाळ्या वाजवून आरतीगायन केले जाते. तोसुद्धा भजनाचाच एक प्रकार म्हणावा लागेल. कारण, विशेषतः गणेशचतुर्थीच्या उत्सवात वेळ वाचवण्याच्या हेतूने नुसते उभे राहून घरोघरी आरतीगायन करण्याची प्रथा-परंपरा गोमंतकात बहुतेक गावांत रूढ आहे. त्यात सहभागी होणारे कलाकार हे सर्वसाधारणपणे भजन कलाकारच असतात.

कलासाधना करा!
कोणतेही शिक्षण घ्या! ते शिक्षण आयुष्यभर कदापि न संपणारे असले. म्हणूनच तर आपण कित्येकदा पाहतो की मृत्यूच्या दारावर असणारी एखादी वयस्कर व्यक्ती ज्ञानसाधना करण्याचा प्रयत्न करीत असते. त्यामुळे भजन कलाकारांनीही नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे की आपण आयुष्यभर कितीही शिक्षण घेतले तरी ते न पुरणारेच आहे. जगातील कोणतीही व्यक्ती कोणत्याही विषयात परिपूर्ण नसते, हे सत्य आहे. म्हणूनच भजन कलाकारांनी आयुष्यभर कलासाधना, ज्ञानसाधना करीतच राहणे आवश्यक आहे.

`व्यासंग हवा`
भजनकला आत्मसात करणाऱ्या कलाकारांच्या ठायी व्यासंग हवा. येथे ‘झटपट’ काहीच उपलब्ध नसते. दीर्घ काळ घालवल्यानंतर केवळ थोडेफार आपल्या पदरात पडत असते. त्यामुळे भजन कलाकारांनी स्वत:च्या मार्गक्रमणात बगलमार्ग अर्थांत ‘शॉर्ट-कट’ शोधण्याचा प्रयत्न करू नये. आपण पद्धतशीरपणे शिकलो तरच ‘घोटून-घोटून’ त्या कलेत आपण पारंगत होऊ शकतो. शास्त्रशुद्ध भजन सादर करणे हे तसे एरागबाळ्याचे काम नव्हे. त्यासाठी दीर्घ साधना हवी. ती एक प्रकारची तपश्चर्याच असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com