

वास्को: झुआरीनगर-वास्को येथे काल मध्यरात्री मालवाहू रिक्षा रस्त्याच्या बाजूला उभी करण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर सशस्त्र हल्ल्यात झाले. या हल्ल्यात कौशल कुटुंबातील पाचजणांसह आठजण जखमी झाले असून, अभिनव, अभिषेक आणि त्यांचे वडील रामबाबू कौशल हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.
झरी-झुआरीनगर येथील चौगुले भाटजवळ कौशल कुटुंब राहते. या कुटुंबाची मालवाहू रिक्षा नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली होती. त्यावरून परिसरातील काही युवकांनी हरकत घेत वाद सुरू केला. संबंधित युवकांनी मद्य व ड्रग्सचे सेवन केले होते, असा दावा कौशल कुटुंबीयांनी केला आहे.
या वादातून संबंधित युवकांनी रिक्षाचालकाला प्रथम मारहाण केली. त्याला सोडविण्यासाठी आलेल्या अन्य दोघांनाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर लोखंडी कांबी आणि चाकू आणून कौशल कुटुंबीयांवर हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात अभिनव आणि अभिषेक कौशल यांच्यासह रामबाबू कौशल गंभीर जखमी झाले. अभिनव याच्या गळ्यावर चाकूचा वार करण्यात आला. रामबाबू यांनाही लोखंडी कांबी आणि चाकूने मारहाण करण्यात आली. अन्य पाचजणांनाही मारहाण करण्यात आली. हल्लेखोरांनी कौशल यांच्या घरावर दगडफेक करून खिडक्यांच्या काचाही फोडल्याचा आरोप आहे. तसेच, पोलिसांत तक्रार करण्याचे आव्हान देत धमकावण्यात आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.