
सासष्टी: दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी आके पावर हाऊस येथील वीज खात्याच्या जागेत अतिक्रमण करून उभारलेले गाडे हटविण्याचा आदेश नगरपालिकेला दिला होता. वीज खात्याचे अभियंते काशिनाथ शेट्ये यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. पण शेट्ये यांचीच बदली करण्यात आली व नगरपालिका हे गाडे हटविण्यास दिरंगाई करीत असल्याने आता नगर विकास खात्याने नगरपालिकेला या संदर्भात लवकर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
नगरविकास खात्याचे उपसंचालक नादिया शेकोली यांनी मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निदेश दिले आहेत. हे निदेश उपसंचालकाने २२ मे रोजी दिले होते व तीन दिवसांची मुदत दिली होती. मडगाव नगरपालिका शहरातील अशी अनेक अतिक्रमणे हटविण्यास अयशस्वी ठरत आहे किंवा त्यात मुद्दामहून दिरंगाई केली जात आहे.
२२ जानेवारी २०२५ रोजी उपजिल्हाधिकारी व जिल्हा महसूल अधिकारी आवेलिना डिसा ई परेरा यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना या संदर्भात अधिकृत नोटीस पाठवून बेकायदेशीर विक्रेत्यांवर व अतिक्रमण केलेल्यांवर कारवाई करण्यास सांगितले होते. तत्पूर्वी २९ ऑगस्ट २०२४ रोजी उपजिल्हाधिकारी प्रेमराज शिरोडकर यांनी सुद्धा अशा प्रकारची नोटीस नगरपालिकेला पाठवली होती. मात्र दोन्ही वेळा नगरपालिकेने कारवाई करण्याचे टाळले.
१४८ - १९९७ याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने शहरातील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिला होता. या आदेशावरून जिल्हाधिकारी कचेरीने नगरपालिकेला नोटीस पाठवली होती, या गाड्यांना नगरपालिकेने परवानगी दिलेली नाही, तरी अनेक गाडे कार्यरत असल्याचे दिसून येत असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. गाड्यावर, अतिक्रमणावर कारवाई केली जाईल, असे नगरपालिका अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात येते, मात्र प्रत्यक्षात कारवाई होताना दिसत नाही.
आता बेकायदेशीर गाड्यांवर व अतिक्रमणावर बुधवारी ११ जून रोजी बोलावण्यात आलेल्या नगरपालिका कौन्सिलच्या बैठकीत चर्चा होणार आहे.
या बैठकीत यावर नेमका काय निर्णय होईल या बद्दलची उत्सुकता लोकांना लागून राहिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.