
Aquem Power House Goa-सासष्टी: आके येथील पावर हाऊस इमारती जवळ असलेले गाडे हटविण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला असताना अजूनही हे गाडे आहे तिथेच आहेत. दोन महिन्यांपूर्वी वीज खात्याचे कार्यकारी अभियंता काशिनाथ शेट्ये यांची मडगावात बदली झाली होती, तेव्हा त्यांनी हा प्रश्न हाताळण्याचा व गाडेवाल्यांना हटविण्यासाठी आठ दिवसांची मुदत पण दिली होती.
पण राजकीय दबावाखाली काशिनाथ शेट्ये यांचीच बदली झाली व हा प्रश्न सध्या तसाच कायम राहिला आहे. हे गाडे कधी हटविणार याची वाट नागरिक पाहत आहेत. या गाड्यांमुळे आके पावर हाऊस इमारतीत प्रवेश करण्यास व बाहेर येण्याच्या मार्गाला अडथळा निर्माण होत आहे.
त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरळीत हालचालींवर बंधने येत असल्याचे शेट्ये यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले होते. हे गाडे फुटपाथवर आहेत व हे बेकायदा आहेत. लोकांना तिथून फिरणे कठीण होत आहे, असे त्यांनी पुढे स्पष्ट केले होते.
शेट्ये यांच्या या सांगण्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हे गाडे हटविण्याचा आदेश मडगाव नगरपालिकेला दिला होता. पण अजून नगरपालिकेने या आदेशाची कारवाई केलेली नाही. शेट्ये यांच्या बदलीचे कारण स्पष्ट करण्यात आले नाही तरी गाडे हटविण्यास त्यांनी घेतलेला पुढाकार हे मुख्य कारण असल्याचेच बोलले जात आहे.
अशा बेकायदा गाड्यांवर कारवाई न करणे म्हणजे पालिका क्षेत्रात बेकायदा कामे करणाऱ्यांना उत्तेजन देण्यासारखे आहे, असे त्या परिसरातील नागरिक उघडपणे बोलू लागले आहेत. जो अधिकारी चांगले करू पाहत होता, त्याचीच बदली करणे हे चांगले उदाहरण नाही. हे गाडे फुटपाथावरील अतिक्रमण करून उभारले आहेत, असे असताना सरकार गप्प का आहे, असे प्रश्न नागरिक उपस्थित करताना दिसत आहेत.
या गाडेमालकांना राजकीय अभय असल्याची चर्चा आहे. मात्र या गाड्यांमुळे पावर हाऊस इमारती येणारे कर्मचारी तसेच वीज ग्राहकांना अडचण होत आहे. तसेच फुटपाथवर बेकायदा उभारलेले हे गाडे वाहतुकीसाठीही अडसर ठरत आहेत, असा स्थानिकांचा दावा आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हे गाडे हटवण्याचे आदेश दिला आहे. मात्र पालिकेने अजून कारवाईसाठी पावले उचलेली नाहीत. पालिकेवरही राजकीय दबाव असल्याची चर्चा मडगाव परिसरात सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.